३० मिनिटांचा शुभ मुहूर्त, ध्वजारोहणासाठी अयोध्या सज्ज; पूर्ण झालेल्या राम मंदिराचे खास Photo
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 13:59 IST
1 / 15Ayodhya Ram Mandir Dhwajarohan 2025: २५ नोव्हेंबर २०२५ रोजी अयोध्येतील राम मंदिरात ध्वजारोहणाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभ मुहुर्तावर धर्म ध्वजारोहण विधी सोहळा होणार आहे. याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. भव्य आणि दिव्य सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे. 2 / 15श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र येथे होणाऱ्या धर्मध्वजारोहण कार्यक्रमासाठी अनुक्रमे गणपती पूजन, पंचांग पूजन, षोडश मातृका पूजन केले. त्यानंतर योगिनी पूजन, क्षेत्रपाल पूजन, वास्तुपूजन, नवग्रह पूजन आणि मुख्य मंडळ म्हणून रामभद्र मंडळ व इतर सर्व पूजनीय मंडळांचे आवाहन व पूजन करण्यात आले. विष्णु सहस्रनाम व गणपती अथर्वशीर्ष मंत्र पठनाने आहुत्या देण्याचा विधी झाला. 3 / 15२२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भव्य राम मंदिराचे लोकार्पण केले. अगदी तसाच दिव्य सोहळा पुन्हा एकदा होणार आहे. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरावर ध्वजारोहण करून संपूर्ण राम मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. हा सोहळा सुमारे ६ ते ८ हजार निमंत्रितांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जाणार आहे.4 / 15या दिवशी विवाह पंचमी आहे. या दिवशी राम मंदिराच्या शिखरावर भगव्या रंगाचा ध्वज फडकवण्यात येणार आहे. हा केवळ धार्मिक विधी नसून त्रेतायुगातील आठवणीसारखे अद्भुत दृश्य मानले जाते. धर्मध्वज हे केंद्र आहे जिथे सर्व दैवी शक्तींचा प्रवाह असतो. त्यामुळे मंदिराच्या शिखरावर बसवलेला ध्वज केवळ प्रतीक नसून तो दैवी शक्तीचा वाहक मानला जात आहे.5 / 15ज्योतिषांच्या मते, अभिजीत मुहूर्तावर विवाह पंचमीच्या दिवशी राम मंदिरात ध्वजारोहण करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी अभिजीत मुहूर्त दुपारी १२ ते १२.३० पर्यंत असेल. हा काळ अतिशय शुभ मानला जातो. ज्योतिषांच्या मते, ३० मिनिटांचा हा वेळ विशेष मुहूर्त मानला जातो.6 / 15अभिजित मुहूर्त हा कोणतेही काम करण्यासाठी सर्वांत शुभ मुहूर्त मानला जातो. हा दिवसाचा सर्वांत शक्तिशाली क्षण असल्याचे म्हटले जाते. राम मंदिरात रामललाचा प्राणप्रतिष्ठा विधी अभिजीत मुहूर्तावर झाला होता. या कारणास्तव ध्वजारोहणासाठी फक्त अभिजीत मुहूर्त शुभ मानला गेला आहे. 7 / 15मुख्य मंदिराच्या आसपासच्या सहा मंदिरांवर ध्वजदंड व कलशही स्थापन करण्यात आला आहे. तसेच महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ, विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, शबरी आणि अहिल्या मंदिर सप्त मंडपाचेही काम पूर्ण झाले आहे. आताच्या घडीला मोठ्या प्रमाणात अयोध्येत या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.8 / 15२२ जानेवारी २०२४ राम जन्मभूमी मंदिरात भगवान रामाची प्राणप्रतिष्ठा झाली असली तरी या मंदिराच्या आसपासचे बरेचसे काम अपूर्ण होते. आता मुख्य मंदिराच्या आसपासची भगवान शिव, भगवान गणेश, भगवान हनुमान, सूर्यदेव, देवी भगवती, देवी अन्नपूर्णा मंदिर पूर्ण झाले आहे.9 / 15मंदिर निर्माणाव्यतिरिक्त भाविकांसाठी पूजा प्रार्थनेची सोय, फुटपाथ, दर्शनाचा भाग, भाविकांचा ओघ नियंत्रित करण्याच्या व्यवस्थाही पूर्ण करण्यात आल्या आहेत. १० एकरचा पंचवटी भाग जवळपास पूर्ण करत आणला आहे. ६, ९, ५, २२ आणि २५ तारखांचा राम मंदिराशी मोठा संबंध आहे. या तारखा ऐतिहासिक क्षणांच्या साक्षीदार ठरल्या आहेत.10 / 15राम मंदिराशी संबंधित ६ डिसेंबर हा दिवस ६ डिसेंबर १९९२ चा आहे. ज्या दिवशी कारसेवकांनी राम मंदिर संकुलात पहिल्यांदा भगवा ध्वज फडकवला. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर वादावर निकाल दिला. त्यानंतर ५ ऑगस्ट २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भव्य राम मंदिराची पायाभरणी केली.11 / 15२२ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान मोदी यांनी रामललाची प्राणप्रतिष्ठापना केली आणि आता २५ नोव्हेंबर २०२५ रोजी पंतप्रधान मोदी धर्मध्वजारोहण करून संपूर्ण राम मंदिराचे लोकार्पण करणार आहेत. अयोध्या नगरी पुन्हा एकदा नवचैतन्याने सजली आहे. संपूर्ण देशासाठी आनंद द्विगुणित करणारा सोहळा होणार आहे. पुन्हा एकदा हजारो विशेष निमंत्रित भव्य सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत.12 / 15२५ नोव्हेंबर रोजी अयोध्येतील राम मंदिरात भाविकांना दर्शन घेता येणार नाही. राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, २५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या समारंभात फक्त निमंत्रित पाहुण्यांनाच मंदिरात जाण्याची परवानगी असेल.13 / 15सुमारे ८ हजार लोकांना आमंत्रित केले जाईल. तशी व्यवस्था केली जात आहे. या सोहळ्याच्या दुसऱ्या दिवसापासून सामान्य भाविकांसाठी पुन्हा एकदा राम मंदिरात रामललाचे दर्शन सुरू होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस श्रीराम जन्मभूमी संकुलातील सर्व मंदिरे, उद्याने आणि कुबेर टीला खुले करण्याचा प्रयत्न असेल.14 / 15मंदिराच्या पहिल्या मजल्यावर ‘राम परिवार’ आसनस्थ झाला असून मोदी येथे बसून आरती करणार आहेत. त्यानंतर मंदिराच्या शीर्षस्थानी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करणार असल्याचे ट्रस्ट संचालकांनी सांगितले. देश-परदेशातील भाविकांनी राम मंदिरासाठी तब्बल ३ हजार कोटींचे दान दिल्याची माहिती मिळाली आहे. 15 / 15राम मंदिराच्या बांधकामासाठी भारत आणि परदेशातील लाखो रामभक्तांनी मुक्त हस्ताने योगदान दिले. ३ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम रामलला चरणी अर्पण केली. इमारत बांधकाम समितीच्या अध्यक्षांच्या मते, आतापर्यंत अंदाजे १,५०० कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. मंदिर संकुलातील उर्वरित चालू कामासह एकूण खर्च अंदाजे १,८०० कोटी असल्याचा अंदाज आहे.