नवरात्रीच्या उपवासाची 'अशी' करून ठेवा तयारी- ऐनवेळची धावपळ टळून उपवासाचे पदार्थ होतील झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2025 12:56 IST2025-09-19T12:49:05+5:302025-09-19T12:56:15+5:30

नवरात्रीमध्ये कित्येक घरांमधल्या महिलांना ९ दिवसाचे उपवास असतात. आता ९ दिवस उपवास करायचा म्हटला की घरात उपवासाचे वेगवेगळे पदार्थ असायलाच हवे. त्यासाठीच नवरात्रीच्या आधीच उपवासाच्या पदार्थांची थोडी विशेष तयारी करून ठेवायला हवी.(cooking tips for 9 days Navratri fast)

जेणेकरून ऐनवेळी स्वयंपाक करताना धावपळ होणार नाही आणि कोणताही उपवासाचा पदार्थ अगदी झटपट तयार होईल..(how to prepare your kitchen for 9 days Navratri fast?)

नवरात्रीच्या उपवासासाठी घरात उपवास भाजणीचे पीठ करून ठेवा. त्याचे अगदी झटपट थालिपीठ किंवा उपमा करता येतो. थालिपीठ पचायलाही सोपे असते.

१ ते २ किलो शेंगदाणे घरात आणून ठेवा. त्यातले अर्धे शेंगदाणे भाजून त्याचा कुट करून ठेवा. थालिपीठ, भगर, साबुदाणा खिचडी अशा पदार्थांमध्ये घालायला दाण्याचा कूट हाताशी तयार असला की स्वयंपाक झटपट होतो.

बटाटे भरपूर आणून ठेवा. इतर कोणते पदार्थ करण्याचा कंटाळा आला तर बटाट्याचा किस, बटाट्याच शीरा असे पदार्थ अगदी पटकन करता येतात.

त्याचप्रमाणे विकत मिळणारे राजगिरा लाडूही घरात आणून ठेवा. थोडीशी भूक लागल्यास लाडू पटकन खाता येतो किंवा मग गरम दुधात कालवून खिरीसारखा खाता येतो.

चिप्स, चकली असे उपवासाचे पदार्थ असतील तर ते एकदाच भरपूर तळा आणि एखाद्या एअरटाईट डब्यात घालून ठेवा. जेव्हा पाहिजे तेव्हा पटकन खाता येतात. एअर टाईट डब्यात हे पदार्थ ३ ते ४ दिवस चांगले टिकतात. सादळून जात नाहीत.

उपवासाच्या दिवसांत घरात फळंही भरपूर आणून ठेवा. जेव्हा इतर पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही तेव्हा पटकन एखादं फळ खाता येतं.