By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:27 IST
1 / 8बुधवारी ११ मार्च रोजी होर्मुजच्या सामुद्रधुनीत थायलंडचा झेंडा असलेल्या 'मयूरी नारी' या महाकाय मालवाहू जहाजावर अज्ञात क्षेपणास्त्राने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात जहाज आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून, जहाजावरील २३ पैकी २० कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले आहे, तर ३ जण अद्याप बेपत्ता आहेत.2 / 8'प्रेशियस शिपिंग' या कंपनीचे हे जहाज संयुक्त अरब अमिरातीतील खलिफा बंदरावरून भारताच्या गुजरात राज्यातील कंडला बंदराकडे निघाले होते. मात्र, होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडत असताना ओमानच्या उत्तर किनारपट्टीपासून ११ सागरी मैलांवर या जहाजाला लक्ष्य करण्यात आले. 3 / 8अज्ञात क्षेपणास्त्र थेट जहाजाच्या इंजिन रूममध्ये घुसल्याने जहाजाचे नियंत्रण सुटले आणि भीषण आग लागली. हल्ल्यानंतर जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. 4 / 8रॉयल थाई नेवीने दिलेल्या माहितीनुसार, ओमानच्या नौदलाने तत्काळ मदतकार्य राबवून २० खलाशांना सुखरूप बाहेर काढले आहे. बेपत्ता असलेल्या ३ खलाशांचा शोध घेण्यासाठी अमेरिका, बहरीन आणि युएईच्या आंतरराष्ट्रीय फौजा शर्थीचे प्रयत्न करत आहेत.5 / 8काही दिवसांपूर्वी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या निधनानंतर इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना गंभीर इशारा दिला होता. हा हल्ला इराणनेच केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 6 / 8दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, अशा हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे.7 / 8होर्मुजची सामुद्रधुनी ही कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी जगातील सर्वात महत्त्वाचा मार्ग मानली जाते. या भागात जहाजांना लक्ष्य केल्यामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किमती भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. 8 / 8रॉयल थाई नेवीने जाहीर केलेल्या फोटोंमध्ये जहाजातून काळ्या धुराचे लोट निघताना आणि समुद्रात 'लाईफ रिंग्स' तरंगताना दिसत आहेत, जे या हल्ल्याची भीषणता स्पष्ट करतात.