शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

कोण आहेत जितिन प्रसाद, ज्यांचा भाजपा प्रवेश काँग्रेससाठी मानला जातोय मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 13:52 IST

1 / 7
२०१४ मध्ये मोदी लाटेत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसची उडालेली घसरगुंडी थांबण्याचे नाव घेत नाही आहे. गेल्या सात वर्षांत अनेक नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असून, त्यामध्ये राहुल गांधीचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या अनेक तरुण नेत्यांचाही समावेश आहे. दरम्यान, आज उत्तर प्रदेशमधील युवा नेते जितीन प्रसाद यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
2 / 7
जितीन प्रसाद यांना गेल्या काही काळापासून काँग्रेसने पक्षातील केंद्रापासून काहीसे दूर केले होते. मात्र त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एक वर्षावर आली असताना पक्ष सोडून भाजपामध्ये जाणे पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. जितिन प्रसाद हे कोण होते आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणात त्यांचे का महत्त्व आहे हे आज आपण जाणून घेऊयात.
3 / 7
जितीन प्रसाद हे काँग्रेसमधील दिग्गज नेते दिवंगत जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र आहेत. जितेंद्र प्रसाद हे राजीव गांधी आणि पी.व्ही. नरसिंह राव या दोन माजी पंतप्रधानांचे राजकीय सल्लागार राहिले होते.
4 / 7
दरम्यान जितीन प्रसाद यांचे वडील जितेंद्र प्रसाद यांनी २००० मध्ये सोनिया गांधींविरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान २००१ मध्ये जितेंद्र प्रसाद यांचा मृत्यू झाला होता.
5 / 7
जितेंद्र प्रसाद यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा जितीन प्रसाद यांनी चालवला. २००१ मध्ये ते युवक काँग्रेसशी जोडले गेले. २००४ मध्ये जितीन प्रसाद यांनी शाहजहाँपूर येथून लोकसभेची निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश केला होता. दरम्यान यूपीओ-१ च्या काळात त्यांना मंत्री बनवण्यात आले होते. तेव्हा त्या सरकारमधील युवा मंत्र्यांपैकी ते एक होते.
6 / 7
२००९ मध्ये जितीन प्रसाद यांनी धौराहा लोकसभा मतदारसंघातून लढून विजय मिळवला होता. यूपीए-२ सरकारच्या काळात त्यांनी पेट्रोलियम, रस्ते वाहतूक यासारखी महत्त्वाची खाती सांभाळली होती. मात्र २०१४ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात आलेल्या जबरदस्त मोदी लाटेत त्यांचा पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर ते काँग्रेसच्या राजकारणातील मुख्य प्रवाहापासून काहीसे बाजूला फेकले गेले होते.
7 / 7
जितीन प्रसाद हे उत्तर प्रदेशातील शाहजहाँपूर, लखीमपूर आणि सीतापूर या भागातील लोकप्रिय नेते आहेत. त्यांना उत्तर प्रदेशच्या राजकारणातील संयमी आणि विकासाभिमुख नेते म्हणून ओखळले जाते.
टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेश