शिंदेंच्या दसरा मेळाव्याला गेले अन् परतलेच नाहीत; गणेश सकपाळ यांना तुम्ही पाहिलं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 03:08 PM2022-10-08T15:08:35+5:302022-10-08T15:11:51+5:30

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने यंदा पहिल्यांदाच शिवसेनेने २ मेळावे आयोजित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बीकेसीतील मैदानात मेळाव्याचं आयोजन केले तर दुसरीकडे परंपरेनुसार उद्धव ठाकरे गटाला शिवतीर्थावर मेळावा घेण्याची परवानगी हायकोर्टाकडून मिळाली होती.

शिंदे-ठाकरे गटात कुणाचा दसरा मेळावा सरस ठरणार याबाबत कमालीची उत्सुकता होती. कुणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी जमते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यात राज्यभरातून अनेक शिवसैनिक मुंबईत दाखल झाले होते. शिंदे गटानेही मेळाव्याला लोकांना येता यावं म्हणून मोफत बस, रेल्वे उपलब्ध करून दिल्या होत्या.

मात्र शिंदेंच्या दसरा मेळाव्याला गेलेले गणेश सकपाळ पुन्हा गावाकडे परतले नसल्याने चिंता वाढली आहे. रायगडमधून दसरा मेळाव्यासाठी गेलेले गणेश सुंदर सकपाळ हे मेळाव्यातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.

गणेश सकपाळ हे पोलादपूर तालुक्यातील कापडे गावचे रहिवासी आहेत. दसऱ्याला शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी ते रायगडहून मुंबईत बीकेसी मैदानात गेले होते. शिंदे गटाकडून ठरवण्यात आलेल्या एसटी बसने ते मुंबईत दाखल झाले.

मेळावा संपल्यानंतर सकपाळ यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली परंतु ते सापडले नाहीत. मागील २ दिवसांपासून ते घरी परतले नाहीत. त्यांचा कुणाचीही संपर्क झाला नाही. याबाबत स्थानिक आमदार भरत गोगावले यांनीही दुजोरा दिला आहे. गणेश सकपाळ यांचा शोध घेतला जात त्यांनी सांगितले.

दरम्यान बेपत्ता गणेश सकपाळ यांचा शोध घेण्यासाठी त्यांचे चुलत भाऊ रामदास सकपाळ यांनी सोशल मिडियावर ७५८८७१३८०३, ८८३००७५५७७ या फोन नंबरवर संपर्क करण्याचे अवाहन केले आहे.

दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी एकनाथ शिंदे गटाने राज्यातील विविध भागातून एस टी बसेस तसेच खासगी बससेमधून कार्यकर्ते आणले होते. यासाठी एसटी महामंडळाकडे १० कोटी रुपये रोख भरल्याचंही समोर आले होते.

शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार होता. त्यासाठी गर्दी करण्यासाठी गावखेड्यातून शिवसैनिक मुंबईत आणले होते. लाखो शिवसैनिक मेळाव्याला येणार असल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या रात्रीच्या जेवणाचीही सोय शिंदे गटाकडून करण्यात आली होती.

शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यादा झालेल्या दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातून त्यासाठी हजारो कार्यकर्ते मुंबईला आणण्यात आले. उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून शेकडो वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.

शिवसेनेतर्फे रायगड जिल्ह्यातून वीस हजार, तर शिंदे गटाचे पंचवीस हजारांहून अधिक कार्यकर्ते मेळाव्याला आणले होते. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसाठी २५० खासगी वाहने, तर ५५ मोठ्या बसेस ठरवण्यात आल्या होत्या. यातील एका एसटी बसून गणेश सकपाळ मुंबईत आले होते.