कथावाचक जया किशोरींसोबत लग्नाच्या चर्चेवर धीरेंद्र शास्त्री यांनी केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 08:55 PM2023-01-31T20:55:32+5:302023-01-31T20:57:47+5:30

देशभरात धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांचे नाव चांगलेच चर्चेत आले असून सध्या सगळीकडे त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली आहे. दिव्य दरबारवरून चर्चेत आलेले मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर आहेत.

लोकांच्या मनात काय सुरु आहे, हे ते ओळखत असल्याचा दावा करतात. त्यांना लोकांच्या समस्या न सांगताच समजतात. त्या समस्यांचे उत्तर ते कागदावर लिहून देतात. त्यामुळे त्यांचा दरबारात देशभरातून अनेक जण येत आहेत.

मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथे सोमवार-मंगळवारच्या मध्यरात्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर महाराज यांचा दरबार झाला. प्रदीर्घ कालावधीनंतर धामवर पोहोचलेल्या बागेश्वर महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

बागेश्वर बाबा यांच्या लग्नाविषयी अनेक चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. या मुद्द्यावर काही माध्यमांनी बागेश्वर बाबाच्या दरबारात हजेरी लावत त्यांना हा प्रश्न विचारला. तेव्हा या चर्चेवर बागेश्वर बाबांनी मोठा खुलासा केला आहे.

कथावाचक जया किशोरी यांच्यासोबत बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचे लग्न होणार असल्याचं सोशल मीडियात बोलले जात आहे. या दाव्यावर पहिल्यांदाच धीरेंद्र शास्त्री यांनी खुलासा करत हे सर्व खोटे आणि अफवा असल्याचं म्हटलं.

धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, माझ्या मनात अशी कुठलीही भावना नाही. बहिणीच्या दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे पाहतो. लोकांनी खोटे काहीतरे बनवले आहे. त्याने मला आक्रोश आला. मी निवेदनही काढलं होतं. अशा अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करू असं त्यांनी सांगितले.

बागेश्वर बाबाने जया किशोरीला बहिणीसारखं सांगून सोशल मीडियावरील दाव्याची हवाच काढली आहे. मात्र आपण गुरुंच्या आदेशाने लग्न करणार असल्याचाही खुलासाही धीरेंद्र शास्त्री यांनी केला. लवकरच विवाह होईल असं त्यांनी म्हटलं.

जया किशोरी या भारतातील प्रसिद्ध कथाकार, भजन गायिका आणि मोटिवेशनल स्पीकर आहेत. या तरुण कथाकाराने अगदी लहान वयातच ती ओळख निर्माण केली आहे, ज्यासाठी लोकांना बरीच वर्षे लागतात. असे म्हणतात की जया जेव्हा सहा वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचा कल अध्यात्माकडे गेला होता.

जया किशोरी यांनी आजपर्यंत बागेश्वर धाम सरकारबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु त्या नेहमीच म्हणतात की त्यांचे पहिले प्रेम 'भगवान कृष्ण' आहे आणि ते अनेकदा व्यासपीठावरून बोलून दाखवले आहे.

लग्नाबाबत जया किशोरी सांगतात की, योग्य वेळ आल्यावर मी नक्कीच लग्न करेल. पण त्यांच्या लग्नाबाबत एक अट आहे, लग्न कोलकात्यात झाले तर बरे होईल. कारण अशा परिस्थितीत ती कधीही तिच्या घरी येऊन जाऊ शकेल. पण जर बाहेर कुठे लग्न झाले तर माझ्या पालकांनीही माझ्या जवळच्याच ठिकाणी शिफ्ट व्हावे अशी अट आहे.