व्हिसाशिवाय जगातील 'या' 16 देशांमध्ये प्रवास करू शकतात भारतीय, केंद्र सरकारने दिली माहिती

By ravalnath.patil | Published: September 23, 2020 04:08 PM2020-09-23T16:08:44+5:302020-09-23T16:35:16+5:30

जगात असे १६ देश आहेत, त्याठिकाणी पासपोर्टधारक भारतीयांना प्रवास करण्यासाठी व्हिसा लागत नाही.

या देशांमध्ये नेपाळ, मालदीव, भूतान आणि मॉरिशस सारख्या देशांचा समावेश आहे. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी याबाबत सभागृहात माहिती दिली आहे.

राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्ही. मुरलीधरन म्हणाले की, '४३ देश व्हिसा-ऑन-अराइवल सुविधा प्रदान करतात आणि ३६ देश भारतीय सामान्य पासपोर्ट धारकांना ई-व्हिसा सुविधा उपलब्ध करतात.'

बारबाडोस, भूतान, डोमिनिका, ग्रॅनाडा, हैती, हाँगकाँग एसएआर, मालदीव, मॉरिशस, मोंटसेराट, नेपाळ, नीयू द्वीप, समोआ, सेनेगल, त्रिनिदाद आणि टोबॅगो, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स आणि सर्बिया, या देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, इराण, इंडोनेशिया आणि म्यानमार हे देश व्हिसा-ऑन-अराइवल सुविधा प्रदान करतात. तर श्रीलंका, न्यूझीलंड आणि मलेशिया यांच्यासह २६ देशांसाठी ई-व्हिसा सुविधा आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ व्हावा, या उद्देशाने भारतीय नागरिकांना व्हिसा मुक्त प्रवास, व्हिसा-ऑन-अराइवल आणि ई-व्हिसा सुविधा देणार्‍या देशांची संख्या वाढविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे व्ही. मुरलीधरन यांनी म्हटले आहे.

दरम्यान, जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.