Omicron Variant: ओमायक्रॉन करतोय लसीला प्रभावहीन? संशोधनातून समोर आले धक्कादायक वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 10:57 AM2021-12-21T10:57:19+5:302021-12-21T11:02:16+5:30

Omicron Variant: डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही ओमायक्रॉन अधिक धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क: आताच्या घडीला जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. जगातील अनेक देशांची यामुळे चिंता वाढल्याचे दिसत आहे.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन कोरोनाप्रतिबंधक लसीला निष्प्रभ करत असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही ओमायक्रॉन अधिक धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.

अभ्यासाचा निष्कर्ष काय? ओमायक्रॉनची पुनर्लागण होण्याची क्षमता डेल्टापेक्षा पाचपट अधिक. कोरोनाप्रतिबंधक लसींना ओमायक्रॉन अजिबात जुमानत नाही.

ओमायक्रॉनचा धोका कोणाला अधिक? लसीचा दुसरा डोस घेतला आहे अशांना त्यानंतर दोन ते अधिक आठवड्यांत ओमायक्रॉनची बाधा होऊ शकते.

ज्यांनी बूस्टर डोस घेतला आहे अशा लोकांनाही ओमायक्रॉन होण्याची शक्यता आहे. मात्र, अशा बाधितांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत.

डेल्टापेक्षा ओमायक्रॉन कमी घातक आहे, अशी तरी कोणतीच लक्षणे अद्याप दिसलेली नाहीत, असे संशोधकांचे म्हणणे आहे. परंतु ओमायक्रॉनमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले, अशा बाधितांचे प्रमाण खूप कमी आहे.

कधी करण्यात आला अभ्यास? २९ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत आढळलेल्या कोरोनाबाधितांमधील ओमायक्रॉनची बाधा झालेल्यांचा अभ्यास लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमधील संशोधकांनी केला.

त्यांचे लसीकरण झाले आहे का? त्यांचे वय, लिंग, वंश, त्यांचे निवासी क्षेत्र इत्यादींचा या अभ्यासात समावेश होता. लसीकरणानंतर लागण न होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

कोरोना संसर्ग आणि त्यावर देण्यात आलेली लस या दोघांमुळे प्राप्त झालेली प्रतिकारशक्ती नंतर कमी होत जाते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याला ओमायक्रॉनचा धोका अधिक आहे, हे अधोरेखित होते. यावर कोरोनानियमांचे काटेकोर पालन करणे आणि बूस्टर डोस घेणे, हाच तूर्तास उपाय आहे. - प्रा. नील फर्ग्युसन, इम्पिरियल कॉलेज, लंडन