शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 22:02 IST

1 / 8
यंदाच्या पावसाळ्यात हिमालयातील पर्वतीय भागात मुसळधार पाऊस, ढगफुटी, पूर आणि भूस्खलनासारख्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती आल्याने मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे दार्जिलिंगपासून ते माऊंट एव्हरेस्टपर्यंत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला असून, दार्जिलिंगमध्ये १८ तर नेपाळमध्ये ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. एवढंच नाही तर शेकडो लोक हिमालयीन भागात अडकले आहेत. त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे दार्जिलिंग आणि हिमालयीन भागात भूस्खलनाच्या घटना वारंवार का घडतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच त्याची काही कारणं समोर येत आहेत.
2 / 8
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार दार्जिलिंग, नेपाळ आणि आजूबाजूच्या हिमालयीन क्षेत्रामध्ये असामान्यपणे मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे हे नुकसान झालं आहे. तसेच या परिसरात जी परिस्थिती आहे, त्यामुळे हे भूस्खलन झालं आहे.
3 / 8
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तर बंगाल आणि पूर्व नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी दार्जिलिंगमध्ये केवळ १२ तासांत ३०० मिमीहून अधिक पाऊस पडला.
4 / 8
मान्सूनच्या परतीनंतर हवामानात असा बदल सर्वसाधारणपणे होत नाही. अशी पर्जन्यवृष्टी सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत होते. मात्र ऑक्टोबरमध्ये पडलेला पाऊस हा अनपेक्षित आणि आश्चर्यकारक असून, त्यामुळे दार्जिलिंग, कालिम्पोंग, नेपाळमधील कोसी प्रांत आणि माऊंट एव्हरेस्टपर्यंत मोठी आपत्ती आली.
5 / 8
नेपाळमधील कोसी प्रांत आणि इलाम जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलनासारख्या घटना घडल्या. तज्ज्ञांच्या मते वातावरणातील बदलांमुळे अशा घटना वाढत आहेत. त्यामुळे आपत्ती ह्या अधिक गंभीर बनत आहेत.
6 / 8
वातावरणातील बदलांमुळे हिमालयीन क्षेत्रांमध्ये कमी वेळात मुसळधार आणि अधिक पाऊस पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. वाढत्या तापमानामुळे दक्षिण आशियाई मान्सून अधिक तीव्र होत आहे. तसेच ढगफुटीसारख्या घटना घडत आहेत. नेपाळमध्ये २०२४-२५मध्ये अशा ढगफुटीच्या घटनांमध्ये २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
7 / 8
तसेच मोठ्या प्रमाणावर झालेल्या वृक्षतोडीमुळे माती धरून ठेवणाऱ्या मुळांचं प्रमाण कमी झालं आहे. त्यामुळे उतारावर अधिक प्रमाणात भूस्खलनाच्या घटना होत आहेत. पृथ्वीच्या पृष्टभागाखालील टेक्टॉनिक प्लेट अस्थिर होत आहेत, तर वृक्षतोडीमुळे ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे.
8 / 8
सध्या नेपाळमधील सात पैकी पाच राज्यांमध्ये मान्सून सक्रिय आहे. त्यामुळे कोसी, मधेशी, बागमती, गंडकी आणि लुंबिनीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर माऊंट एव्हरेस्टच्या क्षेत्रामध्ये हिमवृष्टी आणि भूस्खलनामुळे अनेक ट्रेकर्स तिथे अडकले आहेत.
टॅग्स :floodपूरlandslidesभूस्खलनNepalनेपाळwest bengalपश्चिम बंगाल