पाकिस्तानविरोधात दोन युद्धे लढली, स्क्वाड्रन लीडर म्हणून रिटायर झाले; सुरेश कलमाडींचा रणभूमी ते राजकारणापर्यंतचा थक्क करणारा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 09:33 IST
1 / 8आज पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन झाले. अनेकांना ते एक मोठे राजकारणी आणि क्रीडा संघटक म्हणून माहित आहेत, परंतु राजकारणाच्या मैदानात उतरण्यापूर्वी कलमाडी यांनी देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आकाशात झेप घेतली होती. 2 / 8भारतीय हवाई दलातील एक धाडसी पायलट म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत प्रेरणादायी राहिली आहे. तामिळनाडूतील जन्म ते पुण्याच्या गल्लीपासून दिल्लीच्या तख्तापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. एक 'पायलट', एक 'रणनीतीकार' आणि एक 'क्रीडा संघटक' अशा विविध भूमिका त्यांनी तितक्याच ताकदीने निभावल्या.3 / 8पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर, कलमाडी यांनी भारतीय हवाई दलात प्रवेश केला. सुरेश कलमाडी यांनी १९६० मध्ये पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (NDA) पदवी पूर्ण केली. १९६४ मध्ये ते भारतीय हवाई दलात दाखल झाले. १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला होता. युद्धभूमीवर शत्रूचे दाबे दणाणून सोडणाऱ्या कलमाडी यांनी अनेक लढाऊ मोहिमा यशस्वीपणे फत्ते केल्या होत्या.4 / 8हवाई दलातील त्यांच्या अनुभवामुळे आणि कौशल्यामुळे त्यांना त्यांच्याच मातृसंस्थेत, म्हणजेच NDA (खडकवासला) येथे 'इन्स्ट्रक्टर' (प्रशिक्षक) म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तिथे त्यांनी अनेक नव्या वैमानिकांना युद्धाचे धडे दिले. १९७४ मध्ये त्यांनी 'स्कवॉड्रन लीडर' (Squadron Leader) या पदावरून निवृत्ती घेतली आणि त्यानंतर ते सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले.5 / 8निवृत्तीनंतर त्यांनी 'युवक काँग्रेस'च्या माध्यमातून राजकारणात पाऊल ठेवले. लष्करी शिस्त आणि दांडगा जनसंपर्क यामुळे त्यांनी अल्पावधीतच दिल्लीच्या राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केले. रेल्वे राज्यमंत्री ते पुण्याचे खासदार अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले. मात्र, त्यांच्या व्यक्तित्वावर असलेला हवाई दलाचा प्रभाव त्यांनी आयुष्यभर जपला.6 / 8कलमाडींनी पुण्याला केवळ राजकारण दिले नाही, तर शहराला एक सांस्कृतिक आणि जागतिक ओळख दिली. 'पुणे फेस्टिव्हल' आणि 'पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन' या उपक्रमांद्वारे त्यांनी पुण्याच्या कला-संस्कृतीला जागतिक नकाशावर स्थान मिळवून दिले.7 / 8भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष म्हणून कलमाडींनी भारतीय क्रीडा विश्वात एक प्रबळ सत्ताकेंद्र निर्माण केले होते. १९९१ मध्ये शरद पवारांना पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर ठेवण्यासाठी त्यांनी केलेले 'लॉबिंग' आजही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरते.8 / 8कोणत्याही मोठ्या नेत्याप्रमाणे कलमाडींची कारकीर्दही वादांपासून मुक्त नव्हती. २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्समधील आरोपांनी त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला. मात्र, त्यांच्या टीकाकारांनाही मान्य करावे लागते की, पुण्याच्या पायाभूत सुविधांच्या विकासात कलमाडींचे योगदान मोठे होते.