वजन जास्त असूनही साडीत दिसाल स्लिमट्रिम! ७ रंग देतात परफेक्ट स्लिम लूक - साडीत जाड दिसण्याचं टेन्शन विसरा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2026 19:05 IST2026-04-06T19:00:40+5:302026-04-06T19:05:06+5:30

best saree colors for plus size women : saree color makes you look slim : योग्य रंगाची साडी निवडली तर ती तुम्हाला एक सुंदर व आकर्षक स्लिमिंग इफेक्ट देऊ शकते...

'साडी' हा भारतीय महिलांचा असा पोशाख आहे, जो कोणत्याही शरीरयष्टीवर खुलून दिसतो. पण जेव्हा वजन थोडे जास्त असते, तेव्हा अनेक महिलांना 'मी साडीत जाड दिसेन का?' अशी भीती वाटते. खरंतर, सौंदर्य हे वजनावर नाही तर तुम्ही स्वतःला कसं कॅरी करता यावर अवलंबून असतं. योग्य रंगाची साडी निवडली तर ती तुमच्या शरीरातील त्रुटी लपवून तुम्हाला एक स्लिमिंग इफेक्ट देऊ शकते. जर तुम्हालाही कोणत्याही कार्यक्रमात सुडौल आणि आकर्षक दिसायचे असेल, तर साडीचे कोणते रंग तुमच्यासाठी परफेक्ट आहेत, हे जाणून घेणे गरजेचे आहे. पाहूयात असे काही रंग जे तुम्हाला स्लिम आणि ग्लॅमरस लूक देतील...(saree colors make you look slimmer instantly).

जेव्हा आपलं वजन थोडं जास्त असतं तेव्हा साडीचे गडद रंग सर्वात उत्तम ठरतात, कारण ते शरीराची जास्तीची रुंदी लपवण्यास मदत करतात.

जेव्हा आपण वजन थोडे जास्त असताना साडी निवडतो, तेव्हा वाईन कलर हा एक 'मॅजिकल' रंग ठरतो. हा रंग केवळ दिसायला प्रीमियम नाही, तर तो शरीराचा जाडजूडपणा उत्तम प्रकारे लपवतो. गडद छटा असल्यामुळे या रंगाच्या साडीत प्रकाश परावर्तित कमी होतो, परिणामी तुमची शरीरयष्टी अधिक सुटसुटीत आणि 'स्लिम' दिसते. साडी आणि ब्लाऊज दोन्ही एकाच वाईन शेडचे ठेवा. यामुळे शरीराची एक सलग उभी लाईन (Vertical Line) तयार होते आणि तुम्ही अधिक उंच व बारीक दिसता. वाईन कलरमध्ये सॅटीन, शिफॉन किंवा जॉर्जेट कापड निवडा. हे कापड अंगाला चिकटून राहते, ज्यामुळे तुम्ही सुडौल दिसता. शक्यतो बारीक सोनेरी किंवा काळी बॉर्डर असलेल्या वाईन साड्या निवडा. जाड काठ तुमची उंची कमी दाखवू शकतात.

एमराल्ड ग्रीन म्हणजे गडद पाचूचा रंग. हा रंग केवळ डोळ्यांना सुखद वाटत नाही, तर तो प्लस साईज महिलांना स्लिमिंग इफेक्ट येण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. एमराल्ड ग्रीन हा एक 'ज्वेल टोन' आहे. गडद शेड असल्यामुळे हा रंग शरीराचा आकार अधिक सुटसुटीत दाखवतो. विशेषतः रात्रीच्या दिव्यांच्या प्रकाशात हा रंग अत्यंत तेजस्वी आणि ग्लॅमरस दिसतो. एमराल्ड ग्रीनमध्ये सॅटीन-जॉर्जेट किंवा सिल्क-शिफॉन साड्या निवडा. या साड्या शरीराला चिकटून राहतात आणि अनावश्यक फुगीरपणा दिसत नाही. जर तुम्हाला डिझायनर लूक हवा असेल, तर एमराल्ड ग्रीन साडीवर त्याच रंगाचे बारीक टिकली काम (Self-color sequins) असलेले ब्लाऊज मॅच करा, यामुळे एक सलग लूक मिळतो आणि शरीर सुडौल दिसते.

नेवी ब्लू हा रंग केवळ प्रोफेशनल लूक देत नाही, तर शरीराचा जाडपणा लपवून तुम्हाला एक सुडौल आणि स्लिम लूक देतो. नेव्ही ब्लू हा एक 'कूल' अंडरटोन असलेला गडद रंग आहे. तो शरीराच्या रुंदीला कमी दाखवतो आणि एक सलग लाईन तयार करतो. यामुळे तुम्ही खऱ्या वजनापेक्षा थोडे बारीक आणि उंच दिसता. हा रंग सर्व प्रकारच्या 'स्किन टोन'वर उठून दिसतो. जर तुम्हाला बारीक दिसायचे असेल, तर नेवी ब्लू मध्ये शिफॉन, जॉर्जेट किंवा क्रेप साडीची निवड करावी. जाड सिल्क किंवा कॉटन टाळा कारण ते शरीराला अधिक फुगीर दाखवू शकतात. मोठी किंवा ठळक गोल्डन बॉर्डर घेण्यापेक्षा, साडीच्याच रंगाची 'सेल्फ बॉर्डर' किंवा बारीक लेस असलेली साडी निवडा. यामुळे तुमची शरीरयष्टी विभागलेली न दिसता एकसंध दिसते.

जर तुम्हाला गडद रंगांमध्ये काहीतरी वेगळं आणि 'क्लासी' ट्राय करायचं असेल, तर चारकोल ग्रे हा रंग तुमच्यासाठी परफेक्ट आहे. चारकोल ग्रे हा एक 'न्यूट्रल' रंग आहे. हा रंग शरीराचा फुगीरपणा कमी दाखवतो आणि एक प्रकारची 'शार्पनेस' देतो. ज्या महिलांना काळा रंग वापरायचा नाही, त्यांच्यासाठी हा एक अतिशय सुखद आणि 'हाय-फॅशन' पर्याय आहे. चारकोल ग्रे मध्ये मॅट क्रेप किंवा लिनेन सिल्क साड्या निवडा. जास्त चमक असणारे कापड टाळा, कारण चमक प्रकाशाला परावर्तित करते आणि तुम्ही अधिक जाड दिसू शकता. मॅट कापड शरीराला सुटसुटीत दाखवते.

जर तुम्हाला निळा आणि हिरवा या दोन्ही रंगांचे मिश्रण आवडत असेल, तर 'पिकॉक ब्लू' हा रंग तुमच्यासाठी बेस्ट आहे. पिकॉक ब्लू हा एक 'डीप ज्वेल टोन' आहे. या रंगाची खोली शरीराचं जाडेपणा लपवते. हा रंग कोणत्याही स्किन टोनवर अतिशय उजळ दिसतो आणि तुम्हाला एक स्लिमिंग इफेक्ट देतो. या रंगात क्रेप, जॉर्जेट किंवा मऊ सिल्क साड्या अतिशय सुंदर दिसतात. हे कापड अंगावर व्यवस्थित बसते, ज्यामुळे तुम्ही विनाकारण जाड दिसत नाही.

'चॉकलेट ब्राऊन' हा असा रंग आहे जो शरीराचा जडपणा लपवून तुम्हाला एक स्लिमिंग इफेक्ट देतो. हा रंग त्वचेच्या रंगाशी छान जुळतो आणि शरीराची 'रुंदी' कमी असल्याचा भास निर्माण करतो. हा रंग सॅटीन - सिल्क, टिश्यू - जॉर्जेट किंवा मऊ शिफॉनमध्ये अतिशय सुंदर दिसतो. या कापडाची चमक आणि रंगाची गडद छटा मिळून शरीराला एक सुडौल आकार देतात. साडी आणि ब्लाऊज एकाच चॉकलेट शेडचे असल्यास तुमची उंची अधिक वाटते आणि तुम्ही बारीक दिसता.

जेव्हा वजन थोडे जास्त असते आणि आपल्याला झटपट 'स्लिमिंग इफेक्ट' हवा असतो, तेव्हा डोळे झाकून निवडता येणारा रंग म्हणजे काळा. हा असा रंग आहे जो कधीच आऊट ऑफ फॅशन जातं नाही आणि प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये किमान एक तरी काळी साडी असायलाच हवी. जर तुम्हाला अधिक बारीक दिसायचे असेल, तर जॉर्जेट, शिफॉन किंवा नेटची काळी साडी निवडा. काळ्या रंगात सॅटीन देखील खूप ग्लॅमरस दिसते कारण ते शरीराला व्यवस्थित आकार देते.पूर्ण काळी प्लेन साडी आणि त्यावर एखादे डिझाइनर ब्लाउज तुम्हाला खूप उंच आणि स्लिम दाखवते.