By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 12:01 IST
1 / 10भारतात हजारो मंदिरांमध्ये आताच्या घडीला लाखो किलो सोने पडून असल्याचे सांगितले जात आहे. एकट्या तामिळनाडू राज्यातील मंदिरांमध्ये तब्बल २ हजार १३७ किलो सोने पडून असल्याची माहिती मिळाली आहे. 2 / 10यातच आता तामिळनाडूमधील एम. के. स्टॅलिनचे द्रमुक सरकार मंदिरांमध्ये पडून असलेल्या सोन्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावण्याच्या तयारीत आहे. मंदिरातील काही सोने बँकेत ठेवून त्यावर मिळणारे व्याज सरकारी तिजोरीत जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. 3 / 10मंदिरांच्या ताब्यात असलेले सोने वर्षानुवर्ष नुसते पडून राहते. त्याचा वापर कुठेही केला जात नाही. याच पार्श्वभूमीवर तामिळनाडू सरकारने एक योजना आणली असून, या मंदिरातील सोन्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावले जाणार आहेत. सरकारच्या सांगण्यानुसार, या मिळालेल्या पैशांचा सदुपयोग मंदिराच्या विकासासाठी केला जाणार आहे.4 / 10तामिळनाडू सरकारच्या या योजनेअंतर्गत थिरुवरकाडू येथील श्री कुमारीअम्मन मंदिर, समयापुरम येथील मरिअम्मन मंदिर आणि एरुक्कनकुडी येथीलही मरिअम्मन मंदिरातील सोने वितळवले जाणार आहे. या वितळवलेल्या सोन्याचे २४ कॅरेट्सचे बार तयार केले जाणार आहेत. 5 / 10सोने वितळवून तयार करण्यात येणारे २४ कॅरेट्सचे बार राष्ट्रीय बँकांमध्ये जमा केले जाईल आणि त्यातून येणारे व्याज स्टेट हिंदू चॅरिटेबल अँड रिलिजियन्स एन्डोमेंट्स विभागाला दिले जाणार असून, या विभागाच्या माध्यमातून मंदिरांचा विकास केला जाणार आहे. 6 / 10सरकारच्या माहितीनुसार, केवळ भक्तांनी दान केलेले सोन्याचे दागिने वितळवले जाणार आहेत. जे गेल्या १० वर्षांपासून वापरात नाही. मात्र, मंदिराच्या पारंपारिक सोन्याच्या अलंकारांना हातही लावला जाणार नाही. ते तसेच कायम राहतील, असे म्हटले जात आहे. दुसरीकडे, सरकारच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 7 / 10सरकारच्या या योजनेत पारदर्शकता नसल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. दरम्यान, आताच्या घडीला तामिळनाडूमधील नऊ प्रमुख मंदिरांमध्ये दान केलेले सोने वितळवले जात आहे. ५०० किलो सोन्यातून सरकारला ११ कोटींचे व्याज मिळत आहे. या सोन्याचे मूल्य १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. 8 / 10तामिळनाडू सरकारने सांगितले आहे की, मंदिरांमधील सोने मॉनेटाइज करण्याची योजना सन १९७९ पासून सुरू आहे. गेल्या सुमारे ४२ वर्षांपासून ही योजना सुरू आहे. या अंतर्गत भक्तांनी दान केलेले सोने वितळवले जाते. 9 / 10या मंदिरांमध्ये मदुराईमधील प्राचीन मीनाक्षी सुंदरीश्वर मंदिर, पलानीमधील धनधायथापनी मंदिर, तिरुचेंदूरमधील श्री सुब्रमण्यम स्वामी मंदिर आणि समपुरममधील मरिअम्मन मंदिरांचा समावेश करण्यात आला आहे. 10 / 10या नऊ प्रमुख मंदिरांमध्ये असलेले सोने भाविकांनी दान केलेले असल्यामुळे सरकारला या सोन्याला हात लावण्याचा अधिकार नाही, असा दावा उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या याचिकेत करण्यात आला आहे.