Coronavirus: गुड न्यूज! भारताला दिलासा देणारी मोठी बातमी; कोरोना लढाईत 'ही' आकडेवारी सुखावणारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 12:25 PM2020-05-20T12:25:50+5:302020-05-20T12:30:27+5:30

सध्या भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांचा आकडा १ लाखांच्या वर पोहचला आहे तर यातून एक दिलासादायक बातमीही समोर येत आहे. भारतात रिकवरी रेटमध्ये(एकूण कोरोना रुग्णांपैकी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण) सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

कोविड १९ आजाराला मात देणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मे च्या सुरुवातीच्या काळात भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली त्यावेळी यातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण २५ टक्के इतके होते.

सध्या भारतात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचं प्रमाण ३८.७ टक्के इतके आहे. आकडेवारीनुसार मंगळवारी सकाळी ८ वाजता भारतात कोरोना रुग्णांची संख्या १ लाख १ हजार १३९ झाली होती. यातील ३९ हजार १७४ रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलं.

देशात उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान आणि तेलंगाणा याठिकाणी कोविड १९ रुग्णांच्या बरे होण्याचं प्रमाण ५८ ते ६३ टक्क्यांमध्ये आहे. पंजाब आणि हरियाणात ७० टक्क्याहून अधिक आहे. दिल्ली, गुजरात, एमपी याठिकाणी रिकवरी रेट ४० टक्क्याहून जास्त आहे. म्हणजे दिवसाला १० मधले ४ रुग्ण बरे होत आहेत.

संपूर्ण देशाचं चित्र घेतलं तर २३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात बरे होण्याचं प्रमाण ४० टक्क्याहून अधिक आहे. १७ राज्यात बरे होण्याचं प्रमाण ५० टक्क्याहून जास्त आहे. ५० टक्के म्हणजे ज्याठिकाणी संक्रमण कमी प्रमाणात होत आहे आणि बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे.

देशात सर्वात जास्त धक्का महाराष्ट्राने दिला आहे. याठिकाणी ३५ हजारपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर बरे होण्याचं प्रमाण अवघे २४ टक्के आहे.

भारतातील प्रति लाख लोकसंख्येत कोरोनाचे प्रमाण ७.१ आहे. जागतिक स्तरावर ही आकडेवारी प्रति लाख लोकसंख्येमध्ये ६० इतकी आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे की सोमवारपर्यंत जगभरात कोरोना विषाणूचे ४५ लाख २५ हजार ४९६ रुग्ण आढळले म्हणजेच संसर्ग होण्याचे प्रमाण दर एक लाख लोकसंख्येमध्ये ६० लोकांचे आहे.

मंत्रालयाने म्हटलं आहे की भारतात कोविड -१९ मध्ये दर लाख लोकसंख्येच्या मागे ०.२ मृत्यूची नोंद झाली आहे. तर जगातील आकडेवारी प्रति लाखात ४.१ मृत्यू इतकी आहे.

भारतात कोरोना विषाणूचे २५ हजार रुग्ण होण्यासाठी ८६ दिवस लागले. पुढील ११ दिवसांत ही संख्या पटीने ५० हजारांवर गेली. त्यानंतरच्या आठवड्यात, रुग्णांची संख्या ७५ हजारांच्या पुढे गेली. ७५ हजार ते एक लाख पर्यंत पोहोचण्यास भारताला अवघ्या ५ दिवसांचा कालावधी लागला.

आकडेवारीवर नजर टाकल्यास १०० ते एक लाख रुग्णांपर्यंत ६२ दिवस लागले. एक लाख प्रकरणांवरील भारताचा विकास दर ५.१ आहे, जो जगात खालून चौथ्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रात दररोज कोरोनाचे दोन हजाराहून अधिक रुग्ण समोर येत आहेत. विश्लेषकांच्या मते गुजरात आणि महाराष्ट्रातील रुग्णांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा बरेच जास्त आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही दर दहा लाख लोकसंख्येमध्ये मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. गुजरातमधील मृत्यूचे प्रमाण १०.३३% आहे, तर महाराष्ट्राचा दर 10 लाखांवर ९.८१% आहे.