Maharashtra Political Crisis: शिंदे गट-भाजपमध्ये फूट? ‘या’ २ मुद्द्यांवर बंडखोरांचे एकमत नाही; तिसरा मुद्दा ठरणार निर्णायक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 01:43 PM2022-07-14T13:43:59+5:302022-07-14T13:49:49+5:30

Maharashtra Political Crisis: राज्यातील आगामी निवडणुका भाजप आणि शिंदे गट युतीत लढणार असल्याची चर्चा असली तरी बंडखोर यासाठी तयार नसल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे पक्षाला मोठे भगदाड पडले. यानंतर वेगळा गट स्थापन करत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यंत्रीपदाची शपथ घेतली.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) डॅमेज कंट्रोसाठी झटताना दिसत आहेत. राज्यातील सत्तासंघर्ष पराकोटीला जात महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले.

यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारावरून खल सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिंदे गटात निर्णय झाल्याचे सांगितले जात असले, तरी बंडखोरांमधील काही आमदारांनी कोणते खाते अपेक्षित आहे, याबाबत सूतोवाच केला आहे.

याशिवाय राज्यातील आगामी निवडणुकीत भाजपसोबत युती करून निवडणुका लढवाव्या, यावरून बंडखोर आमदारांमध्ये एकमत नाही. शिंदे गटाने भाजपसोबत युतीत निवडणुका न लढवता स्वतंत्र लढवाव्यात, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरल्याचे सांगितले जात आहे.

विद्यमान विधानसभेत मुख्यमंत्री पद, लाभाची पदे आमदारांना मिळणार असली तरी आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गटाचे भवितव्य काय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. नेत्यांमागे हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात आलेत. आता स्थानिक पातळीवर निवडणुकांसाठी कामाला लागावे लागणार. पण शिंदे गट नेमका कोणता झेंडा हाती घेणार, हेच अद्याप ठरलेले नसल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्यात असा दबाव आमदारांकडून एकनाथ शिंदेंवर टाकण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. भाजपने दिलेल्या भक्कम पाठिंब्यावर बंड तर केले. पण ५०-५० कोटी मिळाल्याने आमदार फुटलेत, असा गंभीर आरोप शिंदे गटावर केला जात आहे.

आगामी निवडणुकीत भाजपशी युती करण्याचा निर्णय शिंदे गटाने घेतला तर जनतेत वेगळा संदेश जाईल. संपूर्ण राजकीय कारकीर्दीत हा धब्बा माथ्यावर मिरवणे कट्टर शिवसैनिक असलेल्या शिंदे गटातील आमदारांना नको आहे.

त्यामुळे भाजपत जात, त्यांच्याच चिन्हावर निवडणूक लढवण्यास आमदारांची तयारी नाही. किंवा हा निर्णय घेण्याची शक्यता फार कमी वर्तवली जात आहे. दुसरीकडे, आम्हीच शिवसेना आहोत असे शिंदे गट म्हणत असला तरीही धनुष्यबाण या चिन्हावर अद्याप शिंदे गटाने दावा सांगितला नाही. याउलट उद्धव ठाकरेंच्या मनधरणीचे काम सुरु आहे.

उद्धव ठाकरेंबद्दल अपशब्द ऐकून घेण्याचीही शिंदे गटाची तयारी नाही. संजय राऊतांचे विखारी शब्द कमी झाले असले तरीही आमदारांवरील टीका कमी झालेली नाही. त्यामुळे आता शिवसेनेत माघारी जाण्याचे दरवाजेही बंद झाल्यात जमा आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी आगामी निवडणुकांमध्ये स्वतंत्र रित्या निवडणूक लढवण्यासाठी मनाची तयारी केली आहे. आमदारांचा तसा शिंदेंवर दबाव वाढू लागला आहे. भाजपची युती नाही आणि शिवसेनेत परत जायचे नाही.

शिंदे गटाला आता निवडणुकीत स्वतंत्र उभे राहून आपली ताकद दाखवून द्यावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. हा पर्याय शिंदे गटाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी ठरू शकेल. शिंदे गटानं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तर भाजपच्या पाठिंब्यावर बंड केल्याचा शिक्का पुसला जाईल.

सामान्यांचे, कष्टकऱ्यांचे नेते म्हणून शिंदे गटाची जी प्रतिमा आहे, ती आणखी उजळून निघण्याची शक्यता या पर्यायातून दिसेल. स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यानंत अपयश आले तरीही आपले नेमके स्थान काय आहे हे शिंदे गटाला कळेल आणि जनतेचा संभ्रमही दूर होईल. याशिवाय अपक्षांना अधिकाधिक आपल्याकडे वळवण्याचाही शिंदे गट प्रयत्न करू शकतो, अशी चर्चा जोर धरू लागली आहे.