प्रियांका चोप्रा सांगतेय, उत्तम मेंटल हेल्थचे सिक्रेट्स ! - कुढण्यापलिकडच्या 'दिसण्याची' गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 08:06 PM2021-05-14T20:06:18+5:302021-05-15T11:39:45+5:30

ताणरहित जगणं सध्याच्या वातावरणात अशक्य. पण मनातला हा ताण बाहेर काढून स्वत:ला आनंदी करता यायला हवं. अभिनेत्री प्रियंका चोप्रानं स्वत:च्या अनुभवातून सांगितलेला आनंदी जगण्याचा मार्ग हा कोणासाठीही कृतीत आणणं अजिबात अवघड नाही!

एकाच व्यक्तिमत्त्वात अनेक ओळखी दडलेली व्यक्ती म्हणजे प्रियंका चोप्रा. सन २००० सालची मिस युनिव्हर्स, यूनिसेफची जागतिक राजदूत, मॉडेल, अभिनेत्री, गायिका, निर्माती, सामाजिक कार्यकर्ता आणि बरंच काही. प्रियंका म्हणते या सगळ्या भूमिका मी तेव्हाच उत्तमपणे करु शकते जेव्हा माझा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो.

एक काळ असा होता जेव्हा प्रियंकाला तिच्या दिसण्याबद्दल बरेच ऐकावे लागले. त्याचा परिणाम तिच्यावर झाला. पण एका मर्यादेपर्यंतच. प्रियंका म्हणते की माझ्या दिसण्यापेक्षाही मी कशी आहे? माझं योगदान काय आहे? माझा जगण्याचा उद्देश काय आहे? आज मी माझ्या दिवसाला माझ्या कामातून न्याय देऊ शकले का? याचा विचार जास्त करते. जेव्हा मला माझ्या शरीराबद्दल चांगलं वाटत नाही तेव्हा मी मला आनंद देणारं काम करते.

प्रियंका म्हणते की, मी कायम स्वत:ला सांगत असते की मी प्रेमळ आहे, एक चांगली व्यक्ती आहे. कामाच्या ठिकाणी मी आत्मविश्वासानं काम करते. याचा माझ्या दिसण्याशी , माझ्या शरीराशी काहीही संबंध नाही. समाज- संस्कृती ही कितीही दिसण्याला महत्त्व देत असली तरी आपण आपल्या असण्याला आणि कामाला महत्त्वं दिलं तर आपण कसं दिसतो ? आपलं शरीर कसं आहे? हा विचार कधीच महत्त्वाचा वाटणार नाही.

स्वत:च मानसिक आरोग्य सांभाळण्याचा मंत्र आपल्याच हातात असतो हा विश्वास प्रियंकाला वाटतो. दिवसभर आपलं काम चोख केल्यानंतर उरलेला वेळ हा कुटुंबासाठी देण्याचा प्रियंकाचा प्रयत्न असतो. कुटुंबाला वेळ देणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं हा आनंदी होण्याचा नैसर्गिक मार्ग असल्याचं प्रियंका म्हणते. कुटुंबासोबत वेळ घालवल्यास मनावरचा ताण हलका होतो.

तणावरहित आणि आनंदी जगण्यासाठी प्रियंका एक गोष्ट आवर्जून करते. ती म्हणजे स्वत:ला वेळ देणं. रिलॅक्स होणं. प्रियंका म्हणते एका दिवसात भरपूर कामं करायची असतील तर मल्टिटास्किंग करावंच लागतं. पण स्वत:साठी वेळ काढणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी कामाचा एक चार्ट करा. त्यात आपली कामं बसवा. ती नियोजनानुसार चोख करा. कामं आटोपली की थांबा. आणि उद्या उत्तम काम करण्यासाठी स्वत:ला आज वेळ द्या. काम, स्वप्नं, महत्त्वाकांक्षा हे सगळं यशस्वी जगण्यासाठी हवंच असतं. पण सोबत स्वत:ला वेळ देता आला तरच हे शक्य होतं हे कायम लक्षात ठेवावं.

प्रियंका आपल्या आनंदी जगण्याचा मंत्र सांगताना म्हणते की, आनंदी माणसं, आनंद देणं, आनंद घेणं हेच मला आनंदी ठेवतं. सध्याच्या कोरोना काळातल्या तणावात तर हा आनंद खूप महत्त्वाचा असल्याचं प्रियंका म्हणते. तिच्या मते आनंदी होण्यासाठी तणावरहित मन  आवश्यक आहे.  सध्याच्या काळाचा तणाव हा प्रत्येकाच्या मनावर नक्कीच आहे. पण त्याबद्दल आपण कुटुंबिय, मित्र-मैत्रिणी, डॉक्टर यांंच्यापैकी कोणाशी तरी बोलायला हवं. ताण मनात ठेवला तर तो मोठा होत जातो. आणि म्हणूनच प्रियंका स्वत:ही ताण आल्यास तो लगेच बोलून बाहेर काढते. प्रियंका म्हणते मी जेव्हा मनातला ताण बोलून बाहेर काढते तेव्हा हा ताण माझ्या आत्मविश्वासावर, माझ्या सकारात्मकतेवर परिणाम करत नाही.

आनंद निर्माण करणं हाच आपल्या जगण्याचा हेतू असल्याचं प्रियंका म्हणते. आपल्या आजूबाजूचं वातावरण, परिस्थिती कशी का असेना आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टींचा शोध घेता यायला हवा. दिवस संपल्यानंतर आपण चांगलं काम केलं ही भावना आपल्याला आनंद देते. आपल्या घरातली माणसं आपल्याला निखळ आनंद देतात.