शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 20:30 IST

1 / 5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये संघर्षाला तोंड फुटले होते. तसेच आज सकाळपर्यंत दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या हद्दीत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात येत होता. मात्र आज संध्याकाळी अचानक दोन्ही पक्षांनी शस्त्रसंधी जाहीर केल्याने सारे जग अवाक् झाले आहे. संघर्ष शिगेला पोहोचला असताना दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी नेमके कसे काय राजी झाले. तत्पूर्वी मागच्या ४८ तासांमध्ये दोन्ही देशांत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमके काय घडले याचा घेतलेला हा आढावा.
2 / 5
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान हे तत्काळ संघर्षविरामासाठी राजी झाले आहेत, अशी घोषणा केली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी कशी काय झाली यामागची कहाणी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एक्सवर सांगितली आहे. रुबियो यांनी सांगितले की, मागच्या ४८ तासांमध्ये अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स आणि मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि असीम मलिक यांच्यासह भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
3 / 5
त्यानंतर दोन्ही देश तत्काळ युद्धविराम लागू करण्यासाठी राजी झाले. तसेच तटस्थ ठिकाणी व्यापक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सहमत झाले. आम्ही शांततेचा मार्ग स्वीकारल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांची बुद्धिमत्ता, विवेक आणि राजकीय परिपक्वतेचं कौतुक करतो, असेही मार्को रुबियो म्हणाले.
4 / 5
दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आज दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी पाकिस्तानच्या डीजीएमओनी भारताच्या डीजीएमओंना फोन केला. यावेळी झालेल्या चर्चेत आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून दोन्ही देश जमीन आकाश आणि पाण्यामधून होत असलेले हल्ले तत्काळ प्रभावाने थांबवण्यावर सहमत झाले आहेत. त्यानुसार दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. आता दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ मे रोजी पुढील चर्चा करतील, असेही विक्रम मिस्त्री यांनी सांगितले.
5 / 5
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत आणि पाकिस्तानमध्ये गोळीबार आणि लष्करी कारवाई रोखण्यासाठी थेट चर्चा झाली. आज दुपारी पाकिस्तानच्या डीजीएमओ यांनी भारताला चर्चेसाठी फोन केला. त्यानंतर शस्त्रसंधीवर चर्चा झाली आणि युद्धविरामावर दोन्ही देशांचं एकमत झालं. मात्र कुठल्याही त्रयस्त ठिकाणी चर्चा करण्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. दरम्यान, पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इसार डार यांनी पाकिस्तान आणि भारत हे तत्काळ प्रभावाने शस्त्रसंधीसाठी सहमत झाले आहेत, असं ट्विट केलं होतं.
टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानUnited Statesअमेरिका