२८ वर्षीय तरुणाचा कारनामा, २३३ वर्षे जुन्या बँकेला केलं कंगाल; अवघ्या ९३ रुपयांत विकावी लागली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 09:16 AM2022-11-08T09:16:22+5:302022-11-08T09:28:03+5:30

तुम्ही विचारही करू शकता का की एखादी व्यक्ती एका फटक्यात इतक्या जुन्या बँकेला इतकं कंगाल शकतो? पण असं झालंय. पाहा नक्की झालं काय होतं.

ही कहाणी एका 28 वर्षीय तरुणाची आहे ज्याने इंग्लंडमधील 233 वर्षे जुन्या बँकेला एकाच फटक्यात उध्वस्त केले. राणी एलिझाबेथ II यांचे ज्या बँकेत एकेकाळी खाते असायचे तिची स्थिती अशी होती की ती फक्त एक पौंड (93.28 भारतीय रुपये) किमतीला विकली गेली. हा नक्की प्रकार काय आणि ते कसे घडले हे पाहू.

25 फेब्रुवारी 1967 रोजी इंग्लंडमधील वॅटफोर्ड येथे जन्मलेल्या निक लीसनचे स्वप्न एक यशस्वी स्टॉक ट्रेडर बनण्याचे होते. जेव्हा तो 23 वर्षांचा झाला तेव्हा त्याने मॉर्गन स्टॅनले नावाच्या कंपनीत काम करायला सुरुवात केली. यादरम्यान निकने कंपनीकडे प्रमोशनची मागणी केली. मात्र त्याच्या मॅनेजरने त्याला प्रमोशन दिले नाही. यामुळे निकने ही कंपनी सोडली. त्यानंतर 1990 मध्ये तो इंग्लंडच्या सर्वात जुन्या बॅरिंग्ज बँकेत काम करू लागला. पण बेरिंग्ज बँकेला माहित नव्हते की निकला कामावर घेणे किती जड जाणार आहे.

निक येथे आला आणि एक नवीन वातावरण पाहिले. येथील बहुतेक कंम्प्युटर्स जुनेच होते. या ठिकाणी लोक काम नीट करत नव्हते आणि बँकेने अशी अनेक कर्जे दिली होती, ज्यांची परतफेड लोकांनी कधीच केली नाही. निकने लगेचच त्यांची चौकशी सुरू केली. या तपासासाठी त्यांनी अनेक देशांचा दौराही केला. शेवटी, निकने सुमारे 100 दशलक्ष पौंड (932 कोटी भारतीय रुपये) कर्जाचा पर्दाफाश केला. निकच्या या तपासामुळे बँकेला खूप फायदा झाला. त्यामुळे बँकेने निकला प्रमोशनही दिले. अशाप्रकारे निकचे स्टॉक ट्रेडर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

बँकेने त्याला सिंगापूरच्या फ्युचर्स विभागाचे प्रमुख केले. मग इथून सगळा गोंधळ सुरू झाला. सिंगापूरमध्ये असताना बँक जपानच्या स्टॉक एक्स्चेंजवर काम करत होती. निकचे काम स्टॉकवर बेट लावणे होते. जर बाजार निकच्या अंदाजानुसार गेला तर त्याला नफा झाला असता. अन्यथा नुकसान झाले असते. निकचे पहिले वर्ष येथे खराब गेले आणि त्याच्या बेट्स या तोट्यातल्या ठरू लागल्या. आता बँक त्याची नोकरी काढून घेईल अशी भीती निकला वाटत होती. म्हणूनच हे नुकसान लपवण्यासाठी निकने एक गुप्त खाते तयार केले, ज्यामध्ये हे स्टॉक ठेवले होते. हे लपवण्यासाठी निकला खूप पैशांची गरज होती. त्यामुळे तो बँकेत खोटे बोलण्यास सुरूवात केली.

निकला नवीन क्लायंटसाठी अधिक पॉईंट्स हवे होते. कारण आता तोटा समोर येत नव्हता, तेव्हा बँकेलाही हे पॉईंट्स द्यायला हरकत नव्हती. निकचे हे दावे कोणीही एकदाही तपासले नाहीत. या खात्यात पडलेले स्टॉक्स प्रॉफिटमध्ये आल्यानंतर नंतर बाहेर काढू, अशी निकची कल्पना होती. अशात बँकेला कधी तोटा झाला हे कळणारही नाही. निकने एका मुलाखतीत सांगितले की, तो असे करताना दोन दिवस खूप घाबरला होता की कदाचित तो पकडला जाऊ नये. पण काहीच न झाल्याने त्याची हिंमत आणखी वाढली.

1992 पर्यंत, निकने बँकेचे सुमारे 40 लाख पौंडांचे (37 कोटी 31 लाख भारतीय रुपये) नुकसान केले होते. मात्र बँकेला हे सर्व माहीत नव्हते. बँकेला वाटले की निक त्यांच्यासाठी नफा कमवत आहे. पण जुलै 1993 मध्ये निकची योजना कामी आली आणि सर्व नुकसान भरून काढले. पण त्यानंतर त्याची हिंमत वाढली आणि त्याने आणखी जोखमीचे पैज लावायला सुरुवात केली. त्या वेळी निकची प्रतिमा एक यशस्वी ट्रेडर अशी बनली होती आणि कोणत्याही परिस्थितीत त्याला ही प्रतिमा जपायची होती.

यानंतर बेरिंग्ज बँकेत रॉन बेकरचा प्रवेश झाला. बँकेने कामकाज हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. काम सुरू असताना रॉनची नजर सिंगापूर विभागावर पडली, जिथून बँकेला जास्त नफा मिळत होता. इथेच त्याला निकवर संशय आला. त्याला असे आढळले की ज्या क्लायंटला निकने पैसे दिले ते त्यांचे पेमेंट करत नव्हते. त्यामुळे जुलै 1993 मध्ये बँकेचे अंतर्गत ऑडिट बोलावण्यात आले. ऑडिटर्स सिंगापूरला गेले. हे जाणून निक घाबरला, कारण त्याचे सत्य बाहेर येणार होते. त्यावेळी त्याने 94 मिलियन पौंडांचे (876 कोटी भारतीय रुपये) नुकसान लपवले होते. जे आधीच्या नुकसानीपेक्षा 23 पट जास्त होते.

निकला माहित होते की जर ऑडिटर्सना गुप्त खात्याशी संबंधित एकही कागदपत्र सापडले तर त्याचे सत्य सर्वांसमोर येईल. पण बेरिंग्ज बँकेच्या लोकांनी हे काम अगदी हलक्यात घेतले. त्यामुळे ऑडिटर्सनी खात्यांशी संबंधित एकही कागदपत्र व्यवस्थित तपासले नाही. अशाप्रकारे निक यातू वाचला. सप्टेंबर 1994 पर्यंत, ही तूट 160 दशलक्ष पौंड (14 अब्ज 92 दशलक्ष 4 दशलक्ष भारतीय रुपये) पर्यंत वाढली होती. परिणामी, निकला त्याचे काही वैयक्तिक स्टॉक बँकेला सवलतीच्या दरात विकावे लागले. जेणेकरून बँक नफा कमावते आहे असे वाटेल. दुसरीकडे, बँक ग्राहकांसाठी निकला सतत पैसे देत होती. कधी-कधी निक एका दिवसात 10 ते 50 लाख पौंड (9 कोटी 31 लाख ते 46 कोटी 63 लाख भारतीय रुपये) मागायचा. बँकही त्यांना न तपासता मान्यता देत राहिली.

आता निक एखाद्या सेलिब्रिटीसारखा झाला होता. डिसेंबर 1994 च्या ट्रेडर मीटिंगमध्ये बँकेचा पोस्टर बॉय म्हणून बँकेने त्यांची ओळख करून दिली. कारण रेकॉर्डनुसार, निकने त्या वर्षी बँकेला 28 मिलियन पौंड (2 अब्ज 61 कोटी 17 लाख भारतीय रुपये) कमावले होते. मात्र त्या बैठकीत अनेक ट्रेडर्सना त्यात काही गडबड आढळून आली. यासंदर्भात त्यांनी बँकेशी बोलणेही केले. मात्र बँकेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. परिस्थिती अशी झाली होती की आता निक 75 टक्के पैसे एकट्या बँकेत हाताळत होता. तर दुसरीकडे निकने आतापर्यंत बँकेला 330 दशलक्ष पौंडांपेक्षा जास्त म्हणजेच 30 अब्ज 78 कोटी 9 लाख भारतीय रुपयांचे नुकसान केले होते. आता हे दडपण सांभाळणे निकसाठी खूप कठीण झाले होते.

पण निकने एक शेवटचा प्रयत्न केला. जपानचा बाजार पुढील सहा महिने स्थिर राहिल अशी त्याने बेट केली आणि ती निकची सर्वात मोठी बेट होती. असे झाले असते तर निकचे सर्व नुकसान भरून निघाले असते. काही आठवडे सर्व काही ठीक चालले. पण 17 जानेवारी 1995 रोजी जपानमध्ये मोठा भूकंप झाला, ज्याचा तिथल्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. शेअर बाजारात घसरण सुरू झाली. पण तरीही बँकेकडून निधी मिळत होता. निक दिवसेंदिवस बँकेचा तोटा करत होता. दरम्यान, निक 5 लाख पौंडांचे (4 कोटी 66 लाख भारतीय रुपये) मोठे नुकसान लपवायला विसरला. हा तोटा ऑडिटर्सच्या लक्षात आल्यावर त्याला प्रश्न विचारण्यात आला. पण निकने बँकेच्या कर्जाचे बनावट कागदपत्र तयार करून ते आपल्या नजरेतून गायब केले. तर, या कागदपत्रांवरून हे स्पष्ट झाले की ते बँकेकडून पाठवले गेले नव्हते, तर निकच्या वैयक्तिक फॅक्स मशीनवरून पाठवले गेले होते.

17 फेब्रुवारी 1995 रोजी सिंगापूरमध्येच एका बँकेच्या क्लर्कने निकच्या कागदपत्रांमध्ये तफावत लक्षात घेतली. त्याने निकला याबाबत विचारण्यास सुरुवात केली. एके दिवशी कारकून निकच्या घरी याबाबत बोलायला गेला तेव्हा त्याने पत्नी आजारी असल्याचे कारण पुढे केले. त्याला तासभर बाहेर जावे लागणार असल्याचे सांगितले. त्यानंतर निक परत आलाच नाही. तो देश सोडून गेल्याचे समोर आले. निक गायब झाल्यावर बँकेला निकचे गुप्त खाते सापडले. ज्यामध्ये आता तोटा वाढून 83 दशलक्ष पौंड (७७ अब्ज ४१ कोटी ८७ लाख भारतीय रुपये) झाला आहे. आता काहीच करता येणार नाही हे बँकेला माहीत होते. मार्केट उघडण्यापूर्वी त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंग्लंडची मदत घेतली. परंतु काहीही झाले नाही आणि 233 वर्षांच्या दीर्घ इतिहासानंतर, बेरिंग्ज बँक कोसळली. त्याच वेळी, तोटा झाल्यानंतर, एका डच बँकेने फक्त एक पौंड (93.28 भारतीय रुपये) देऊन ती विकत घेतली.

त्यानंतर 30 नोव्हेंबर 1995 रोजी निकला जर्मनीतून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला सिंगापूरला आणण्यात आले. बँक आणि सिंगापूर एक्सचेंजच्या लेखापरीक्षकांची फसवणूक केल्याबद्दल निकवर दोन कलमे लावण्यात आली होती. डेली मेलच्या वृत्तानुसार, यासाठी त्याला केवळ साडेसहा वर्षांची शिक्षा झाली. मात्र साडेतीन वर्षांनी चांगल्या वागणुकीमुळे त्यांची सुटका झाली. निकला इतकी कमी शिक्षा झाली कारण कोर्टाचा असा विश्वास होता की बँकेचीही यात चूक आहे. बँकेने न तपासता निकला इतके पैसे दिले आणि ऑडिट होऊनही ऑडिटर्स निकचे गुप्त खाते पकडू शकले नाहीत.

सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत निकने सांगितले की, त्याने जे काही केले ते चुकीचे होते. पण एका वरिष्ठांनीही आपले काम चोख बजावले असते तर ते हे कधीच होऊ शकले नसते. निकने सिंगापूरच्या चांगी जेलमध्ये घालवलेल्या दिवसांचा अनुभवही शेअर केला. तुरुंगाचे दिवस त्याच्यासाठी खूप कठीण होते, असे त्याने सांगितले. तुरुंगात त्याच्यासोबत चिनी आणि मलेशियन अंडरवर्ल्डचे खतरनाक कैदीही होते. तो अनेकदा घाबरत असे. तुरुंगात पूर्ण अंधार होता. तिथे फक्त रात्रीच दिवे लावले जायचे. कारागृहाच्या आत एकही खिडकी नव्हती. त्यांना एका छिद्रातून अन्न देण्यात येत होते. तुरुंगात वेळ घालवण्यासाठी मी गाणी म्हणत असे, असेही त्याने सांगितले.