शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 17:38 IST

1 / 6
अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या सव्वा महिन्यापासून सुरू असलेल्या युद्धाने सध्या भीषण रूप धारण केलं आहे. त्यात गेल्या २४ तासांमध्ये इराणने अमेरिकेला जबर दणका देत अमेरिकेची दोन विमाने पाडली आहेत. तर शोधमोहिम आणि बचावासाठी पाठवण्यात आलेली अमेरिकेची दोन हेलिकॉप्टर्ससुद्धा इराणच्या गोळीबाराची शिकार झाली होती. त्यामुळे इराणच्या हाती असं कोणतं हत्यार लागलंय, ज्याच्या जोरावर इराण अमेरिकन हवाई दलाच्या नाकी नऊ आणत आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
2 / 6
२८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या संघर्षामध्ये आतापर्यंत इराणवर हवाई वर्चस्व राखल्याचा दावा अमेरिका करत होती. मात्र गेल्या २४ तासांत अमेरिकेच्या या दाव्यांना इराणने सुरुंग लावला आहे. तसेच अमेरिकेचा प्रतिकार करण्यासाठी अत्याधुनिक एअर डिफेन्स प्रणालीचा वापर केल्याचा दावा इराणने केला आहे. या पार्श्वभूमीवर इराणकडे सध्या असलेल्या शस्त्रास्त्रांचा आज आपण आढावा घेऊयात.
3 / 6
इराणने अमेरिकेच्या एफ-१५ई आणि ए-१० सारख्या विमानांना पाडण्यासाठी मजीद इफ्रारेड एअर डिफेन्स सिस्टिमचा वापर केला. ही सिस्टिम २०२१ पासून इराणजवळ आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे ही प्रणाली रडारवर अवलंबून नसते. तर ती पॅसिव्ह इफ्रारेड डिटेक्शन आणि प्रॉक्सिमिटी फ्यूजचा वापर करते. म्हणजेच ती कुठलेही रडार सिग्नल पाठवत नाही. त्यामुळे अमेरिकन विमान तिला आधी डिटेक्ट करू शकत नाहीत. मजीदची रेंज आठ किमी लांब आणि सहा किमी उंचीपर्यंत आहे. तसेच याचे इंफ्रारेड सेंसर्स १५ किमी पर्यंतच्या लक्ष्याला पाहू शकतात.
4 / 6
इराणने काही हल्ले करण्यासाठी खांद्यावरून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे. हल्लीच इराणने रशियाकडून ५०० वर्बा मॅनपॅड्स मिळवले होते. ही जगातील सर्वात अॅडव्हान्स शॉर्ट रेंज सिस्टिम आहे. ती बॅकग्राऊंड हीटनंतरही आपल्या लक्ष्याला शोधून काढू शकते.
5 / 6
काही विश्लेषकांच्या मते इराण चिनी बनावटीच्या एचक्यू-९बी या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र प्रणालीचाही वापर करत आहे. यामध्ये रडार आणि इन्फ्रारेड दोन्ही गाईडन्स आहेत. ही क्षेपणास्त्रे विमानांनाही लक्ष्य करू शकतात. तसेच इलेक्ट्रॉनिक जॅमिंगपासून स्वत:चा बचाव करू शकतात.
6 / 6
दरम्यान, युद्धाच्या या टप्प्यावर इराणने आपली रणनीती पूर्णपणे बदलली आहे. आधीच्या फिक्स एअर डिफेन्स साईट ऐवजी आता बहुतांश सिस्टिम ह्या अंडरग्राऊंड मिसाईल सिटी, बोगदे आणि पर्वतीय परिसरात लपवण्यात आल्या आहेत. हे मोबाईल लॉन्चर शूट अँड स्कूट पद्धतीने काम करतात. त्यामुळेच अमेरिका आणि इस्राइलच्या रोजच्या हल्ल्यांनंतरतही इराणचे अर्ध्याहून अधिक मिसाईल लॉन्चर सुरक्षित आहेत.
टॅग्स :IranइराणWarयुद्धUnited Statesअमेरिका