शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

युवासेनेच्या वरूण सरदेसाईंवर ठाकरे सरकारची कृपादृष्टी; ‘या’ दर्जाची सुरक्षा मिळणार

By प्रविण मरगळे | Published: January 10, 2021 1:48 PM

1 / 10
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार प्रसाद लाड, राम कदम यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.
2 / 10
सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत राजकीय नेत्यांच्या सुरक्षेबाबत आढावा घेण्यात आला त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना असलेली झेडप्लस सुरक्षेत कमी करून वायप्लस एक्स्कॉर्ट दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे, तर राज ठाकरेंची झेड सुरक्षा काढून त्यांनाही वायप्लस एक्स्कॉर्ट सुरक्षा देण्यात आली आहे.
3 / 10
त्याचसोबत अमृता फडणवीस, दिवीजा फडणवीस यांची वायप्लस एक्स्कॉर्टसह असलेली सुरक्षा काढून त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. आशिष शेलारांची वायप्लस सुरक्षा काढून त्यांनाही वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
4 / 10
या सरकारी आदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे, तसेच महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेच्या युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनाही एक्स दर्जाची सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
5 / 10
वरूण सरदेसाई हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे मावस भाऊ आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचा मुलगा आहे. त्यांच्याकडे युवासेनेच्या सचिव पदाची जबाबदारी आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर वरूण सरदेसाई यांचा वावर मंत्रालय आणि वर्षा बंगल्यावर वाढलेला आहे.
6 / 10
आदित्य ठाकरेंना विधानसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी पहिल्यांदा वरूण सरदेसाई यांनीच केली होती. त्याचसोबत ते लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरूण सरदेसाईंचा मोठा वाटा होता.
7 / 10
राज्यात सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्र्यासोबत शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत वरूण सरदेसाई यांच्या उपस्थितीत अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते, मंत्रालयाच्या अधिकारी बैठकीत वरूण सरदेसाई यांची हजेरी का? असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी सरकारवर टीका केली होती.
8 / 10
वरूण सरदेसाईंच्या शासकीय बैठकीत उपस्थितीवर राष्ट्रवादीनेही नाराजी व्यक्त केली होती, अशाप्रकारे पुन्हा होऊ नये असं नवाब मलिकांनी सांगितले होते, उद्धव ठाकरे सरकार नवीन असल्याने असं झालं असेल, ही मोठी चूक नाही परंतु अशा घटना पुन्हा होऊ नये असं नवाब मलिक म्हणाले होते.
9 / 10
गेल्या काही वर्षापासून शिवसेनेत वरूण सरदेसाई यांचा वावर वाढला आहे. मुंबई सिनेटच्या निवडणुकीत युवासेनेने १० जागा जिंकत विक्रम रचला होता, त्यात वरूण सरदेसाईंची भूमिका महत्त्वाची मानली जात होती
10 / 10
तसेच २०१७ च्या केडीएमसी निवडणुकीत शिवसेनेकडून त्यांना जबाबदारी देण्यात आली होती, तर लोकसभा निवडणुकीचा प्रचारातही महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे विधानसभेत कल्याण पश्चिम मतदारसंघातील उमेदवारीसाठी वरूण सरदेसाई यांचे नाव चर्चेत होतं.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरे