US-इराण लढाईत पाकिस्तान अडकला, ३ संकटांनी घेरलं; असीम मुनीर यांनी बोलावली तातडीची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 17:05 IST
1 / 10अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सुरू असलेल्या विरोध प्रदर्शनाला प्रोत्साहन आंदोलनकर्त्यांनी संस्थांवर कब्जा करावा आणि मदतीसाठी पोहचत आहोत असं विधान करून चालना दिली. ट्रम्प यांच्या विधानामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. अमेरिका या आंदोलनकर्त्यांना नेमकी काय मदत पोहचवणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.2 / 10अमेरिका इराणवर सैन्य कारवाई करण्याचा प्लॅन करत आहे असं तज्ज्ञांना वाटते. दुसरीकडे इराणनेही अमेरिकेला सूचक इशारा दिला. आम्ही गप्प बसणार नाही. कुठल्याही प्रकारच्या सैन्य कारवाईला जशास तसे उत्तर देऊ असं इराणने म्हटलं आहे.3 / 10त्यातच इराण आणि अमेरिकेच्या लढाईमुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. अमेरिका इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे पाकिस्तानची झोप उडाली. पाकिस्तानी सैन्य आणि राजकीय नेतृत्व यांना या गोष्टीची चिंता लागून राहिली आहे की जर इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध पेटलं तर पाकिस्तानसाठी अडचणी आणखी वाढणार आहेत. आधीच अनेक आघाड्यांवर पाकिस्तानला संकटांचा सामना करावा लागत आहे. आता नवीन आघाडीवर परिस्थिती बिघडण्याच्या शक्यतेने पाकिस्तानी फिल्ड मार्शल आणि सैन्य प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. 4 / 10या उच्चस्तरीय बैठकीत आयएसआय प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जनरल असीम मलिक, कमांडर लेफ्टनंट जनरल राहत नसीम, मिलिट्री इंटेलिजेंस प्रमुख, चीफ ऑफ जनरल स्टाफ आणि अन्य वरिष्ठ जनरलचा समावेश आहे. या बैठकीत पाकिस्तान-इराण सीमेबाबत सर्वात मोठी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. 5 / 10अधिकाऱ्यांनी इशारा दिला की, पाकिस्तान आधीच ड्युरंड रेषेवर अफगाणिस्तानशी तणावाचा सामना करत आहे आणि आता इराण सीमेवर एक नवीन संकट देशासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. बैठकीत अमेरिकेने इराणविरुद्ध लष्करी कारवाई केल्यास ते पाकिस्तानी हवाई क्षेत्र किंवा लष्करी तळांचा वापर करण्याची मागणी करू शकते या शक्यतेवरही गंभीरपणे चर्चा झाली. 6 / 10अमेरिका आणि इराणच्या लढाईत जर अशी परिस्थिती उद्धभवली तर पाकिस्तानसाठी निर्णय घेणे अत्यंत कठीण होईल, कारण त्यामुळे देशातील राजकीय विरोध आणि प्रादेशिक तणाव दोन्ही वाढू शकतात. इराण अमेरिका युद्धात जर पाकिस्तानने अमेरिकेची साथ दिली तर त्याला अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागू शकतो असं पाकिस्तानी गुप्तहेरांनी म्हटलं आहे.7 / 10पाकिस्तानात जवळपास ३० टक्के लोकसंख्या शिया मुस्लिमांची आहे. त्यांना इराणविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे. जर इराणवर अमेरिकेने हल्ला केला तर ते सत्ता परिवर्तनाचा प्रयत्न करतील. त्यामुळे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात शिया मुसलमान विरोध प्रदर्शन करतील. इराण शरणार्थी आल्याने सीमेवर दबाव आणखी वाढू शकतो.8 / 10सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जनरल असीम मुनीर यांनी सर्व वरिष्ठ कमांडरना हाय अलर्टवर राहण्याचे आणि परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. परिस्थिती आणखी बिकट होऊ नये म्हणून आयएसआय प्रमुखांना इराण, तुर्की, कतार, युएई, सौदी अरेबिया आणि अमेरिकेशी राजनैतिक आणि सुरक्षा पातळीवरील चर्चा जलद करण्यास सांगितले आहे.9 / 10गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार पाकिस्तान, सौदी अरेबिया, कतार आणि तुर्की यांनी आधीच अमेरिकेला असे संकेत दिलेत की इराणवरील हल्ल्यामुळे संपूर्ण पश्चिम आशिया अस्थिर होऊ शकतो. मात्र जर अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांचे प्रशासन पुढे गेले आणि पाकिस्तानवर सहकार्य करण्यासाठी दबाव आणला तर इस्लामाबादला गंभीर धोरणात्मक आणि राजकीय नुकसान सहन करावे लागू शकते असं अधिकाऱ्यांना वाटते. 10 / 10देशात एकजूट करण्याचे प्रयत्न - जागतिक पातळीवर घडणाऱ्या घडामोडीमुळे पाकिस्तानी लष्कराने देशांतर्गत आघाडीवरही तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय शांतता समिती अंतर्गत लष्कर मुख्यालयात धार्मिक विद्वानांचे एक शिष्टमंडळ बोलावण्यात आले आहे. त्यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर एकसंध संदेश देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.