पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 08:58 IST
1 / 10पाकिस्तान आणि सौदी अरेबियानं बुधवारी एका महत्त्वपूर्ण संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे. या कराराचं नाव स्ट्रॅटेजिक म्युचुअल डिफेन्स एग्रीमेंट ठेवले आहे. या करारानुसार, जर या दोन्ही देशांपैकी कुठल्याही एका देशावर हल्ला झाला तर तो दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाणार आहे.2 / 10हा करार पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यात झाला आहे. रियादला पोहचलेले शरीफ यांनी अल यमामा पॅलेसमधील क्राऊन प्रिंस आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेतली. या दोन्ही देशातील करार जवळपास ८ दशके जुन्या भागीदारीच्या आधारे करण्यात आला. ज्यातून बंधुता, इस्लामिक एकता आणि सामायिक धोरणात्मक हितसंबंधांना आणखी बळकट करण्यात आले आहे असं पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाने कळवले3 / 10जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की, हा करार केवळ द्विपक्षीय सुरक्षा संबंधांना मजबूत करत नाही तर त्याचा हेतू प्रादेशिक आणि जागतिक शांततेत योगदान देणे आहे. जर दोन्ही पैकी एकाही देशाविरोधात आक्रमकता दाखवली गेली तर ती दोन्ही देशांविरोधातील आक्रमकता मानली जाईल असं करारात म्हटलं आहे. 4 / 10या कराराच्या माध्यमातून संरक्षण मदत वाढवणे, संयुक्त प्रतिकार विकसित करण्यावर आणि कोणत्याही संभाव्य हल्ल्यापासून बचाव करण्यावर भर देण्यात आला आहे.पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री इशाक डार, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ, अर्थ मंत्री मोहम्मद औरंगजेब, माहिती प्रसारण मंत्री अत्ताउल्लाह तारड यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. शरीफ जेव्हा रियादला पोहचले तेव्हा तिथे डिप्टी गर्वनर मोहम्मद बिन अब्दुलरहमान यांनी त्यांचे स्वागत केले. 5 / 10पंतप्रधान शरीफ यांचा या आठवड्यातील हा आखाती देशांमधील हा तिसरा दौरा आहे. याआधी ते कतारला २ वेळा गेले होते. अलीकडेच ते इस्रायली हल्ल्याविरोधात कतारच्या दोहा येथे इस्लामिक अरब समिट या मुस्लीम देशांच्या संमेलनासाठी उपस्थित होते. 6 / 10अमेरिकेचा प्रमुख सहकारी देश कतार याच्यावर इस्रायलने हल्ला केल्यानंतर आखाती देशांचा वॉश्गिंटनवरच्या विश्वासाला तडे गेले आहेत. त्यामुळे या देशांना त्यांची चिंता सतावू लागली आहे. 7 / 10इस्रायल संपूर्ण प्रदेशात आपल्या सैन्यासह अनियंत्रितपणे काम करत आहे याची आखाती देशांनी चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानसोबत संरक्षण करारावर स्वाक्षरी केल्यानंतर रियादने वॉशिंग्टनला याची माहिती दिली असं फायनान्शियल टाईम्सने वृत्त दिले आहे.8 / 10पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील हा करार भारत आणि पाकमध्ये मे महिन्यात झालेल्या सैन्य संघर्षानंतर ४ महिन्यांनी करण्यात आला आहे. त्यामुळे हा करार भारताच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.9 / 10करारानुसार, जर यापुढे भारताने पाकिस्तानवर हल्ला केला, तो सौदी अरेबियाही युद्धात सहभागी होणार आहे. परंतु सौदी अरेबियाने हा करार कुठल्याही देशाविरोधात नाही असं सांगितले आहे. हा करार वर्षानुवर्षे चाललेल्या चर्चेचा परिणाम आहे. हा कोणत्याही विशिष्ट देशाची किंवा घटनेची प्रतिक्रिया नाही तर दोन्ही देशांमधील दीर्घकालीन आणि सखोल सहकार्याचे संस्थात्मकीकरण आहे असं सौदीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 10 / 10सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांचा इतिहास जुना आहे. सौदी इतर आखाती देशांसोबत मिळून पाकिस्तानला कायम महत्त्वाची आर्थिक मदत करतो. या दोन्ही देशात संरक्षण भागीदारीही आहे. पाकिस्तानी सैन्याचे माजी प्रमुख रियादमध्ये सौदीच्या नेतृत्वातील दहशतवादविरोधी पथकाची कमान सांभाळतात.