शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 16:35 IST

1 / 5
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी देशासमोरील विविध प्रश्नांवर भाष्य करताच देशाच्या सुरक्षेबाबत एक मोठी घोषणा केली. नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अंतर्भागातील महत्त्वाची ठिकाणे, मोठी शहरे, प्रकल्प, लष्करी तळ, उद्योगधंदे आदींच्या सुरक्षेसाठी भारताचं सुदर्शन चक्र हे स्वदेशी सुरक्षा कवच पुढच्या १० वर्षांमध्ये तयार करण्याची घोषणा केली आहे.
2 / 5
सध्या जगातील विविध भागात निर्माण झालेली युद्धसदृश्य परिस्थिती आणि भारताच्या शेजारील पाकिस्तान, चीन आदी देशांकडून सीमाभागात वारंवार होणारी आगळीक या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी केलेली स्वदेशी सुरक्षा कवच विकसित करण्याची घोषणा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा आणि सुदर्शन चक्र या सुरक्षा कवचाबाबत आणण आज माहिती घेऊयात.
3 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी सुरक्षा कवच दहा वर्षांत विकसित करण्याचे लक्ष्य देशासमोर ठेवले आहे. तसेच त्याचं सुदर्शन चक्र असं नामकरण करण्यात आलं आहे. भारताकडून विकसित करण्यात येत असलेलं हे सुरक्षा कवच आयरन डोम, थाड, एस-४०० सारख्या सुरक्षा कवचांपेक्षा अधिक प्रभावी आणि शक्तिशाली असेल असा दावा करण्यात येत आहे. सध्या भारताकडे एस-४०० ही सुरक्षा प्रणाली आहे. ही सुरक्षा प्रणाली रशियाकडून आयात करण्यात आलेली आहे.
4 / 5
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी सुदर्शन चक्र या मोहिमेबाबत उल्लेख करताना सांगितले की, मी एक संकल्प केला आहे. त्यासाठी मला देशवासियांचा आशीर्वाद हवा आहे. कारण समृद्धी कितीही असली तरी सुरक्षा नसेल तर ती निरुपयोगी ठरले. म्हणूनच पुढच्या दहा वर्षांमध्ये २०३५ पर्यंत देशातील लष्करी तळ, नागरी क्षेत्र अशा सर्व महत्त्वाच्या ठिकाणी हे सुरक्षा कवच सक्रिय करता येईल. हे सुरक्षा कवच सातत्याने विस्तारित केले जाईल. देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वाटलं पाहिजे. कुठलंही तंत्रज्ञान आलं तरी त्यांचा सामना करण्यास हे सुरक्षा कवच सक्षम असलं पाहिजे, असेही नरेंद्र मोदींनी सांगितले .
5 / 5
दरम्यान, देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी पुढे म्हणाले होते की, आम्ही श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राचा मार्ग निवडला आहे. आता देश मिशन सुदर्शन चक्र सुरू करेल. हे सुदर्शन चक्र एक शक्तिशाली अस्त्र असून, शत्रूचा हल्ला परतवून लावण्याचं काम करेल. तसेच शत्रूवर पलटवार करण्याचं कामही करेल. या मोहिमेसाठी आम्ही काही मूलभूत गोष्टी निश्चित केल्या आहेत, असेही मोदींनी आपल्या भाषणात सांगितले.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndependence Dayस्वातंत्र्य दिनDefenceसंरक्षण विभाग