Corona Vaccination: कोविशील्ड लस घेतलेल्यांना मोठा दिलासा; कोवॅक्सिन घेतलेल्यांच्या अडचणीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 09:30 PM2021-09-21T21:30:12+5:302021-09-21T21:37:04+5:30

Corona Vaccination: कोवॅक्सिन घेतलेल्यांच्या अडचणी कायम; कोविशील्ड घेतलेल्यांना दिलासा

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाला वेग दिला जात आहे.

देशातील लसीकरण अभियानात कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचा सर्वाधिक वापर होत आहे. कोवॅक्सिन लस संपूर्णपणे भारतात तयार झाली आहे. लसीसाठीचं संशोधन आणि तिची निर्मिती भारतात झाली आहे. तर कोविशील्डसाठीचं संशोधन ब्रिटनमध्ये झालं असून भारतातील सीरम इन्स्टिट्यूट या लसीचं उत्पादन करत आहे.

सीरमची उत्पादन क्षमता प्रचंड असल्यानं देशातील सर्वाधिक नागरिकांना कोविशील्डची लस मिळाली आहे. तर भारत बायोटेकची उत्पादन क्षमता कमी असल्यानं कोवॅक्सिन घेतलेल्यांचे प्रमाण तुलनेनं कमी आहे. आता कोविशील्ड घेतलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर कोवॅक्सिन घेतलेल्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

अमेरिकेनं प्रवासी हवाई वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासून जगातल्या ३३ देशांमधील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश मिळेल. मात्र त्यासाठी लसीकरणाची अट ठेवण्यात आली आहे. दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनाच अमेरिकेत प्रवेश असेल.

जागतिक आरोग्य संघटना आणि एफडीएनं मान्यता दिलेल्या कंपन्यांची लस घेतलेल्या व्यक्तींनाच अमेरिकेत प्रवेश मिळेल. या यादीत कोविशील्डचा समावेश आहे. डब्ल्यूएचओनं कोविशील्डला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कोविशील्डचे दोन डोस घेतलेल्यांना अमेरिकेत जाता येईल.

भारतात निर्मिती झालेल्या केवळ एकाच लसीला अमेरिकेनं परवानगी दिली आहे. त्यात कोविशील्डचा समावेश आहे. त्यामुळे कोविशील्ड लस घेतलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नोव्हेंबरपासून या नागरिकांना अमेरिकेत जाता येईल.

डब्ल्यूएचओनं आतापर्यंत केवळ ७ लसींना मंजुरी दिली आहे. त्यात कोविशील्डसह, मॉडर्ना, फायझर-बायोएनटेक, जॉन्सन अँड जॉन्सन, ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेनेका, सिनोफार्म आणि सिनोवॅकचा समावेश आहे. डब्ल्यूएचओनं अद्यापपर्यंत भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला मंजुरी दिलेली नाही.

डब्ल्यूएचओच्या मंजुरीसाठी भारत बायोटेकचे प्रयत्न सुरू आहेत. याबद्दलचा निर्णय याच महिन्यात येण्याची शक्यता आहे. अमेरिकेत कोवॅक्सिनला मंजुरी मिळावी यासाठी जूनमध्ये प्रयत्न झाले. मात्र आपत्कालीन वापराची मंजुरी देणाऱ्या प्राधिकरणानं कोवॅक्सिनला परवानगी दिली नाही.

कोविशील्डच्या दोन डोसमध्ये १२ ते १६ आठवड्यांचं अंतर आहे. त्यामुळे लसीकरण पूर्ण होण्यास बराच वेळ लागतो. त्या तुलनेत कोवॅक्सिनच्या दोन डोसमधील कालावधी कमी आहे. त्यामुळेच काहींनी कोवॅक्सिनला पसंती दिली. मात्र अनेक देशांनी आतापर्यंत कोवॅक्सिनला मंजुरी दिलेल्या नसल्यानं अडचणी वाढल्या आहेत.