साबणाची चिपटी फेकू नका, ९ गोष्टींसाठी वापरा उरलेला लहानसा साबण! बघा स्मार्ट उपयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2023 13:59 IST2023-03-15T13:09:21+5:302023-03-15T13:59:21+5:30
9 Surprising Uses for a Bar of Soap Around Your Home : उरलेला साबण वाया जाऊ न देता, घरांतील इतर छोट्या - मोठ्या कामांसाठी वापरु शकतो.

आपण आपल्या दैनंदिन जीवनांत साबणाचा वापर दररोज करतो. सकाळच्या अंघोळीपासून ते कपडे धुण्यापर्यंत अशा अनेक कामांसाठी आपण साबणाचा वापर करतो. साबण वापरुन झाल्यानंतर त्याचे उरलेले तुकडे आपण सहसा फेकून देतो. यामुळे बराच साबण वाया जातो, हा उरलेला साबण वाया जाऊ न देता, घरांतील इतर छोट्या - मोठ्या कामांसाठी वापरु शकतो. साबण हे एक अतिशय उपयुक्त उत्पादन आहे जे अनेक दैनंदिन समस्या सोडवू शकते(9 Surprising Uses for a Bar of Soap Around Your Home).
१. अटकते दरवाजे करा ठीक :-
काहीवेळा लाकडाचे दरवाजे लाकूड खराब झाल्यामुळे व्यवस्थित उघड - बंद होत नाहीत. ड्रॉवरचे दरवाजे स्मूदली उघडण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूंना स्टीलची स्लायडिंग पट्टी लावलेली असते. ही पट्टी जर खराब झाली तर दरवाज्याची नीट उघडझाप करता येत नाही. अशावेळी या स्टीलच्या पट्ट्यांवर थोडासा साबण घासावा. या स्टिलच्या पट्ट्यांवर साबण घासल्यामुळे साबणांतील गुळगुळीतपणामुळे ड्रॉवरचे दरवाजे स्मूदली उघडण्यास मदत होते. त्याचप्रमाणे अनेकदा पावसाळ्यात लाकडी दरवाजे अडकतात, नीट उघडत नाहीत. अशावेळी दरवाज्यांच्या बिजागरांवर व सांध्यावर साबणाचा बार २ ते ३ वेळा घासून घ्या. यामुळे आपले दरवाजे, खिडक्या, ड्रॉवर्स सहज उघडण्यास मदत होईल.
२. वॉर्डरोब किंवा कपाट सुगंधित ठेवा :-
काहीवेळा आपल्या वॉर्डरोब किंवा कपाटांतून कुबट किंवा विचित्र प्रकारचा वास येतो. काहीवेळा बदलत्या ऋतूंसह, वॉर्डरोबमधून कुबट वास येणे खूप सामान्य आहे. हा वास नाहीसा करण्यासाठी उरलेल्या साबणाचे तुकडे एका कापडात किंवा मॅश बॅगमध्ये बांधून वॉर्डरोब व कपाटांच्या एका कोपऱ्यात ठेवा. साबणांच्या तुकड्याप्रमाणेच साबणाचे आवरण देखील उघडून कपाटात ठेवू शकता. यामुळे आपल्या कपाटांत सुगंधी पसरेल व येणाऱ्या कुबट वासापासून मुक्ती मिळेल.
३. भिंतीतील छिद्रे भरण्यासाठी फायदेशीर :-
अनेकवेळा, जेव्हा आपण घराच्या भिंतीवर एखादे पेंटिंग, आर्ट पीस किंवा फोटो फ्रेम टांगतो त्यासाठी आपल्याला भिंतीवर खिळे ठोकावे लागतात. खिळे ठोकल्यामुळे भितींना कायमचे छिद्र पडू शकते. आपण पेंटिंग किंवा फोटो फ्रेम काढल्यानंतर त्या छिद्रांमुळे भितींचीं शोभा जाऊन त्या चांगल्या दिसत नाहीत. अशा स्थितीत भिंतीच्या रंगासारख्याच रंगांचाच साबण छिद्राच्या भागावर दाबाने घासून घ्या. असे केल्याने छिद्र साबणाने भरले जाईल. यामुळे आपल्या भिंतींवरील छिद्र लपले जाऊन भिंती चांगल्या दिसण्यास मदत होईल.
४. चष्मा वाफेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी :-
चष्मा घालणाऱ्यांना हे चांगलेच माहीत आहे की गरम चहा, कॉफी किंवा कोणत्याही पदार्थाचा आस्वाद घेताना आपला चष्मा वाफेने पूर्णपणे अस्पष्ट होतो. यासोबतच हिवाळ्यात आपण बाथरूममध्ये गरम पाणी वापरत असाल तरी काचेवर वाफ साचते. ज्यामुळे आपल्याला त्यात स्वतःचा चेहरा दिसणे कठीण होते. हे टाळण्यासाठी पांढरा साबण आपल्या चष्म्यावर आणि आरशावर हलक्या हाताने घासून घ्या आणि नंतर मऊ कापडाने पुसून घ्या.
५. अडकलेल्या झिपसाठी उपयुक्त :-
अनेकदा बॅग, जीन्स किंवा ड्रेसची झिप अचानक अडकली की कशी काढायची हा मोठा प्रश्न निर्माण होतो. या त्रासातून बाहेर पडण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे साबणाचा तुकडा. झिपवर ३ ते ४ वेळा साबण घासून घ्यावा. यामुळे बॅग, जीन्स किंवा ड्रेसची झिप गुळगुळीत होईल, परिणामी या झिप झटपट उघडल्या जातील.
६. उरलेल्या साबणापासून बनवा हँडवॉश :-
कित्येकदा कुटुंबात जितके सदस्य आहेत त्यानुसार प्रत्येक घरात साबणाचा वापर केला जातो. परंतु प्रत्येक घरात एक गोष्ट कॉमन असते ती म्हणजे साबणाचे उरलेले तुकडे. हे उरलेले तुकडे एकतर नवीन साबणांना चिकटतात आणि त्यात मिसळतात किंवा फेकून दिले जातात. हे उरलेले साबण फेकून न देता ते गोळा करा आणि ते पूर्णपणे वितळेपर्यंत आणि तुमचा द्रव साबण तयार होईपर्यंत त्यांना पाण्यात घालून गरम करा. अशारितीने उरलेल्या साबणापासून हँडवॉश तयार करावा.
७. नखं व हात ठेवा स्वच्छ :-
साफसफाई करताना किंवा बागकाम करताना अनेकदा हात घाण होतात. विशेषत: नखे घाणीने भरलेली असतात तेव्हा त्यांना साफ करणे खूपच कठीण होऊन बसते. हे टाळण्यासाठी, साफसफाई किंवा बागकाम सुरू करण्यापूर्वी नखांमध्ये साबण भरावा. यामुळे इतर घाण जमा होऊ शकणार नाही आणि हा साबण धुतल्यानंतर स्वच्छ होईल.
८. घट्ट अंगठ्या आणि बांगड्यांसाठी उपयुक्त :-
हा एक साबणाचा अतिशय आश्चर्यकारक उपयोग आहे. आपण सर्वांनी कधी ना कधी हा प्रयोग करुन पाहिलाच असेल. जर आपल्या हातात बांगडी किंवा अंगठी अडकली असेल तर हाताला साबण लावून आपण ती चटकन काढू शकता.
९. घट्ट कुलूप लूज करण्यासाठी :-
कुलूप जर गंज चढून घट्ट झाली असतील किंवा ती व्यवस्थित काम करत नसतील तर साबणाचा वापर करुन ही कुलूप दुरुस्त करु शकता. कुलुपाच्या चावीला साबणावर घासा. आता चवीचा साबणांवर घालसलेला भाग कुलूप उघडण्यासाठी कुलुपाच्या आत घाला. यामुळे घट्ट झालेले कुलूप लूज होईल व व्यवस्थित काम करु लागेल.