PM नरेंद्र मोदी आज भारतात परतणार; भाजपने केली भव्य स्वागताची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 07:10 PM2023-06-25T19:10:16+5:302023-06-25T19:13:28+5:30

PM Modi US Egypt Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिके आणि इजिप्त दौऱ्यावरुन भारतात परतणार आहेत.

PM Modi Welcome: पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (25 जून) रात्री त्यांच्या अमेरिका आणि इजिप्तच्या दौऱ्यावरून परतणार आहेत. पीएम मोदींचे विमान रात्री 12.30 वाजता पालम विमानतळावर पोहोचेल. यावेळी पंतप्रधानांच्या भव्य स्वागतासाठी भाजपने मोठी तयारी केली आहे. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी दिल्लीचे सर्व खासदार विमानतळावर उपस्थित राहणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा स्वतः रात्री 11:45 वाजता विमानतळावर पोहोचतील.

पंतप्रधान मोदी 20 जून रोजी अमेरिकेच्या पहिल्या राजकीय दौऱ्यावर गेले होते. तिथे पंतप्रधान मोदींनी 21 जून रोजी न्यूयॉर्कमधील यूएन मुख्यालयात पहिल्यांदा योग दिन साजरा केला. यानंतर PM मोदींनी आघाडीच्या कंपन्यांच्या सीईओंचीसोबत बैठक घेऊन चर्चा केली. यानंतर पंतप्रधानांचे व्हाईट हाऊसमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. तिथे त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ शासकीय भोजनाचे आयोजन केले होते. अमेरिकेसोबत अनेक करार करण्यासोबतच पंतप्रधानांनी अमेरिकन संसदेलाही संबोधित केले. हे त्यांचे दुसरे संबोधन होते. याआधीही 2016 मध्ये त्यांनी अमेरिकन संसदेला संबोधित केले होते. यावेळी अमेरिकन खासदारांनी पंतप्रधानांना अनेकवेळा मोठ्याने टाळ्या वाजवत दादही दिली. याशिवाय, पंतप्रधानांनी वॉशिंग्टनमधील भारतीय समुदायालाही संबोधित केले.

अमेरिकेला दौऱ्यानंतर पंतप्रधान शनिवारी (24 जून) इजिप्तच्या दोन दिवसांच्या राज्य दौऱ्यावर कैरोला पोहोचले. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष एल-सिसी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी इजिप्तच्या दौऱ्यावर गेले होते. गेल्या 26 वर्षांत भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच इजिप्त भेट आहे. यादरम्यान, त्यांनी दोन्ही देशांमधील संबंध अधिक बळकट करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्यासह इजिप्शियन नेत्यांशी चर्चा केली.

पंतप्रधानांनी रविवारी दाऊदी बोहरा समुदायाच्या मदतीने बांधलेल्या 11व्या शतकातील अल-हकीम मशिदीलाही भेट दिली. ही मशीद फातिमी राजवंशाच्या राजवटीत बांधण्यात आली होती. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कैरो येथे 'ऑर्डर ऑफ द नाईल' पुरस्काराने सन्मानित केले. ऑर्डर ऑफ द नाईल, हा इजिप्तचा सर्वोच्च राज्य सन्मान आहे.