युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 23:49 IST
1 / 6गेल्या काही दिवसांपासून जगातील विविध देशांमध्ये सत्ताविरोधी आंदोलनं होऊन बंड झाल्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान, आता बांगलादेश, नेपाळ, मोरक्को या देशात बंड होऊन आंदोलन सत्तांतरापर्यंत गेल्यानंतर जॉर्जियामध्ये बंडाचा भडका उडाला आहे. हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले असून, त्यांनी खुर्च्यांना आग लावली आहे. हातात युरोपियन युनियन आणि युक्रेनचे झेंडे घेतलेले आंदोलक युरोप किंवा मृत्यू अशा घोषणा देत आहेत. 2 / 6शनिवारी स्थानिक निवडणुकांसाठीचं मतदान संपत आलेलं असताना जॉर्जियात हजारो लोक रस्त्यांवर उतरले. जमावाने फ्रीडम स्क्वेअर येथून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला. जॉर्जियाने रशिया नव्हे तर युरोपच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, अशी मागणी आंदोलक करत होते.3 / 6यादरम्यान, चेहऱ्यावर मुखवटा घातलेल्या तरुणांनी राष्ट्रपती भवनाच्या बाहेर ठेवलेल्या फर्निचरला आग लावल्याने परिस्थिती चिघळली. पोलिसांनी परिसराला घेराव घातला तरी आंदोलक जमाव नियंत्रणात येत नव्हता. अनेक ठिकाणी झटापटी होत होत्या. तसेच त्यात अनेक आंदोलक जखमी झाले. 4 / 6विरोधकांकडून जॉर्जियन ड्रीम पार्टी ही रशियाच्या इशाऱ्यावर चालणारा पक्ष आहे, असा आरोप केला. सरकार जाणीवपूर्वक युरोपियन युनियनमध्ये सहभागी होण्याबाबतची चर्चा थांबवत आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. तसेच विरोधी पक्ष याचा उल्लेख देशद्रोह असा करत असून, देशात शांततापूर्ण क्रांतीचं आवाहन करत आहेत. 5 / 6आम्हाला युरोपियन व्हायचं आहे. मात्र आमचं सरकार आम्हाला पुन्हा मॉस्कोच्या गुलामगिरीत ढकलत आहे, असं एका आंदोलकाने सांगितलं. 6 / 6दरम्यान, राष्ट्रपती भवनाबाहेर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर आंदोलकांना रोखण्यासाठी चिलखती वाहनं तैनात करण्यात आली. तसेच पोलिसांनी इशारा देऊन आंदोलकांना हटवण्यासाठी पेपर स्प्रे आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला. तसेच अनेक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.