शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Balasaheb Thackeray: बाळासाहेबांचं शेवटचं भाषण; उद्धव-आदित्यला सांभाळा म्हणत केलं होतं भावनिक आवाहन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 16:28 IST

1 / 11
आज १७ नोव्हेंबर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन. मराठी आणि ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारसरणीसोबत बाळासाहेबांनी सुमारे ५० वर्षे महाराष्ट्रातील राजकीय विश्व गाजवले होते. बाळासाहेबांची आक्रमक भाषणे आजही मार्गदर्शक ठरतात. सुमारे पाच दशकांच्या राजकीय कारकीर्दीत हजारो भाषणे गाजवणाऱ्या बाळासाहेबांनी २०१२ मध्ये झालेल्या दसरा मेळाव्यात शेवटचे भाषण केले होते.
2 / 11
प्रकृती अस्वस्थ्यामुळे बाळासाहेबांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून हे भाषण ऐकवण्यात आले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी प्रकृती अस्वस्थ्यामुळे प्रत्यक्ष दसरा मेळाव्याला उपस्थित राहू न शकल्याने खंत व्यक्त केली होती. अशा स्थितीतही त्यांनी शिवसैनिकांना अखेरचे मार्गदर्शन केले होते. त्यातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे...
3 / 11
मराठी हा आमचा पाया आहे. लोक दोन्हीकडून बोलतात. मराठीचा मुद्दा घेतला तर हिंदुत्वाचं काय झालं म्हणून विचारतात. तर हिंदुत्वाचा मुद्दा घेतला तर मराठीचं काय झालं, असा प्रश्न विचारतात. आता यांना समजवायचे तरी काय? आम्ही आहोत हे असे आहोत.
4 / 11
तो काळ वेगळा होता. तो काळ नेहरूंचा होता, तो काळ इंदिरा गांधींचा होता. परदेशात आयसेनहॉरचा होता, दरम्यान, त्या काळात काढलेल्या व्यंगचित्रांचा संग्रह वाळवी लागून खराब झाल्याची खंत बाळासाहेबांनी या भाषणातून व्यक्त केली होती.
5 / 11
या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांनी सोनिया गांधी आणि गांधी कुटुंबावर जोरदार टीका केली होती. मुघल गेले, ब्रिटिश गेले आणि इटालियन आले. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका वाड्रा, रॉबर्ट वाड्रा, अहमद पटेल ही पंचकडीच राज्य. या पंचकडीला देशाच्या राजकारणातून फेकून दिलं, तरच देशाला चांगले दिवस येतील, असे बाळासाहेब म्हणाले होते.
6 / 11
यावेळी बाळासाहेबांनी एमआयएम, रझा अकादमीवर टीका केली. नांदेडच्या पालिका निवडणुकीत एमआयएमचे ११ नगरसेवक निवडून आले. हैदराबादचा एक नेता येतो काय आणि त्याचे ११ नगरसेवक निवडून येतात काय, हे भयंकर आहे. आझार मैदानावर रझा अकादमीचा हंगामा झाला. यांची दंगा करण्याची हिंमत झाली कशी, पाकिस्तानमधील घटनेचा मुंब्य्राशी काय संबंध, असा सवालही बाळासाहेबांनी भाषणामधून उपस्थित केला होता. तसेच आसाममध्ये लष्कर घुसवून घुसखोरांना हाकलून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
7 / 11
बाबरी मशिदीनंतर मुंबईत दंगल झाली. तेव्हा शिवसेनेने दंगेखोरांना घडा शिकवला. त्यानंतर शिवसेना-भाजपाची सत्ता असेपर्यंत दंगा करण्याची हिंमत झाली नाही. आजही आम्ही दणका देऊ शकतो, असा इशारा बाळासाहेबांनी त्या भाषणातून दिला होता.
8 / 11
सीमाप्रश्नावर शिवसेनेने काय केलं म्हणून विचारता. ६९ शिवसैनिकांनी बलिदान केले होते. आमच्यावर टीका करणाऱ्यांच्या घरातला एकतरी गेला का. तेव्हा माझ्यासह अनेकांना तुरुंगवास भोगला. अनेक शिवसैनिक तुरुंगात गेले होते, त्यांना सोडवून आणले. हा सर्व त्याग आम्ही केला आहे.
9 / 11
सर्वामधून शिवसेना तावून सुलाखून निघालेली आहे. बाकी विरोधात गेले तरी चालतील, निदान मराठी माणूस तरी शिवसेनेच्या विरोधात उभा राहता कामा नये, एवढी कृपा करा.
10 / 11
शरद पवार म्हणतात, मुंबई बहुभाषिक आहे. सर्वांचीच मुलं बहुभाषिकच आहेत. बहुभाषिक असली नसली तरी मुंबई ही माझ्या महाराष्ट्राची राजधानी आहे, हे विसरू नका, असा इशारा बाळासाहेबांनी आपल्या शेवटच्या भाषणातून दिला होता. तसेच लवासा, मंत्रालयाला लागलेली आग यावरूनही बाळासाहेबांनी तत्कालीन आघासी सरकारवर निशाणा साधला होता.
11 / 11
जवळपास ४५ वर्षे शिवसेनाप्रमुख म्हणून राहिलो. आता मला झेपत नाही. आपण मला सांभाळलंत. मी तुम्हाला सांभाळलं. त्याच्यामध्ये ईमान महत्त्वाचे आहे. हे ईमान सांभाळा. ते सांभाळाल तोपर्यंत शिवसेनेला कुणी हरवू शकणार नाही. मी तुमच्यावर घराणेशाही लादली असेल तर विसरून जा. माझ्यामागून उद्धव-आदित्य हे तुमच्यावर लागले असतील तर विसरून जा. हे लादलेले नाहीत. तुम्हीच त्यांचा स्वीकार केलाय. हे सोनिया गांधींचं घराणं नाही. गांधी घराणं नाही आहे. हे मी तुमच्यावर लादलेलं नाही. मला सांभाळलंत, उद्धवला सांभाला. आदित्यला सांभाळा, असं आवाहन बाळासाहेबांनी या भाषणाच्या शेवटी केलं होतं.
टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना