फडणवीसांवर भाजपनं सोपवली मोठी जबाबदारी; फत्ते करणार कामगिरी?

By कुणाल गवाणकर | Published: September 30, 2020 06:26 PM2020-09-30T18:26:01+5:302020-09-30T18:30:06+5:30

गेल्याच आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुंबईतल्या हॉटेलमध्ये भेट झाली. या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली.

शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार असल्याच्या शक्यता या भेटीनंतर अनेकांनी वर्तवल्या. मात्र दोन्ही नेत्यांनी या शक्यता फेटाळून लावल्या.

सामना वर्तमानपत्राला मुलाखत देण्यासंदर्भात भेट झाल्याचं संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनीही सांगितलं.

फडणवीस आणि राऊत यांच्या भेटीनं शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना आता भाजप नेतृत्त्वानं फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ५ वर्ष मुख्यमंत्रीपद म्हणून काम केलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याच नेतृत्त्वाखाली भाजपानं १०५ जागा जिंकल्या.

महाराष्ट्रात सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा क्रमांक ठरला. यानंतर आता बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रभारी म्हणून फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

बिहारमधील पक्षाच्या नेत्यांची संवाद साधल्यानंतर भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी निवडणूक प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव जाहीर केलं.

बिहारमधल्या २४३ मतदारसंघांत तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. भाजप संयुक्त जनता दल आणि लोक जनशक्ती पक्षासोबत निवडणूक लढत आहे.

लोक जनशक्ती पक्षासोबत अद्याप जागावाटपाची चर्चा सुरू आहे. भाजपकडून देण्यात आलेली ऑफर लोक जनशक्ती पक्षाला मान्य नसल्यानं बैठकांचं सत्र सुरू आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजप तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. त्या निवडणुकीत संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीनं भाजप आणि मित्रपक्षांचा पराभव केला होता. आता या निवडणुकीत संयुक्त जनता दल भाजपसोबत आहे.