भारताच्या भीतीने पाकने पाठवले सैन्य अन् मिळवला ताबा; जाणून घ्या बलुचिस्तानच्या संघर्षाची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 22:07 IST
1 / 11Pakistan Train Hijack: पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील लिबरेशन आर्मीने जाफर एक्स्प्रेस ट्रेनचे हायजॅक केल्याने बलुची आणि पाकिस्तानी राजवटीतील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ही घटना बलुच लिबरेशन आर्मीच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा परिणाम म्हणून पाहिली जात आहे. पाकिस्तानी राजवटीद्वारे संसाधनांचे शोषण, जातीय अस्मितेकडे दुर्लक्ष आणि सामाजिक-आर्थिक असमानतेमुळे बलुच फुटीरतावादाला खतपाणी मिळाले आहे. याशिवाय चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे तणाव आणखी वाढला आहे, ज्यामुळे या भागात हिंसाचार आणि अस्थिरता वाढली आहे.2 / 11 बलुचिस्तान वादाची मुळे 1947 मधील भारताची फाळणी आणि त्यानंतर बलुचिस्तानचे पाकिस्तानमध्ये विलीनीकरणात आहेत. बलुच लोक हा पाकिस्तान, इराण आणि अफगाणिस्तानमध्ये पसरलेला वांशिक समुदाय असून, त्यांच्या सांस्कृतिक, प्रादेशिक आणि भाषिक विविधतेसाठी ओळखला जातो. हे लोक दीर्घकाळापासून स्वतःला पाकिस्तानपासून वेगळे आणि उपेक्षित मानतात. 3 / 11 बलुच नेते मीर गौस बख्श यांनी 1947 मध्ये पाकिस्तानात सामील होण्याबद्दल म्हटले होते की, 'पाकिस्तानी अधिकारी पाकिस्तानमध्ये सामील होण्यासाठी दबाव आणत आहेत. त्यांचे मत आहे की, बलुचिस्तान आर्थिकदृष्ट्या स्वतःला टिकवून ठेवू शकणार नाही. पण, आमच्याकडे खनिजे आहेत, आमच्याकडे पेट्रोलियम आणि बंदरे आहेत. आता प्रश्न असा आहे की, आमच्याशिवाय पाकिस्तान कुठे असेल?'4 / 11 1947 मध्ये पाकिस्तानने स्वातंत्र्य घोषित केले, तेव्हा बलुचिस्तानचे तत्कालीन शासक खान ऑफ कलात यांनीदेखील स्वातंत्र्य घोषित केले. भारताच्या काश्मीर राज्याप्रमाणेच बलुचिस्तानच्या राज्यकर्त्यांनाही आपला प्रांत स्वतंत्र देश म्हणून प्रस्थापित करायचा होता, पण भारत कदाचित आपले सैन्य पाठवेल या भीतीने पाकिस्तान सरकारने बलुचिस्तानमध्ये आपले सैन्य पाठवले. 5 / 11 भारतीय सैन्याच्या भीतीने पाकिस्तानने मार्च 1948 मध्ये बलुचिस्तानवर जबरदस्तीने कब्जा केला. लष्करी बळावर केलेल्या या विलिनीकरणाला बलुच जनतेने कडाडून विरोध केला. येथून वादाला सुरुवात झाली, जी आज हिंसक संघर्षात रूपांतरित झाली आहे. या वादामुळे अनेकदा बॉम्बस्फोट, आत्मघाती हल्ले आणि अशा प्रकारच्या हायजॅकिंगची प्रकरणे समोर येत आहेत. बलुचिस्तानच्या लोकांनी पाकिस्तानी राजवटीच्या विरोधात अनेकवेळा मोठ्या प्रमाणात बंड केले आहे. बलुच जनतेच्या मागण्या आणि त्याकडे दुर्लक्ष करण्याच्या पाकिस्तान सरकारच्या कृतीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.6 / 11 बलुच सातत्याने पाकिस्तानी अत्याचारांचा विरोध करत आहेत. बलुच लोकांनी त्यांच्या वेगळी भाषा, संस्कृती आणि परंपरांसह, पंजाबी-वर्चस्व असलेल्या पाकिस्तानी संस्कृतीमध्ये सामील होण्याचा दीर्घकाळ प्रतिकार केला आहे. यामुळे बलुच लोकांमध्ये परकेपणा आणि उपेक्षितपणाची भावना निर्माण झाली आहे. त्यांना वाटते की, त्यांची ओळख आणि हक्कांचा पाकिस्तानी राजवटीने कधीच आदर केला नाही.7 / 11 दुसरीकडे पाकिस्तान सरकार बलुच राष्ट्रवादी गटांपैकी अनेकांना 'दहशतवादी' मानते. कोणताही विरोध किंवा सुधारणांची मागणी लष्करी बळाच्या मदतीने दाबली जाते. याचा परिणाम म्हणजे, बलुचिस्तानमधील मानवाधिकारांची स्थिती दयनीय झाली आहे. उदाहरणार्थ, बलुच अनेकदा पाकिस्तानी लष्करावर न्यायालयीन हत्या, किडनॅपिंग आणि अत्याचाराचा आरोप करतात.8 / 11 बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा आणि कमी लोकसंख्या असलेला प्रांत आहे, तरीही तो देशातील सर्वात गरीब आणि मागासलेला प्रदेश आहे. हा प्रांत नैसर्गिक वायू, कोळसा, तांबे आणि इतर खनिजांसह नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे. पाकिस्तानी राजवट अनेकदा जबरदस्तीने खोदकाम आणि ड्रिलिंग करते, ज्याला लिबरेशन आर्मी आणि इतर सशस्त्र गटांचा विरोध आहे.9 / 11 नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असूनही बलुच लोकांची गरिबी आणि अडचणी कमी होत नाहीत. चिनी अर्थसहाय्यित ग्वादर मेगा-पोर्टच्या बांधकामामुळे संकट आणखी वाढले आहे. हे बंदर सामरिकदृष्ट्या पाकिस्तानसाठी महत्त्वाचे असले तरी बलुचिस्तानमध्ये असूनही बलुच जनता त्याच्या विकास प्रक्रियेपासून दूर आहे. ग्वादरच्या आजूबाजूच्या जमिनीची बेकायदेशीर विक्री देखील झाली आहे, ज्यामुळे स्थानिक बलुच लोकसंख्येच्या खर्चावर मोठ्या प्रमाणात नफा कमावला जात असल्याचा आरोप पाकिस्तान सरकारवर झाला आहे.10 / 11 पाकिस्तानी राजवटीच्या दडपशाहीला प्रत्युत्तर म्हणून, गेल्या काही वर्षांत अनेक बलुच फुटीरतावादी गट उदयास आले आहेत. त्यांनी पाकिस्तानी सैन्याविरुद्ध राजकीय हिंसाचार केला आहे. बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट (BLF) आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) यांच्यासह या गटांचे लक्ष्य बलुचिस्तानला अधिक स्वायत्तता किंवा पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करणे हे आहे. या गटांनी पाकिस्तानी सुरक्षा दल, सरकारी अधिकारी आणि सीपीईसी प्रकल्पांमध्ये सहभागी असलेल्या चिनी कामगारांवरही वारंवार हल्ले केले आहेत.11 / 11 बलुचिस्तानमधील मानवी हक्कांच्या परिस्थितीचे गांभीर्य असूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर या संघर्षाकडे दुर्लक्ष केले जाते. सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारण्यांनी पाकिस्तान सरकारवर या प्रदेशात नरसंहार केल्याचा आरोप केला आहे, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर या आरोपांकडे फारसे लक्ष किंवा कारवाई झालेली नाही. नुकत्याच झालेल्या रेल्वे हायजॅकिंगनंतर पाकिस्तान सरकार काय भूमिका घेते हे पाहणे बाकी आहे.