शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5

    इराणची ‘मच्छर सेना’ अमेरिकेला ठरतेय भारी! का आहे इतकी खास?

    By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 14:26 IST

    1 / 7
    अमेरिका-इस्रायलसारख्या बलाढ्य राष्ट्रांनी इराणविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर इराणचा ते चुटकीसरशी पाडाव करतील असं अनेकांना वाटत होतं, अमेरिकेनं तर तसा दावाच केला होता; पण इराण त्या सगळ्यांना पुरून उरला आणि अजूनही त्यांना कडवी लढत देतो आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीत तर इराणच्या ‘मच्छर अर्थात डास सेने’नं अमेरिकेच्या अक्षरश: नाकीनऊ आणले आहे!
    2 / 7
    इराणनं समुद्रात छोट्या बोटींचा वापर करून अनेकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेसमोर इराणच्या ‘मॉस्किटो फ्लीट’ची (मच्छर सेना) छापामार रणनीती प्रभावी ठरली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार दावा केला की, इराणचं नौदल पूर्णपणं उद्ध्वस्त झालं आहे. मात्र, पारंपरिक युद्धनौकांचं मोठं नुकसान होऊनही होर्मुझ सामुद्रधुनीत इराणचं वर्चस्व कायम आहे. तज्ज्ञांच्या मते, होर्मुझ सामुद्रधुनीत इराणचा मुकाबला करणं सोपं नाही, कारण त्याच्याकडं अनेक ‘अदृश्य शस्त्रं’ आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचं शस्त्र म्हणजे त्यांची ‘मॉस्किटो फ्लीट’ किंवा ‘मच्छर सेना’!
    3 / 7
    होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना धमकावण्याची इराणची क्षमता प्रत्यक्षात अपारंपरिक युद्धप्रणालींच्या अनेक स्तरांवर अवलंबून आहे. यात ड्रोन हल्ले, बारुदी सुरंग आणि ‘मच्छर सेना’ यांचा समावेश आहे. पारंपरिक नौदल साधनांच्या तुलनेत यांना ओळखणं अतिशय कठीण ठरतं.
    4 / 7
    इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या (आयआरजीसी) या छोट्या जहाजांमुळं अमेरिकन सैन्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या बोटींवर तैनात असलेली क्षेपणास्त्रं, बंदुका आणि इतर शस्त्रं. मॉस्किटो फ्लीट प्रत्यक्षात समुद्रावर लढली जाणारी गनिमी युद्धपद्धती आहे.
    5 / 7
    होर्मुझ सामुद्रधुनीजवळ इराणची बेटं असणं या ताफ्याची ताकद आणखी वाढवतं. होर्मुझ सामुद्रधुनीच्या अरुंद मार्गातून जाणारी व्यापारी जहाजं आणि शक्तिशाली युद्धनौकादेखील या भागात इराणच्या या ताफ्यासमोर असहाय ठरतात! छोट्या, वेगवान आणि चपळ बोटींचा हा ताफा आहे. हल्ला करून पसार होण्याची त्यांची रणनीती आहे.
    6 / 7
    जहाजांची वाहतूक विस्कळीत करणं किंवा युद्धनौकांना नुकसान पोहोचवण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. हा ताफा समुद्रात छापामार दलासारखा काम करतो. हा ताफा ‘हल्ला करा आणि पळा’ या रणनीतीवर अवलंबून असतो. मच्छर सेनेतील बोटींच्या माध्यमातून गार्ड नौदल लपलेल्या ठिकाणांवरून क्षेपणास्त्रं आणि ड्रोन प्रक्षेपित करू शकतं. या बोटी अनेकदा इतक्या छोट्या असतात की, उपग्रह चित्रांमध्येही दिसत नाहीत. त्यांना खडकाळ समुद्री किनाऱ्यांवर खोदलेल्या खोल गुहांमधील घाटांवर बांधून ठेवलं जातं. गरज पडताच त्यांना तत्काळ समुद्रात उतरवलं जातं.
    7 / 7
    या बोटी अचानक समोर येऊन मोठ्या युद्धनौकेला घेरतात आणि तिला मोठं नुकसान पोहोचवू शकतात. या बोटी ताशी सुमारे १०० मैल वेगानं धावतात. त्या रडारवर दिसत नाहीत आणि त्यांना रोखणं अत्यंत कठीण असतं. या बोटींवर अँटी-शिप क्षेपणास्त्रं, रॉकेट लाँचर, मशीनगन आणि आत्मघाती ड्रोनदेखील तैनात असतात. याच मच्छर सेनेच्या बळावर इराण आजही होर्मुझ सामुद्रधुनीवर वर्चस्व राखून आहे.
    टॅग्स :World Trendingजगातील घडामोडीUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणAmericaअमेरिकाWarयुद्ध