शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

By हेमंत बावकर | Updated: July 29, 2025 14:44 IST

1 / 11
गेल्या २० वर्षांपूर्वी पुण्यात दोन आयटी पार्क उभे राहिले आहेत, एक म्हणजे हिंजवडी आणि पुण्याच्या पार पलिकडे मगरपट्टा. ते अपुरे पडू लागले म्हणून की काय खराडीलाही आयटी कंपन्या वसल्या. परंतू, पब्लिक एवढी वाढली की या आयटी पार्कना जोडणारे रस्ते अपुरे पडू लागले आहेत. यात दोष कोणाचा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा, सरकारचा की आयटी पार्कवाल्यांचा की आयटी कर्मचाऱ्यांचा? सर्वांनीच यावर विचार करून, पुढाकार घेऊन विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
2 / 11
पुण्याचा मुळ प्रश्न हा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आहे. मुळात पुणे हे मुंबईसारखे एकाच रेषेत वसलेले नाही. तर संपूर्ण गोलाकार, चोहुबाजुंनी पुण्याची वाढ झाली आहे, पुढेही होत राहणार आहे. यामुळे एका ठिकाणाहून थेट बस दुसऱ्या हव्या त्या ठिकाणी जाण्यासाठी मिळण्याची शाश्वती खूप कमी आहे. लोकल ट्रेनची तर बातच सोडा. ती फारतर तळेगाव ते पुणे स्थानकांदरम्यान येणाऱ्या स्टेशनांपुरतीच मर्यादीत आहे. यामुळे पुण्याचा सर्व भार हा मोटारसायकल, स्कूटर, रिक्षा, कार, टेम्पो ट्रॅव्हलर आणि बस यावरच येऊन पडत आहे.
3 / 11
मुंबईत गेल्या २० वर्षांपूर्वी सुरु झालेली कार्यालयांची वेळ बदला, हल्ली सुरु झालेली शक्य असेल तर वर्क फ्रॉम होम द्या ही चर्चा आता पुण्यात सुरु झाली आहे, याला निमित्त ठरलेय ते म्हणजे हिंजवडी आयटीपार्कचे वाट्टोळे झाले या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्याने. हिंजवडीच नाही तर हडपसरच्या मगरपट्टा, खराडी या आयटीपार्क किंवा पार तिकडे चाकण, इकडे सिंहगडजवळील एमआयडीसीभागातही जाण्याचे अनेकांचे धाडस होत नाही. कारण एकदा का वाहतूक कोंडीत अडकले की दोन-चार तास प्रवासाचे कुठेच गेलेले नाहीत. या वाहतूक कोंडीत अडकायचे ते अडकायचे आणि परत वैतागून कामाला बसायचे, त्यात ऑफिसमधील टेंशन, कामाचा लोड यामध्ये पुण्यात नोकरीसाठी आलेले व पुणेकर झालेले पार वैतागून गेले आहेत.
4 / 11
पुण्यात मुळात कोरोनामध्ये संसर्ग होऊ नये, सुरक्षेसाठी प्रत्येकाने सेकंडहँड का होईना चारचाकी घेतलेली आहे. आयटी पार्कच्या दिशेने जातात तेच नाही तर इतर भागातही जाण्यासाठी लोक चारचाकीच काढत आहेत. मग ते बँक कर्मचारी असोत किंवा अन्य कोणत्याही कंपन्यांचे कर्मचारी. कार नसेल तर मग दुचाकी ही ठरलेलीच. कारण पुण्यात बस आणि मेट्रोने जायचे असेल तर ऑफिसला किंवा कामानिमित्त बाहेर पडलाच तर २०० ते ५०० रुपये बाजुला काढून ठेवावे लागतात. याचे कारण म्हणजे समजा तुम्ही मेट्रोने जात असाल तर तुम्ही मेट्रो स्टेशन गाठण्यासाठी रिक्षा करता, तिथे ५० रुपयांच्या खाली बिल जातच नाही, पुढे मेट्रोचे तिकीट आणि परत उतरून तुमच्या इच्छिच ठिकाणी जाण्यासाठी पुन्हा रिक्षा, कॅब करायची म्हणजे द्राविडी प्राणायामच जणू. परत येण्यासाठी तेवढाच किंवा त्यापेक्षा जास्त खर्च. यामुळे मुळात पुणेकरांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था परवडतच नाही.
5 / 11
हिंजवडी आयटी पार्कला जाण्यासाठी शिवाजीनगरहून विद्यापीठ, बाणेर असे करत मेट्रो उभारण्यात येत आहे. परंतू, याचे काम एवढे धिमे आहे की त्यामुळे रस्त्यावर आणखी कोंडी होत आहे. सध्या विद्यापीठ चौक तरी त्यातून सुटला आहे. तिथला पूल गेल्यावर्षी जूनमध्ये पूर्ण केला जाणार होता, यंदाचा जून गेला, जुलै संपला तरी काम अपूर्णच आहे. तेच पुढे हिंजवडीला जाणाऱ्या रोडवर आहे. कामे सुरुच आहेत. यामुळे आयटीवाले पीएमपीएलची बसचा पर्याय न पकडता आपली आपली कार, स्कूटर काढून ये-जा करत आहेत. बस पकडायची म्हटली तर त्यांना घरापासून कंपनीपर्यंत पोहोचेपर्यंत दोन ते तीन बस पकडाव्या लागतील. यात वेळ गेला, त्रासही झाला असा प्रकार होत आहे.
6 / 11
या दोन अडचणी कमी की काय म्हणून तुम्ही रस्त्यावरून नजर फिरवली तर एका कारमध्ये एकच व्यक्ती असल्याचे तुम्हाला दिसेल. तो देखील मोबाईल कारच्या ब्लुटूथला कनेक्ट करून मिटिंग घेत असतो. म्हणजे प्रायव्हसी आली. त्यामुळे आपल्या कंपनीतील किंवा आपल्या भागात जाणाऱ्या लोकांना कारमधून नेण्याचा प्रश्नच येत नाही. सिग्नलला अशा कारकडे थांबलात की तुम्हाला कारमधून मोठा बोलण्याचा आवाज येईल. अनेकजण कार पुलिंगही करत असतील. परंतू, कंपनीत रिअंबर्समेंट करण्यासाठी पेट्रोल, डिझेलचे बिल कसे देणार, या कारणाने देखील अनेकजण ऑफिसला ये-जा करण्यासाठी कार वापरतात. कोरोना काळात थोडा आराम मिळाल्याने अनेकांची शेअर रिक्षा, बस अशा वाहनांतून धक्के खात जाण्याची सवय मोडली आहे, हे देखील एक कारण आहेच. यामुळे पुण्यातील रस्ते अपुरे पडू लागले आहेत, ते खासकरून ऑफिस टायमिंगमध्ये.
7 / 11
बजाजसारख्या काही आयटी कंपन्या कर्मचाऱ्यांना चार तास ऑफिसला या, उर्वरित कामाचे चार तास तुम्ही घरून करा असे सांगतात. काही कंपन्यांनी कोरोनापासून जे वर्क फ्रॉम होम ठेवलेय ते तसेच आहे. परंतू अनेक कंपन्या अशा आहेत, ज्यांना कर्मचारी ऑफिसमध्येच हवा आहे. कर्मचाऱ्यांना ऑफिलसा बोलविणारी कंपनी इन्फोसिस हिंजवडीतच आहे. या सारख्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना बोलविण्यास सुरुवात केली होती. आता १० मार्चपासून पुन्हा महिन्यातून १० दिवस तरी या असे कंपनीने सांगितल्याचे वृत्त आहे. अशाप्रकारे कंपन्याच या वाहतूक कोंडीवर तोडगा काढू शकतात. शिफ्टचे टायमिंग बदलू शकतात.
8 / 11
अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना लेट मार्क लावतात, या ठराविक वेळेत पोहोचायलाच हवे अशी सक्ती करतात, पगार कापतात. अर्थात कर्मचारीही अशी सूट दिली तर त्याचा गैरफायदाही घेतात. परंतू, कुठेतरी यातून सुवर्णमध्य काढायला हवा. वाहतूक कोंडी का होते, याचा विचार आयटी कंपन्यांनी, राजकारण्यांनी, बिल्डरांनी, कंत्राटदारांनीही करायला हवा. पण करणार कोण, असा प्रश्नही आहेच.
9 / 11
वाहतूक पोलिसांवर प्रचंड ताण आहे. त्यात त्यांना सिग्नलच्या पुढे उभे ठाकून चलनही फाडायचे आहे. वाहतूक व्यवस्थेवर ताण आहे. परंतू, ही व्यवस्था बिघडवते कोण? वाहनचालकही त्याला जबाबदार आहेत. समोरून ठोकले, मेलो तरी चालेल पण उलट्या दिशेने वाहने चालवायची, फेरा मारून-युटर्न घेऊन यायचे नाही, हे पुण्यात बहुतांश ठिकाणी दिसते. सिंहगड रोड, हिंजवडीला जाणारे पुणे, पिंपरी-चिंचवडचे रस्ते तर याचे जिवंत उदाहरण आहेत. दुचाकी चालकच नाही तर कारवाले ,रिक्षावाले आणि टेम्पोवाले देखील उलट्या दिशेने रस्ता मोकळा दिसला की घुसतात आणि आपल्या बाजुला आधीच कोंडी आहे, त्यात दुसऱ्या बाजुच्या वाहनांनाही अडकवून टाकतात. या गोष्टी थांबल्या, सुधरल्या तरच हिंजवडी, सिंहगड रोड, हडपसर भागातील वाहतूक कोंडी सुटायला मदत होऊ शकते. पण पुन्हा प्रश्न आला करणार कोण?
10 / 11
हिंजवडीत अनेक रस्ते खोदून ठेवलेले आहेत, रस्त्यांची कामे निकृष्ट असल्याने रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. यात जरा जास्त पाऊस पडला की मग हिंजवडीच्या रस्त्यांवर नदी नाही समुद्रच तयार होतो. आयटी कर्मचाऱ्यांच्या काही संघटना आहेत, ज्या यावर वेळोवेळी आवाज उठवत असतात. परंतू, ते देखील अपुरे पडत आहेत. या रस्त्यांचे काम सुरु केले की त्याच दिवशी किंवा पुढील काही दिवसांत संपविणे गरजेचे असते. परंतू, खड्डा तसाच खोदून कित्येक दिवस, महिने ठेवला जातो. यावर प्रशासनाने देखील कासवगती सोडून काम करणे गरजेचे आहे. भ्रष्टाचार सोडून दर्जेदार कामे करणे गरजेचे आहे.
11 / 11
ज्या ३७ कंपन्या गेल्या त्यांची कारणे वेगळीही असू शकतील. हैदराबाद, बंगळुरूमध्ये ट्रॅफिक जाम नाहीय असे मुळीच नाही. उलट पुण्यापेक्षा जास्त आहे. याच्या बातम्याही आपण पाहतो. परंतू, तरीही कंपन्या जर जात असतील तर त्याही कारणांचा विचार करणे गरजेचे आहे. कारण हिंजवडी आयटीपार्क बंद झाला तर ते पुण्यालाच काय तर महाराष्ट्रालाही परवडणारे नाही. अनेकांचे लाखो कोटी रुपये लागलेले आहेत. ते बुडाले तर अर्थव्यस्थेवरही परिणाम होणार आहे.
टॅग्स :hinjawadiहिंजवडीTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिसPuneपुणेAjit Pawarअजित पवार