लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 19:18 IST
1 / 7उत्तर प्रदेशात पोलिसांनी ज्या संशयितांना अटक केली, ते आहे जम्मू काश्मीर पोलिसांचं ऑपरेशन! याची सुरुवात झाली श्रीनगरमध्ये लावल्या गेलेल्या जैश ए मोहम्मदच्या पोस्टरपासून. लष्कर, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना धमकी देणाऱ्या या पोस्टर्सचा तपास केला. त्यांनी काही तरुणांची चौकशी केली. त्यांनी एका डॉक्टरचं नाव सांगितलं आणि त्याच्याकडे रायफल असल्याचेही तरुण म्हणाले. त्या डॉक्टरच नाव आदिल राठर!2 / 7याच ३१ वर्षीय आदिल राठरच्या लग्नात मोठा घातपात घडवण्याचा कट शिजला. अनंतनाग या जिल्ह्याच्या ठिकाणापासून १९-२० किमी अंतरावर असलेल्या काजीगुंडमधील वैद्यकीय महाविद्यालयात त्याने शिक्षण पूर्ण केले. डॉक्टर असलेल्या आदिलला जम्मू काश्मीर पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने सहरनपूरमध्ये अटक केली. ती तारीख होती ६ नोव्हेंबर.3 / 7त्याला अटक केल्यानंतर दहशतवाद्यांच्या नेटवर्कच्या एक एक कड्या सुटत गेल्या. त्यातली पहिली कडी की या सगळ्यांचा प्लॅन कुठे ठरला. ते कुठे भेटले. तर हे सगळे भेटले एका लग्नात. विश्वसनीय सूत्रांनी हिंदुस्थान टाईम्सला सांगितले की, डॉ. आदिल राठरचे लग्न ठरले. ते झाले ४ ऑक्टोबर २०२४ रोजी श्रीनगरमध्ये.4 / 7या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आदिलच्या लग्नातच नेटवर्कमधील दहशतवाद्याच्या बैठकीसाठी ठिकाण निश्चित केलं गेलं. तिथेच आदिलचे सहरनपूर रुग्णालयातील दोन सहकारी डॉ. अस्लम झैदी आणि डॉ. बिलाल अहमद हे लग्नाला उपस्थित होते.5 / 7पोलिसांनी त्या दोघांना चौकशीसाठी उचलले आणि लग्नाला आणखी कोण कोण होते, याचा तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, लखनौमधून अटक केलेला डॉ. परवेझ अन्सारी आणि फरिदाबादमधून अटक केलेली त्याची डॉक्टर बहीण शाहीन शाहीद हे दोघेही त्या लग्नाला हजर होते.6 / 7लग्न समारंभ झाल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या या दहशतवाद्यांचं घातपात कट सुरू झाला असावा, असा संशय आहे. कारण त्यानंतरच लष्कराच्या जवानांना धमक्या देणारे पोस्टर्स लावले गेले आणि शस्त्र पुरवठ्या जुळवा जुळव त्याचबरोबर त्यासाठी लागणारा पैसा जुळवायला त्यांनी छुप्या मार्गाने सुरुवात केली.7 / 7आदिलला पाच लाख रुपये पगार होता, पण तो साध्या आणि भाड्याच्या घरात राहत होता. ज्यावेळी श्रीनगरमध्ये पोस्टर्स झळकले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने झाडाझडती घेणं सुरू केलं आणि त्यात आदिल त्यांना फिरताना दिसला. त्याच्यावर नजर ठेवल्यानंतर तो पाकिस्तानातील हॅण्डलर्सच्या संपर्कात असल्याचंही उघड झालं. त्यानंतर त्याचा ठिकाणा शोधला गेला आणि ६ नोव्हेंबर रोजी त्याला अटक करण्यात आली. आदिलवर सगळ्या कटाची व्यूहरचना आणि त्यासाठी लागणारा पैसा जमवण्याची जबाबदारी होती.