शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रेखा गुप्तांचं पारडं का ठरलं जड, विरोधकांना रोखण्यासाठी भाजपची स्ट्रॅटजी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:42 IST

1 / 8
CM Rekha Gupta Explained in Marathi: प्रवेश वर्मा, विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय, पवन शर्मा, शिखा राय आणि आशिष सूद ही नावे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होती. पण, भाजपने नवा आणि चर्चेत नसलेला चेहरा समोर आणत आश्चर्याचा धक्का दिला. पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या रेखा गुप्ता यांना भाजपने मुख्यमंत्री का केले, याबद्दलच आता राजकीय चर्चेने फेर धरला आहे.
2 / 8
अनेक पर्याय असताना भाजपने दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी रेखा गुप्ता यांची निवड का गेली आणि एका महिला आमदारांकडे दिल्लीची सूत्र का सोपवण्यात आली? तर यामागे भाजपची रणनीती आहे. भाजपची ही रणनीती दिल्लीत प्रबळ असलेल्या अरविंद केजरीवालांना निष्प्रभ करण्याबरोबरच इतर समीकरणांचा समतोल साधण्याची आहे.
3 / 8
रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करून भाजपने दिल्लीतीलच नव्हे, तर देशाभरातील सामाजिक, राजकीय समीकरणे अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. सरकार स्थापन करताना भाजपने सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केला आहे.
4 / 8
रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री करण्याचे प्रमुख कारण सांगितले जात आहे, ते म्हणजे अरविंद केजरीवालांना जातीय समीकरणात मात देण्याचा प्रयत्न. माजी मुख्यमंत्री केजरीवाल हे वैश्य समुदायातून येतात. वैश्य समुदाय भाजपचा मूळ मतदार मानला जातो. दिल्लीत या समुदायाचा मतदार मोठ्या संख्येने आहे. रेखा गुप्ता या याच समुदायातील आहेत. त्यांची निवड करून भाजपने हे समीकरण साधले आहे.
5 / 8
महिला व्होटबँकेचे गणित कायम ठेवण्याची रणनीतीही या निर्णयामागे आहे. प्रत्येक निवडणुकीत भाजपला महिला मतदारांचे समर्थन मोठ्या प्रमाणात मिळत आहे. भाजपची दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी देशातील १३ राज्यात आणि एका केंद्र शासित प्रदेशात सत्ता आहे. पण, एकही महिला मुख्यमंत्री नाही. भाजपला महिलांची मते फक्त मते हवीत, अशी कोंडी विरोधकांकडून केली जाऊ शकते. हे एक कारण गुप्ता यांच्या निवडीमागे आहे.
6 / 8
रेखा गुप्ता यांच्या निवडीमागे माजी मुख्यमंत्री अतिशी हा फॅक्टरही आहे. केजरीवालांनी राजीनामा दिल्यानंतर अतिशींकडे म्हणजे महिलेकडे सूत्रे दिली होती. आताही विधानसभेत अतिशी या विरोधी पक्षनेत्या असू शकतात. त्यांच्याविरोधात एक महिला चेहरा दिल्याने केजरीवालांचा रणनीतीला मर्यादा येतील. ही केजरीवालांविरोधात मोठी राजकीय खेळी आहे.
7 / 8
रेखा गुप्ता यांच्या निवडीमागे आणखी एक कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ! रेखा गुप्ता या संघांशी जोडलेल्या आहेत. मागील ३० वर्षांपासून त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करतात. पुढील तीन वर्षात देशातील २१ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, तिथे महिला मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांचा चेहरा पुढे केला जाईल.
8 / 8
भाजपने मंत्रिमंडळ स्थापन करतानाही सामाजिक समीकरणांचा विचार केला आहे. प्रवेश वर्मा हे जाट समुदायातून येतात. आशिष सूद हे पंजाबी आहेत. मनजिंदर सिंह सिरसा हे शीख समुदायाचं प्रतिनिधित्व करतात. रवींद्र सिहं हे दलित समुदायातून येतात. कपिल मिश्रा हे ब्राह्मण समुदायातून येतात, त्याचबरोबर पंकज कुमार सिंह हे राजपूत समुदायाचं प्रतिनिधित्व करतात. अशा पद्धतीने भाजपने सोशल इंजिनिअरिंग केले आहे.
टॅग्स :New Delhiनवी दिल्लीdelhiदिल्लीDelhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Chief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा