शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सिंधु जल कराराला स्थगिती दिल्यानं पाकिस्तानात दुष्काळ?; सॅटेलाईट इमेजनं खरं चित्र उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 14:16 IST

1 / 10
काश्मीरच्या पहलगाम येथील मागील महिन्यात दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यात पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करणे, सिंधु जल कराराला स्थगिती यासारखे मोठे निर्णय घेतले गेले.
2 / 10
यात विशेषत: सिंधु जल कराराबाबत विविध दावे केले जात आहेत. भारतातही सोशल मीडियावर सिंधु कराराला स्थगिती दिल्याने पाकिस्तानात नद्यांमधील पाणी संपेल, त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल असं सांगितले जात आहे तर भारताने अचानक सोडलेल्या पाण्यामुळे पीओके आणि आसपासच्या परिसरात पूर आल्याचं पाकिस्तानी सोशल मीडियावरील नेटिझन्स बोलत आहेत.
3 / 10
तपासणीत हे दोन्हीही दावे सत्य नसल्याचं समोर आले. इंडिया टुडेने सरकारी आकडे आणि सॅटेलाईट फोटोंच्या आधारे भारत-पाकिस्तान यांच्यातील नद्यांच्या पाण्याचा आढावा घेतला. त्यात भारताने घेतलेल्या सिंधु जल करार स्थगिती निर्णयाने काही फरक न पडल्याचं चित्र दिसून आले आहे.
4 / 10
सिंधु जल करारानुसार पाकिस्तानच्या नद्या सिंधु, चिनाब, झेलम ३० एप्रिलपर्यंत तशाच प्रवाहित आहेत जशा पहलगाम हल्ल्यापूर्वी होत्या. परंतु भारताकडून हाइड्रोलॉजिकल डेटा न दिल्याने पाकिस्तानच्या सिंचन प्रक्रियेत आणि पूर नियंत्रण यंत्रणेवर परिणाम पडण्याची शक्यता आहे.
5 / 10
पाकिस्तानला जाणारे पाणी सामान्यपणे वाहत आहे परंतु याचा अर्थ सिंधु जल कराराला स्थगिती देण्याचा भारताने जो निर्णय घेतला त्याचा परिणाम होत नाही असं नाही. रिपोर्टनुसार, भारताकडून पाकिस्तानला पाणी सोडण्याबाबत कुठलाही डेटा दिला जात नाही. त्यामुळे पाकमधील शेती आणि पूर रोखण्यासाठी उभारलेल्या यंत्रणेवर परिणाम होऊ शकतो.
6 / 10
यूरोपीय अंतराळ संस्थेनेही सॅटेलाईट इमेजद्वारे सिंधु जल करारातंर्गत येणाऱ्या नद्यांचे फोटो घेतलेत. त्यातून या कराराला स्थगिती दिल्यानंतरही पाण्याचा प्रवाह न बदलल्याचं दिसून आले. भारतात बांधलेले झेलम नदीवरील उरी धरण, चिनाबवरील बगलीहार आणि सिंधु नदीवरील नीमू बाजगो धरणे यातील पाण्याची स्थिती जैसे थे असल्याचं समोर आले.
7 / 10
त्याशिवाय पाकिस्तानात या नद्यांवर बांधलेले धरण मंगला, मराला आणि जिन्ना बेराज यांचाही प्रवाह सामान्य दिवसांप्रमाणे सुरू असल्याचं सॅटेलाईट इमेजद्वारे दिसून आले
8 / 10
पाणी थांबवणे कठीण - नद्यांच्या पाण्याला नियंत्रित करणे सहज सोपे नाही. त्यासाठी मोठी धरणे, कालवा यांची आवश्यकता आहे. त्यासाठी दीर्घ वेळ, साहित्य आणि बजेट लागेल. सध्या भारताकडे अशी कुठलीही व्यवस्था नाही जेणेकरून ते पाकिस्तानला जाणारे पाणी रोखतील. सध्या पाण्याचा प्रवाह तितकाच आहे जितका तो आधी होता.
9 / 10
चिनाब नदी पाकिस्तानच्या पंजाब प्रांताची लाईफ लाइन मानली जाते. त्याचा वापर कृषी आणि पिण्यासाठी केला जातो. जर याठिकाणचे पाणी थांबले तर इथली परिस्थिती भयंकर होईल. हा परिसर वाळंवटासारखा होईल आणि लोक भूकेने मरतील असं सांगितले जाते.
10 / 10
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवला जात आहे. अमेरिकेने भारत आणि पाकिस्तान यांच्या सरकारशी संपर्क साधत युद्ध टाळण्याचं आवाहन केले आहे. त्याशिवाय दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पाठिंबा असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला