प्रतिभावान! हात नाहीत... 'तिने' पायांना बनवली आपली ताकद; सुंदर चित्र काढत मिळवली ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 09:22 AM2023-06-01T09:22:12+5:302023-06-01T09:29:44+5:30

स्वप्ना ऑगस्टाइन यांची अप्रतिम कला पाहून सर्वच जण भारावतात. सुंदर पेटींग लक्ष वेधून घेतात पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता.

प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. स्वप्ना ऑगस्टाइन यांची अप्रतिम कला पाहून सर्वच जण भारावतात. सुंदर पेटींग लक्ष वेधून घेतात पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक आव्हानांचा त्यांनी सामना केला.

वयाच्या 12 व्या वर्षापर्यंत, स्वप्ना ऑगस्टाइन यांना असं वाटत होतं की त्यांचे हात अद्याप शरीरातून बाहेर आलेले नाहीत. वाढत्या वयाबरोबर ही आशा संपुष्टात आली. त्यांना कटू सत्य कळू लागले. स्वप्ना यांना कळून चुकलं की त्या आता हातशिवाय राहणार आहेत. मात्र, यामुळे त्या खचल्या नाहीत.

हात नसताना स्वप्ना यांनी त्यांच्या पायाला सर्वात मोठं बळ बनवलं. त्यांनी पायाने अशी कलाकृती केली की जग बघतच राहिलं. त्या जगप्रसिद्ध चित्रकार आहेत. वर्ल्ड मल्याळी फाऊंडेशनने त्यांना 'आयकॉन ऑफ द इयर 2018' या पुरस्काराने सन्मानित केलं आहे. हा संपूर्ण देशाचा अभिमान आहे.

स्वप्ना त्यांची चित्रं MFPA फोरमला विकतात. हा मंच आपल्या सर्व सदस्यांना मासिक मानधन देतो. मग त्याचे योगदान असो वा नसो. 1999 पासून स्वप्न फोरमच्या मेंबर आहेत. स्वप्ना ऑगस्टाइन यांचा जन्म 21 जानेवारी 1975 रोजी पोथनिकड, एर्नाकुलम, केरळ येथे झाला. जन्मापासून त्यांना दोन्ही हात नाहीत.

वडील ऑगस्टाइन शेतकरी होते आणि आई सोफी गृहिणी होती. वयाच्या सहाव्या वर्षी स्वप्ना यांचं नाव अपंगांच्या शाळेत (मर्सी स्कूल) दाखल केलं गेलं. तेव्हापासून त्यांनी पायांनी चित्रे काढायला सुरुवात केली. त्यांचा कलाकार होण्याचा प्रवास इथून सुरू झाला असे म्हणता येईल.

स्वप्ना यांना पेंटिंग, ड्रॉइंगसह सर्व कामे पायाने करण्याची सवय लागली होती. प्रतिभा लहान वयातच पालक आणि शिक्षकांनी ओळखली. त्यांनी स्वप्ना यांना चित्रकला सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली.

चार भावंडांमध्ये स्वप्ना सर्वात मोठ्या होत्या. प्रसूतीनंतरच स्वप्ना हाताशिवाय राहणार असल्याचं त्यांच्या आईला सांगण्यात आले होतं. चार वर्षांनी स्वप्ना ऑगस्टाइन यांनी पेन्सिल पायाच्या बोटांनी धरली. यात इतके प्रभुत्व मिळवले की कोणत्याही अडचणीशिवाय लेखनासह स्केचिंग करण्यास सुरुवात केली.

अलाप्पुझा येथील सेंट जोसेफ कॉलेजमधून स्वप्ना यांना इतिहासात पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वप्ना यांनी त्यांचे लक्ष चित्रकलेवर केंद्रित केले. अॅक्रेलिक पेंटिंगची कार्यशाळाही केली. हळूहळू त्या चित्रकलेच्या व्यावसायिक पद्धतींकडे वळू लागली.

कॅनव्हासवर चित्र काढण्यास सुरुवात केली. स्वप्नाला केरळमधील एका मैत्रिणीद्वारे माऊथ अँड फूट पेंटिंग आर्टिस्ट (MFPA) बद्दल माहिती मिळाली. मैत्रिण म्हणाली की, स्वप्ना यांनी त्यात सहभागी व्हावे.

MFPA ही दिव्यांग कलाकारांसाठी आंतरराष्ट्रीय नोंदणीकृत संस्था आहे. स्वप्ना 1999 मध्ये सदस्य झाल्या आहेत. या इंटरनॅशनल सोसायटीमध्ये निवडलेल्या 27 भारतीय कलाकारांमध्ये आहेत. यानंतर स्वप्ना यांनी मागे वळून पाहिलं नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.