कुत्र्यांना मारून चीन संपवतोय कोरोना? व्हिडीओ व्हायरल; लोक संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 04:22 PM2021-11-16T16:22:13+5:302021-11-16T16:28:43+5:30

चीनमध्ये नागरिक नाराज; आरोग्य यंत्रणेविरोधात संताप

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा फैलाव होऊ लागला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी चीन सरकार प्रयत्नशील आहे.

२०१९च्या अखेरीस चीनच्या वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर चीननं लॉकडाऊन करत परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर आता कोरोना रोखण्यासाठी चीननं भलताच मार्ग अवलंबला आहे.

कोरोना रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी कोविड प्रोटोकॉलच्या नावाखाली कुत्र्यांना मारत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे. आरोग्य कर्मचारी एका पाळीव कुत्र्याला निर्घृणपणे संपवत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

चीनमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी एका कुत्र्यांची हत्या केली. या कुत्र्याची मालकीण आयसोलेशनमध्ये असताना हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून चीनच्या कोरोना हाताळणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

डेली मेलनं दिलेल्या वृत्तानुसार, जिआंगशी प्रांतातील शांगरावमध्ये असलेल्या एका घरात घसून आरोग्य कर्मचाऱ्यांनी कुत्र्यावर लोखंडाच्या रॉडनं हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. त्यात पीपीई किट घातलेले काही जण कुत्र्यावर हल्ला करताना दिसत आहेत.

कुत्र्याच्या मालकिणीचं नाव फू असं आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं. मात्र तिच्या कुत्र्याची चाचणी शिल्लक होती. कुत्र्यामध्ये कोरोनाची काही लक्षणं दिसत होती. त्यामुळे त्या कुत्र्याची हत्या करण्यात आली.

फू राहत असलेल्या भागात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्यानं तिला एका हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं. त्यानंतर काही तासांत दोन आरोग्य कर्मचारी तिच्या घरात शिरले. त्यांच्या हातात एक रॉड आणि प्लास्टिक पिशवी होती. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली.

आरोग्य कर्मचाऱ्यांनी कुत्र्याला शोधून काढलं. तो एका टेबलखाली लपला होता. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याच्या डोक्यात रॉडनं वार केले. कोरोना रोखण्यासाठी चीनकडून वापरण्यात येत असलेल्या या पद्धतीला आता विरोध होत आहे.