Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 12:04 IST
1 / 12Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरू राहील आणि सध्या मिळणारे महिन्याचे १५०० रुपये मानधन योग्यवेळी वाढविले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.2 / 12काही जणांनी योजनेचा दुरुपयोग करून घुसखोरी केली आहे. अशांचे मानधन थांबवण्यात येईल. काही ‘हुशार’ भावांनी आपला फोटो लावण्याऐवजी मोटारसायकलचा फोटो लावला, जेणेकरून ओळख पटू नये. अशा घुसखोरांचे अनुदान आता थांबविण्यात आले आहे. प्रत्येकाची पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच पात्र असूनही अन्याय झालेल्या भगिनींवरील अन्याय दूर केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.3 / 12महायुतीसाठी गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. मागील लोकसभा निवडणुकांचे निकाल आल्यानंतर महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि प्रभावी अंमलबजावणीकडेही लक्ष दिले. याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाला. न भूतो असा विजय महायुतीचा झाला. परंतु, यानंतर या योजनेची छाननी करून लाखो अपात्र लाभार्थी महिलांना वगळण्यात आले.4 / 12परंतु, यातच आता लाडकी बहीण योजनेची क्रेझ ओसरली का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे गेल्या पाच महिन्यात लाडकी बहीण योजनेसाठी एकही नवा अर्ज केला नसल्याचा दावा केला जात आहे. यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींनी या योजनेकडे पाठ फिरवली का, अशी कुजबुज सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. 5 / 12विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्तेपर्यंत पोहोचविणाऱ्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेंतर्गत गेल्या पाच महिन्यांत एकही नवा अर्ज प्राप्त झालेला नाही, असे सूत्रांकडून समजते. तर, पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले जात आहे. 6 / 12राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडे लाडकी बहीण योजनेची सद्यःस्थिती काय, किती जणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, याचा कानोसा काही जणांनी घेतला. यावेळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच महिन्यांत एकही नवा अर्ज प्राप्त झालेला नाही, असे दिसून आले. 7 / 12लाडकी बहीण या योजनेची सद्यस्थिती अशी की, पात्र महिला - १,५९,५६,९६७ तसेच पाच महिन्यांत दाखल झालेले अर्ज - शून्य. लाडकी बहीण योजनेचे सर्वाधिक पात्र लाभार्थी - पुणे जिल्हा; तर, लाभार्थ्यांमध्ये ६५ वर्षांहून अधिक वय असलेल्या महिलांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे.8 / 12लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत असल्याचे सत्ताधारी पक्षांचे आमदार खासगीत बोलत असतात. तिजोरीवर पडत असलेल्या ताणामुळे आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील अनेक योजनांसाठी निधी देण्यात सरकार हात आखडता घेत असल्याचीही वदंता आहे.9 / 12या पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांत एकाही महिलेने या योजनेसाठी अर्ज केला नसावा किंवा काय, अशी चर्चा सुरू असल्याचे समजते. एकही नवा अर्ज आला नसल्याने हळूहळू या योजनेची व्याप्ती कमी करण्याचा सरकारचा विचार असावा का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जाऊ लागला असल्याचे समजते.10 / 12दरम्यान, आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजना पडताळणी स्थगित होत असल्याचे समजते. मिळाल्या माहितीनुसार, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील लाभार्थी महिलांची छाननी करून ही संख्या कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. 11 / 12स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ही सगळी प्रक्रिया थांबवल्याची माहिती सूत्रांनी दिली. आगामी महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समितींच्या निवडणुका लक्षात घेता ही सगळी प्रक्रिया जैसे थे आहे. या निवडणुका संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाणार आहे. निवडणुका संपल्यानंतर सरकार छाननीबाबत पावले उचलण्याची शक्यता आहे.12 / 12गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातून एकूण २ कोटी ६३ लाख अर्ज आले. या अर्जाची छाननी करून पहिल्यांदा २ कोटी ३४ लाख लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ दिला गेला. त्यानंतर ही संख्या २ कोटी ४७ लाख लाडक्या बहीणींच्या अर्जावर स्थिरावली. गेली तीन महिने ही संख्या कायम आहे. योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर वर्षाला ५० हजार कोटींचा बोजा पडतो.