शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इस्रायलवर भारताचे मोठे उपकार! १०० वर्षांनी समोर आलं 'हाइफा' शहराच्या इतिहासातील सत्य, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:19 IST

1 / 10
इस्रायलवर भारताचे खूप मोठे उपकार आहेत. भारताने १०० वर्षापूर्वी इस्रायलच्या हाइफा शहराला तुर्कांपासून मुक्त केले होते. इस्रायलला ओटोमन राजवटीपासून मुक्त करण्यात भारतीय सैनिकांच्या महत्त्वाच्या भूमिकेला मान्यता देण्यासाठी इस्रायलने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.
2 / 10
सोमवारी हाइफा नगरपालिका अधिकाऱ्यांनी पहिल्या विश्व युद्धातील हाइफा लढाईत धाडसाने लढणाऱ्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. हाइफाच्या लढाईच्या १०७ व्या वर्धापन दिनानिमित्त इस्रायलमधील भारतीय दूतावासाने आयोजित कार्यक्रमात या गोष्टी समोर आल्या.
3 / 10
हाइफा शहराचे महापौर योना याहाव यांनी घोषणा केली की, स्थानिक शाळांमधील इतिहास अभ्यासक्रमात हे सत्य समोर आणण्यासाठी त्यात बदल केले जातील. हाइफाला मुक्त करणारे ब्रिटिश नव्हते, तर भारतीय सैनिक होते असं या पाठ्यपुस्तकांमध्ये असे लिहिले जाईल.
4 / 10
शहीद सैनिकांच्या शौर्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित समारंभात योना याहाव बोलत होते. 'मी याच शहरात जन्मलो आणि पदवीधर झालो. वर्षानुवर्षे आम्हाला शिकवले जात होते की हाइफाला ब्रिटिशांनी मुक्त केले. एके दिवशी ऐतिहासिक सोसायटीचे एक सदस्य माझ्या घरी आले आणि त्यांनी सांगितले की, व्यापक संशोधनातून हाइफाला ओटोमन साम्राज्यापासून मुक्त करणारे ब्रिटिश नव्हे तर भारतीय सैनिक होते हे सिद्ध झाल्याचं म्हटलं.
5 / 10
हाइफाची लढाई आता इतिहासातील शेवटच्या महान घोडदळ मोहिमांपैकी एक मानली जाते. भाले आणि तलवारींनी सज्ज असलेल्या भारतीय रेजिमेंट्सनी कार्मेल पर्वताच्या उंच डोंगरावर चढाई केली आणि ओटोमन सैन्याला पराभूत केले. प्रचंड अडचणी असूनही त्यांनी संपूर्ण शहर सुरक्षित केले. ही शौर्यपूर्ण मोहीम त्यांच्या अपवादात्मक शौर्य आणि सामरिक प्रभावासाठी लक्षात ठेवली जाते.
6 / 10
२३ सप्टेबर १९१८ साली हाइफाची लढाई लढली गेली. या लढाईत राजपूत सैन्याचे नेतृत्व जोधपूर संस्थानाचे सेनापती मेजर दलपत सिंह यांनी केले होते. इंग्रजांनी जोधपूर संस्थानाला हाइफावर कब्जा करण्याच्या सूचना केल्या होत्या. हे आदेश मिळताच दलपत सिंह त्यांच्या सैन्यासह शत्रूवर तुटून पडले.
7 / 10
या सैन्याने आपल्या पारंपारिक लढाई शैलीचा वापर करून शौर्याने लढा दिला, शत्रूच्या तोफा, बंदुका आणि मशीनगनच्या माऱ्यांना तोंड देत हा विजय मिळवला. या लढाईत जोधपूर सैन्याचे जवळजवळ ९०० सैनिक शहीद झाले. शेवटी विजय भारतीयांना मिळाला ज्यांनी हाइफावर कब्जा केला. अशाप्रकारे ४०० वर्षे जुनं ओटोमन साम्राज्य ज्यांनी ताब्यात ठेवले त्यांचा अंत झाला.
8 / 10
न्यूजऑनएअरच्या वृत्तानुसार इस्रायलमधील भारतीय राजदूत जे.पी. सिंह म्हणाले की, घोडदळाच्या सैन्याने इतक्या लवकर एका तटबंदी असलेल्या शहरावर कब्जा केल्याची ही एकमेव नोंद आहे. पहिल्या महायुद्धात ७४,००० हून अधिक भारतीय सैनिकांनी आपले प्राण दिले होते त्यापैकी ४,००० हून अधिक पश्चिम आशियात शहीद झाले होते अशी आठवण त्यांनी करून दिली.
9 / 10
१९१८ मध्ये हाइफा मुक्त करणाऱ्या तत्कालीन जोधपूर, म्हैसूर आणि हैदराबाद लान्सर्समधील भारतीय सैनिकांच्या धाडस आणि शौर्याचा या समारंभात गौरव करण्यात आला. या समारंभाला राजदूत जेपी सिंग आणि हाइफा शहराचे महापौर योना याहाव यांच्यासारख्या मान्यवरांनी हजेरी लावली. शिवाय इस्रायलमधील भारतीय दूतावासाने या भूमीसाठी भारतीय सैनिकांनी केलेले बलिदान हा एक वारसा आहे जो भारत आणि इस्रायलमधील मैत्रीचे अतूट बंध मजबूत करत आहे अशी सोशल मीडिया पोस्ट केली.
10 / 10
हाइफा येथे दरवर्षी २३ सप्टेंबर रोजी हाइफा दिन साजरा केला जातो. हा दिवस तीन भारतीय घोडदळ रेजिमेंट्स (म्हैसूर, हैदराबाद आणि जोधपूर लान्सर्स) यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो, ज्यांच्या आक्रमक घोडदळाच्या पराक्रमाने १९१८ मध्ये शहर तुर्कांपासून मुक्त केले.
टॅग्स :Israelइस्रायलIndiaभारत