'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 13:42 IST
1 / 7सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर निकम यांनी आनंद व्यक्त केला. याबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी निकम यांना कॉल केला होता. 2 / 7राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले, 'सर्वात आधी मी महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला माझ्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे दुःख झाले होते. पण, राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना याचं श्रेय देईल.' 3 / 7'पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मला पहिल्यांदा भेटले होते, तेव्हा माझ्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला होता. त्यावेळी भावूक झालो होतो', असे निकम म्हणाले. 4 / 7राज्यसभेवर नियुक्तीची अधिसूचना निघण्यापूर्वी पंतप्रधान मोदींचा मला कॉल आला होता, असेही उज्ज्वल निकम यांनी सांगितले. ते म्हणाले, 'काल मला त्यांचा (नरेंद्र मोदी) कॉल आला. रात्री ८.४४ कॉल आला होता. पंतप्रधान मला म्हणाले की, 'उज्ज्वलजी मी मराठीमध्ये सांगू की हिंदीमध्ये सांगू?'5 / 7'मी थोडं हसलो. मग ते (नरेंद्र मोदी) जोरात हसले. मी त्यांना म्हणालो की, तुम्हाला दोन्ही भाषा चांगल्या येतात. मग ते आधी माझ्याशी मराठीमध्ये बोलले. ते मला म्हणाले की, उज्ज्वलजी राष्ट्रपती तुमच्यावर एक जबाबदारी टाकू इच्छित आहे. तुम्ही ती जबाबदारी घेणार का?', असे उज्ज्वल निकम यांनी सांगितले.6 / 7कॉलवरील संभाषणाबद्दल उज्ज्वल निकम पुढे म्हणाले, 'मी त्यांना म्हणालो की, कोणती जबाबदारी आहे? मग त्यांनी (पंतप्रधान मोदी) मला सांगितले की, राष्ट्रपतींचा असा निर्णय आहे की, तुम्हाला राज्यसभेवर घेतले जावे. जेणेकरून देशासाठी, संविधानासाठी काही काम करू शकाल. मी तात्काळ होकार दिला. त्याचे फळ इतक्या पटकन मिळाले.'7 / 7उज्ज्वल निकम यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी वकिली सुरू केली. आता त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.