अमेरिकेच्या स्टिंगर मिसाईलहूनही भारी! भारताच्या अँटी-टँक गायडेड HELINA Missileने पोखरण गाजवले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 09:32 PM2022-04-11T21:32:41+5:302022-04-11T21:35:03+5:30

India HELINA Missile : राजस्थानमधील पोखरण येथे अँटी टँक गायडेड मिसाईल हेलिनानं (Anti-Tank Guided Missile HELINA) सर्व मानकांची पूर्तता करत सिम्युलेटेड टँक उद्ध्वस्त केला.

India HELINA Missile : राजस्थानमधील पोखरण येथे अँटी टँक गायडेड मिसाईल हेलिनानं (Anti-Tank Guided Missile HELINA) सर्व मानकांची पूर्तता करत सिम्युलेटेड टँक उद्ध्वस्त केला. हे मिसाईल अँडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टर (Advanced Light Helicopter- ALH) मधून लाँच करण्यात आलं. त्यानं आपले लक्ष्य पूर्ण अचूकतेनं नष्ट केलं.

इन्फ्रारेड इमेजिंग सीकर (IIR) तंत्रज्ञान या मिसाईलला मार्गदर्शन करते. मिसाईल लाँच केल्यानंतर हे तंत्रज्ञान सक्रिय होतं. हे जगातील सर्वोत्तम आणि अत्याधुनिक अँटी टँक हत्यारांपैकी एक आहे. ते कायमस्वरूपी ALH मध्ये स्थापित करता यावेत यासाठी या चाचण्या केल्या जात आहेत. या यशस्वी चाचणीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ, भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलाचे अभिनंदन केलं.

गेल्या वर्षीदेखील फेब्रुवारी महिन्यात या मिसाईलची यशस्वी चाचणी करण्यात आली. या मिसाईलपासून शत्रूचे टँक वाचणं अशक्य आहे. भारतीय लष्कर आणि हवाईदलाच्या हेलिकॉप्टरवर हे मिसाईल तैनात करण्याची तयारी सुरू आहे. खरं तर याचं नाव हेलिना आहे परंतु याला ध्रुवास्त्र असंही म्हटलं जातं. याचं यापूर्वी नाव नाग मिसाईल (Nag Missile) असं होतं.

भारतात तयार करण्यात आलेलं हेलिना मिसाईल (Helina Missile) २३० मीटर प्रति सेकंदाच्या वेगानं जाते. म्हणजेच याचा वेग ८२८ किलोमीटर प्रति तास आहे. या मिसाईलपासून वाचण्यासाठी शत्रूला वेळच मिळणार नाही.

DRDO नुसार ध्रुवास्त्र हा थर्ड जनरेशनच्या फायर अँड फर्गेट एटीजीएम प्रणाली आहे. याला आधुनिक हलक्या हेलिकॉप्टरवर स्थापित करण्यात आलंय. तसंच प्रत्येक हंगामात शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम आहे. याचं वजन ४५ किलो असून ही ६ फूट लांब आहे. यामध्ये ८ किलो स्फोटकं भरून चांगलं मिसाईल तयार केलं जाऊ शकतं.

लष्कर हे मिसाईल ध्रुव हेलिकॉप्टर, अॅडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टरसह अन्य लढाऊ हेलिकॉप्टरमधून लावू शकतं. या मिसाईलचा समावेश केल्यानंतर ते ध्रुव मिसाईल अॅटॅकर हेलिकॉप्टर बनणार आहे. याचं यशस्वी परिक्षण डीआरडीओ आणि लष्कराचं मोठं यश मानलं जात आहे.

हे मिसाईल हेलिकॉप्टरमधून डागता येऊ शकतं म्हणून याला हेलिना हे नाव देण्यात आलं आहे. यामध्ये ८ किलो वॉरहेड लावून मोठे टँग, बंकर आणि स्फोटकं असलेल्या वाहनांना उद्ध्वस्त करता येतं. यामध्ये सॉलिड प्रॉपेलेंट रॉकेट बूस्टर आहे, ते याला उडण्यात मदत करतं.