काय आहे 'समोसा कॉकस'?; ज्याचा उल्लेख मोदींनी केला अन् US संसद टाळ्यांनी दणाणले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 02:58 PM2023-06-23T14:58:11+5:302023-06-23T15:05:19+5:30

अमेरिकन काँग्रेसमध्ये ऐतिहासिक भाषणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही देशांच्या जुन्या नात्याचा उल्लेख केला. लाखो अमेरिकन नागरिकांचे मूळ भारतीय राहिले आहेत त्यातील काही या हाऊसमध्ये बसले आहेत असं म्हणत मोदींनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्याकडे पाहिले.

यावेळी नरेंद्र मोदींनी 'समोसा कॉकस' या शब्दाचा उल्लेख करताच संसदेतील सर्वच खासदारांनी टाळ्यांचा गडगडाट केला. कमला हॅरिस या अमेरिकत उपराष्ट्राध्यक्ष बनलेल्या पहिला महिला आणि मूळ भारतीय असणाऱ्या व्यक्ती आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, समोसा कॉकसनं आता या सदनाचा स्वाद वाढलाय असं मला सांगितले. हा स्वाद आणखी वाढेल. मागील २ पिढ्यांपासून महान अमेरिका आणि भारतीयांचे जीवन एकमेकांना प्रेरित करते असं त्यांनी खासदारांना म्हटलं.

काय आहे समोसा कॉकस? - अमेरिकेच्या राजकारणात समोसा कॉकस या शब्दाची फार चर्चा आहे. २०१६ मध्ये या शब्दाची चर्चा सुरू झाली, जेव्हा पहिल्यांदा अमेरिकन संसदेत ५ मूळ भारतीय निवासी खासदार म्हणून निवडून आले होते.

यात भारतीय मूळ असलेले अमेरिकन नेता आणि हाऊस ऑफ रिप्रेंजेटेटिव्ह सदस्य राजा कृष्णमूर्तींचा समावेश होता. त्यांनीच समोसा कॉकस शब्द पुढे आणला. ज्यात भारतीय मूळ असलेले खासदार आणि लोकप्रतिनिधींचा समुहाला म्हटलं जाते.

सध्या समोसा कॉकस यात ५-६ सदस्य आहेत. परंतु यंदा ही संख्या वाढू शकते असा अंदाज बांधला जातोय. समोसा हा भारतीय पदार्थ आहे आणि जगभरात तो प्रसिद्ध आहे. त्यामुळे या शब्दाला भारतीय मूळ लोकांना सहजपणे जोडले जाते.

अमेरिकेची लोकसंख्या ३३ कोटी आहे. त्यातील १ टक्क्याहून अधिक लोकसंख्या मूळ भारतीय असलेले आहेत. ४३५ सदस्यांच्या अमेरिकन काँग्रेसमध्ये भारतीय मूळ असलेल्या खासदारांची संख्या ५ आहे. अमेरिकेच्या इतिहासात भारतीय मूळ असलेल्या अमेरिकन सदस्यांची संख्या आता सर्वाधिक झाली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि प्रथम महिला जिल बायडन यांच्या निमंत्रणावरून भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकीय दौऱ्यासाठी अमेरिकेत पोहचले होते. गुरुवारी त्यांनी अमेरिकन संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले.

नरेंद्र मोदी असे एकमेव भारतीय नेते आहेत ज्यांना दोनदा अमेरिकन संसदेला संबोधित करण्याची संधी मिळाली. मोदींच्या भाषणात भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणि मैत्रीबद्दल गुणगान करण्यात आले. त्यात समोसा कॉकसचाही उल्लेख करण्यात आला.

याच समोसा कॉकसची एक सदस्य असलेली कमला हॅरिस या सध्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी म्हणाले की, I am Told, Samosa Caucus is now flavour of the house म्हणजे समोसा कॉकसचा रंग अमेरिकन संसदेत चढायला लागला आहे.