'सिंघम' शिवदीप लांडे आता निवडणुकीच्या रिंगणात! शिवसेनेच्या नेत्याचा जावयाची बिहार विधानसभेसाठी जोरदार तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 20:13 IST
1 / 7बिहारमधील अनेक प्रमुख चेहरे आता निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत. अशातच २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे, ज्यांना सिंघम आणि सुपरकॉप म्हणून ओळखले जाते ते आता राजकारणात प्रवेश करत आहेत. त्यांनी मुंगेरमधील अररिया आणि जमालपूर येथून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे.2 / 7२००६ च्या बॅचच्या आयपीएस अधिकाऱ्याने पूर्णियामध्ये आयजी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या १३ दिवसांत राजीनामा देण्याची घोषणा केल्याने राजकीय वादळ निर्माण झाले होते. पूर्णियामध्ये १३ दिवस सेवा बजावत असताना, त्यांनी अररिया, कटिहार, किशनगंज आणि पूर्णिया येथे ड्रग्जविरुद्ध कारवाई करून ड्रग्ज विक्रेत्यांमध्ये दहशत निर्माण केली होती. 3 / 7बिहार सरकारने सुरुवातीला त्यांचा राजीनामा नाकारला असला तरी, ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले, ज्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. त्यानंतर, त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बिहारची सेवा करत राहणार असल्याचे म्हटलं होते. तेव्हापासून त्यांच्या राजकीय प्रवेशाबद्दल चर्चा सुरु झाली होती.4 / 7शिवदीप लांडे यांचे बिहारमध्ये सोशल मीडियावर मोठे चाहते आहेत. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी रन फॉर सेल्फ मोहीम सुरू केली आणि विविध जिल्ह्यांमध्ये तरुणांसोबत धाव घेतली. त्यानंतर त्यांनी हिंदू सेना पक्षाची घोषणा केली. निवडणूक आयोगाने त्यांच्या पक्षाला मान्यता दिली नसली तरी, त्यांनी अररिया आणि जमालपूर या दोन विधानसभा मतदारसंघातून स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.5 / 7माजी अधिकारी शिवदीप लांडे हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीमुळे चर्चेत आहेत. २००६ च्या बिहार केडरचे आयपीएस अधिकारी म्हणून, गुन्हेगारांविरुद्ध कठोर आणि तत्पर कारवाईसाठी त्यांना सिंघम आणि सुपरकॉप असे म्हटले जाते. 6 / 7शेतकरी कुटुंबातील शिवदीप लांडे यांचा जन्म २९ ऑगस्ट १९७६ रोजी झाला असून त्यांचे शिक्षण अकोला जिल्ह्यात झाले. २००६ साली शिवदीप लांडे यांची आयपीएससाठी निवड झाली आणि त्यांना बिहार केडर मिळाले होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी बिहारमध्ये गुंडावर वचक बसवत चांगलाच दबदबा निर्माण केला होता.7 / 7२०१४ साली त्यांनी शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांची कन्या डॉ. ममता शिवतारे यांच्याशी विवाह केला. माजी राज्यपाल डीवाय पाटील यांच्यामुळे माझे लग्न ठरले, त्यांनी मुलगी बघायला येण्यासाठी आग्रह केला होता, त्यानंतर माझे लग्न झाले, असं शिवदीप लांडे यांनी सांगितले होते.