कदम मेन्शन ते शिवतीर्थ...! कसं आहे राज ठाकरेंचं नवं घर? जाणून घ्या, सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2021 04:18 PM2021-11-06T16:18:11+5:302021-11-06T16:21:45+5:30

मागील काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या नव्या घराची प्रचंड चर्चा सुरु आहे. भाऊबीजेच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी कुटुंबासह नव्या घरात प्रवेश केला आहे. राज ठाकरे आणि कृष्णकुंज असं समीकरण महाराष्ट्राला पाहायला मिळालं होतं. आता राज ठाकरेंच्या नव्या घराचं नाव काय असेल याची उत्सुकता होती.

राज ठाकरेंच्या नव्या घराचं नाव ‘शिवतीर्थ’ असं ठेवण्यात आलं आहे. राज ठाकरेंनी गृहप्रवेशासाठी वास्तूविशारद, पंचांग आणि तज्ज्ञांकडून मुहुर्त घेऊन कार्यक्रम आयोजित केला. राज ठाकरे सध्या कृष्णकुंज निवासस्थानी राहतात. पण याच बंगल्याच्या बाजूला शिवतीर्थ नावाची ५ मजली इमारत आहे.

कृष्णकुंजपूर्वी राज ठाकरे कदम मेन्शन याठिकाणी राहत होते. २०००-२००१ मध्ये राज ठाकरे कुटुंबासह कृष्णकुंज निवासस्थानी राहायला आले. हे घर ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी खरेदी करण्याचा विचार केला होता. परंतु काही कारणास्तव ते रद्द केले.

कृष्णकुंज घर हे छत्रपती शिवाजी महाराज पार्काजवळच आहे. याठिकाणचा परिसर पाहून कुणीही हे घर घेण्याच्या मोहात पडेल. लता मंगेशकर यांनी राज ठाकरेंना हे घर घेण्यासाठी सुचवलं. तेव्हा राज ठाकरेही नवं घरं घेण्याच्या तयारीत होते.

कदम मेन्शन हे ठाकरे कुटुंबीयांचे घर. याठिकाणी बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र राहायचे. याच कदम मेन्शनमध्ये शिवसेनेची स्थापना झाली. ठाकरे कुटुंब एकत्र राहायचे. त्यानंतर बाळासाहेबांनी वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी राहायला गेले.

राज ठाकरे कृष्णकुंज येथे राहण्यास आल्यानंतर त्यांची बहीण जयवंती त्यांच्या कुटुंबासह कदम मेन्शन येथे राहतात. कृष्णकुंज येथे २० वर्ष वास्तव्य केल्यानंतर राज ठाकरे आता कुटुंबासह शेजारीच ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी राहायला जाणार आहेत.

राज ठाकरेंचे हे नवीन घर कसं असेल? कोणत्या मजल्यावर काय असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. राज ठाकरे हे राजकीय नेते असले तरी त्याचसोबत एक व्यंगचित्रकारदेखील आहे. त्यामुळे त्यांच्या नव्या घरातही हटके अंदाज पाहायला मिळणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ६ मजली इमारतीत तळमजल्यावर पक्ष कार्यालय, नेत्यांसोबत बैठका, पत्रकार परिषदेसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच याठिकाणी सुसज्ज वाचनालयही आहे. राज ठाकरेंना वाचनाची आवड असल्याने त्यांच्याकडे अनेक पुस्तकांचा संच आहे. त्यामुळे वाचनालय बनवण्यात आलं आहे.

घराच्या सर्वात वरच्या मजल्यावर अत्याधुनिक व्यायामशाळा आहे. घराच्या पहिल्या मजल्यावर प्रशस्त डायनिंग हॉल आहे. राज ठाकरेंच्या या नव्या घरात एक होम थिअटर आहे. घराचे बांधकाम सुरु असताना स्विमिंग पूलही प्रस्तावित होता परंतु काही कारणास्तव रद्द केला.

गेल्या दोन अडीच वर्षापासून राज ठाकरेंच्या नव्या घराचे बांधकाम सुरु होते. घराच्या दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज पार्क आहे. घराचं संपूर्ण डिझाईन राज ठाकरेंनी स्वत: लक्ष घालून बनवलं आहे. सर्व घराची मांडणी राज ठाकरेंच्या नजरेतून झाली आहे.

Read in English