शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 08:43 IST

1 / 10
इराणच्या संसदेने एका ऐतिहासिक विधेयकाला मंजुरी दिली आहे. यापुढे इराणचं राष्ट्रीय चलन रियालमधून चार शून्य हटवण्यात येतील. याचा अर्थ १०००० रियाल आता १ रियालच्या बरोबरीचा असेल. हा केवळ नंबर गेम नाही तर यामागे महागाई, निर्बंध आणि आर्थिक तंगीच्या बदलाची कहाणी आहे.
2 / 10
इराण हे पाऊल का उचलत आहे? चलनातून चार शून्य हटवल्याने त्याचा फायदा काय होणार, याआधी कुठल्या देशाने असा निर्णय घेतलाय का, जर केले असेल तर त्याने संबंधित देशाच्या अर्थव्यवस्थेत काय सुधारणा दिसून आली यासारखे अनेक प्रश्न या इराणच्या निर्णयाने उपस्थित झाले आहेत.
3 / 10
सर्वात आधी समजून घेऊया की, सध्या इराणच्या चलनाची अवस्था बिकट आहे. १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर रियाल संकटाचा सामना करत आहे. आता हे चलन कागदापेक्षाही स्वस्त झालं आहे. सोप्या भाषेत समजून घ्या, १ अमेरिकन डॉलर हवं असेल तर त्यासाठी ११,५०,००० रियाल हवेत. याचा अर्थ एक भाकरी खरेदी करण्यासाठी लाखोंच्या नोटा मोजाव्या लागतात.
4 / 10
मागील काही वर्षात इराणमध्ये महागाई ३५ टक्क्यांहून अधिक झाली आहे. कधी कधी हा दर ४० टक्के तर कधी ५० टक्क्यांपर्यंत पोहचतो. २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा एक अहवाल समोर आला, ज्यामध्ये इराणच्या वाईट स्थितीचा उल्लेख करण्यात आला.
5 / 10
इराण हा देश तेल निर्यातीवर अवलंबून आहे, परंतु अमेरिकेच्या निर्बंधांमुळे चीनशिवाय कोणीही त्याच्याकडून तेल खरेदी करत नाही. तेल निर्यातीतील कमतरतेमुळे त्यांच्या तिजोरीवर गंभीर परिणाम झाला आहे असं जागतिक बँकेचे म्हणणे आहे. परिणामी महागाई चार वर्षांपासून ४० टक्क्याच्या वर राहिली आहे.
6 / 10
मागे वळून पाहिल्यास ही नवीन गोष्ट नाही. १९७९ पासून इराणचा महागाई दर १० टक्क्यांहून अधिक आहे. इस्लामिक क्रांतीनंतर आयातीच्या किमती गगनाला भिडल्या. जास्त आयात आणि कमी निर्यातीमुळे चलनाचे अवमूल्यन झाले. २०२३ मध्ये 'रियाल' इतका घसरला की, चलन अवमूल्यनापेक्षा महागाईने जास्त वाढ केली. निर्बंधांमुळे परकीय चलनाचा प्रवाह रोखला गेला, ज्यामुळे जगाशी संबंध ताणले गेले. राजकीय एकाकीपणामुळे अर्थव्यवस्था कोलमडली.
7 / 10
शून्य काढून टाकल्याने काय होईल? हा आता प्रश्न आहे. इराणचं सरकारी माध्यम IRNA ने वृत्त दिले आहे की, रियाल तेच राहील, चलनातून फक्त चार शून्य काढून टाकले जातील. मध्यवर्ती बँकेकडे तयारीसाठी दोन वर्षे असतील. त्यानंतर तीन वर्षांचा संक्रमण कालावधी असेल, जिथे जुन्या आणि नवीन दोन्ही नोटा चलनात असतील.
8 / 10
१०,००० जुने रियाल आता १ नवीन रियाल बनेल. यामुळे व्यवहार सोपे होतील. बिले भरताना मोजण्याची अडचण दूर होईल. जिथे पूर्वी एका भाकरीसाठी १०,००० रियाल द्यावे लागत होते तिथे आता एक रियाल द्यावे लागेल. लाखांमध्ये मोजण्याऐवजी आता शेकडोमध्ये मोजावे लागेल.
9 / 10
याआधी व्हेनेझुएला इथं जेव्हा महागाई शिगेला पोहोचली तेव्हा २०१८ मध्ये चलनातून पाच शून्य काढून टाकले आणि नंतर २०२१ मध्ये पुन्हा तेच केले, पण महागाई अजूनही जास्त आहे. झिम्बाब्वेमध्ये २००० च्या दशकात हे केले. १ ट्रिलियन डॉलरच्या नोटेतून शून्य काढून टाकले, पण व्यवस्था सुधारली नाही.
10 / 10
तुर्कीत २००५ मध्ये चलनातून सहा शून्य काढून टाकले आणि नवीन लिरा आणला. त्यामुळे महागाई नियंत्रणात आणली गेली. ब्राझीलमध्ये १९९४ मध्ये रियाल योजनेमुळे महागाई आटोक्यात आणली. घाना येथे २००७ मध्ये सिस्टी काढून टाकले, परंतु परकीय गुंतवणुकीवर त्याचा परिणाम संमिश्र होता.
टॅग्स :IranइराणAmericaअमेरिका