1 / 7जम्मू काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केली होती. या घटनेला आज एक महिना पूर्ण झाला आहे. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करत पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला होता. 2 / 7मात्र महिना उलटून गेला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि इतर सुरक्षा दले जंग जंग पछाडत आहेत. मात्र या दहशतवाद्यांचा अद्याप काहीही सुगावा लागलेला नाही. त्यामुळे हे दहशतवादी नेमके गेले कुठे? त्यांना पकडण्यात यश का येत नाही आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 3 / 7 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षादलांकडून शोधमोहीम आणि डिस्ट्रॉय ऑपरेशन सुरू आहे. आता ही शोधमोहीम पहलगामपासून सुरू होऊन दक्षिण आणि पश्चिम काश्मीरमधील घनदाट जंगलांपर्यंत पोहोचली आहे. मात्र सध्यातही ही शोधमोहीम गवतामध्ये सुई शोधण्यासारखी बनली आहे. 4 / 7याबाबत गुप्तचर विभागातील सूत्रे सांगतात की, या दहशतवादी हल्ल्याला अगदी नियोजनबद्ध पद्धतीने तडीस नेण्यात आले होते. तसेच हा हल्ला केल्यानंतर दहशतवादी आधीपासून हेरून ठेवलेल्या कुठल्यातरी सुरक्षित ठिकाणी लपले आहेत. त्यांनी शस्त्र सोडून दिली असण्याची शक्यता आहे. तसेच रेशन आणि इतर आवश्यक सामान त्यांनी आधीच जमवून ठेवलेलं असावं. तसेच ते सध्या पूर्णपणे रेडियो सायलेन्स मोडमध्ये असावे. हिमालयातील घनदाट जंगलं आणि दुर्गम परिसरामुळे या दहशतवाद्यांची शोधमोहीम आणखीनच कठीण बनली आहे. 5 / 7गुप्तचर यंत्रणांना आतापर्यंत कुठलाही इंटरसेप्ट, हँडलर्ससोबतचं संभाषण, हीट सिग्नेचर किंवा मानवी हालचालींची माहिती मिळालेली नाही. या बाबी अशा मोहिमांमध्ये महत्त्वाच्या असतात. 6 / 7सध्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरू असलेली शोधमोहीम ही घनदाट जंगलांमध्ये जवानांच्या गस्तीद्वारे राबवली जात आहे. त्यात अनंतनागपासून कोकरानाग, त्रालपासून श्रीनगरमधील डाचिगाम जंगलापर्यंत या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. याचा अर्ध या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. 7 / 7अधिकाऱ्यांनी सांगितले की, या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठीच्या मोहिमेमध्ये कुठल्याही प्रकारची शिथिलता आलेली नाही. तसेच लष्कराकडून शक्यतोपरी प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक लोकांकडूनही सहकार्य मागितलं जात आहे. मात्र दहशतवाद्यांचं मौन आणि सुनियोजित रणनीतीमुळे शोहमोहीम गुंतागुंतीची बनली आहे. या दहशतवाद्यांच्या टोळीचा बीमोड करण्यासाठी दहशतवाद्यांविरोधातील मोहिमा अधित तीव्र करण्यात आल्या आहेत.