CoronaVirus News : कोरोना लसींच्या शर्यतीत 'हा' देश आघाडीवर; जाणून घ्या, मानवी चाचणीनंतर काय?

Published: October 27, 2020 02:01 PM2020-10-27T14:01:35+5:302020-10-27T14:23:54+5:30

जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजला आहे. कोरोनापुढे प्रगत देशही हतबल झाले आहेत. जगभरात लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत जगभरातील देशांमध्ये कोरोनावरील लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहे.

कोरोनावरील या लसीची अनेक देशांतील लोक आतुरतेने वाट पाहात आहे. तर काही तज्ज्ञांनी या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस लस तयार होण्याचा दावा केला आहे.

दरम्यान, लसीच्या चाचणीमधील दुष्परिणामांमुळे (साइड इफेक्ट) लोकांना बर्‍याच वेळा धक्का बसला आहे. ऑक्सफोर्ड आणि जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसींच्या बाबतीत असे घडले आहे.

WHO च्या अहवालानुसार, सध्या जगभरात १५४ लसींवर क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. यामध्ये ४४ लस या मानवी चाचणीच्या टप्प्यात आहे. मानवी चाचण्यांमध्येच लसीची प्रभावशीलता आणि सुरक्षितता तपासली जाते. मात्र, ही लस अधिकृतपणे लोकांपर्यंत पोहोचवण्याची अजून दोन टप्पे आहेत.

लसीच्या शर्यतीत सध्या तीन चिनी कंपन्या आघाडीवर आहेत. लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यातील सिनोव्हॅक (चीन), सिनोफार्म (वुहान) आणि सिनोफार्म (बीजिंग) या तीन कंपन्या आहेत.

यापैकी दोन कंपन्यांनी जुलैमध्येच ही लस देशातील सर्व कर्मचार्‍यांना आणि आरोग्य सेवा कामगारांना दिली. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, या कंपन्यांच्या लसीचा आजपर्यंत कोणताही मोठा दुष्परिणाम झालेला नाही.

चीनच्या लसीव्यतिरिक्त, ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका (ब्रिटन), मॉडर्ना (अमेरिका), कॅन्सिनो बायोलॉजिकल (चीन), जॉन्सन अँड जॉन्सन (अमेरिका) आणि नोव्हावॅक्सन (अमेरिका) यांनी विकसित केलेल्या लसी देखील क्लिनिकल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात आहे.

कोरोना व्हायरसवरील लस बनविणारा रशिया जगातील पहिला देश आहे. हा दावा आतापर्यंत फक्त रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि त्याच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.

अमेरिका, चीन आणि भारतासह अनेक देशांना रशियाच्या दाव्यावर विश्वास केला नाही. रशियाचा असा दावा आहे की, त्यांनी तयार केलेली स्पुटनिक-व्ही लस चाचणीच्या सर्व टप्प्यांपर्यंत गेली आहे. बर्‍याच लोकांना या लसीचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

झहाफी (चीन), इनोवायो फार्मास्युटिकल कंपनी (अमेरिका), मर्क अँड कंपनी (अमेरिका) सनोफी (फ्रान्स) आणि ग्लॅक्सोमिथक्लिन (ब्रिटन) यांच्या संयुक्त सहकार्याने विकसित केली जाणारी लस ही सध्या क्लिनिकल चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. त्यामुळे ही एक चांगली लस तयार होईल, अशी आशा आहे.

क्लिनिकल चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर लसीची आपत्कालीन अधिकृतता घ्यावी लागेल. या टप्प्यावर कोरोनाच्या गंभीर रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत लस देण्यास परवानगी देण्यात येईल.

तसेच, त्याच्या दुष्परिणामांवर किंवा प्रतिकारशक्तीवर चांगल्या प्रतिसादाची संपूर्ण डेटा यादी तयार केली जाईल. यानंतर, शेवटी लस निर्माता कंपन्यांना अंतिम मान्यता घ्यावी लागेल, त्यानंतर लस सर्वसामान्यांना उपलब्ध होण्यास सुरुवात होईल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!