Coronavirus: आनंदाची बातमी! कोरोनावर लवकरच लस मिळणार; जागतिक आरोग्य संघटनेचा मोठा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 10:21 AM2020-05-12T10:21:03+5:302020-05-12T10:24:42+5:30

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. आतापर्यंत ४२ लाखांहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर २ लाख ८७ हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत कोरोना व्हायरसवर लस शोधण्यात कोणत्याही देशाला यश आलं नाही. कोरोनावर लस उपलब्ध नसल्याने संक्रमण साखळी तोडणे सर्व देशांसमोर आव्हानात्मक झालं आहे.

या संकटकाळात जागतिक आरोग्य संघटनेने चांगली बातमी दिली आहे. कोरोना व्हायरसवर लस शोधण्याचं काम वेगाने सुरु असून अंदाजित वेळेच्या आधी कोरोनावर लस उपलब्ध होईल असं डायरेक्टर जनरल टेडरॉस एडनॉम यांनी सांगितले आहे.

एकूण ७ ते ८ टीम कोरोनावर लस शोधण्याच्या अगदी जवळ पोहचले आहेत. त्यामुळे लवकरच जगाला चांगली बातमी मिळेल अशी अपेक्षा टेडरॉस यांनी व्यक्त केली आहे.

टेडरॉस यांच्या म्हणण्यानुसार बर्‍याच देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे आणि सुमारे १०० वेगवेगळ्या टीम लसीची चाचणी घेत आहेत आणि त्यातील ८ अगदी जवळ पोहचल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी, आम्ही अंदाज केला होता की कोरोनावर लस शोधण्यासाठी १२ ते १८ महिने लागू शकतात. परंतु काम वाढले आहे आणि ते वेळेआधीच विकसित केले जाईल असा दावा त्यांनी केला आहे.

त्याचसोबत टेडरॉस यांनी देशांना विनंती केली आहे की, चाचणी आणि संशोधनासाठी सुमारे ८ बिलियन डॉलर्स जमा केले आहेत. लस तयार झाल्यानंतर, मोठ्या प्रमाणात त्याचे उत्पादन देखील आवश्यक असेल, म्हणून ही रक्कम कमी आहे. याबाबत टेडरॉस यांनी ४० देशांना आवाहन केले आहे.

८ अब्ज डॉलर्स पुरेसे नाहीत, आम्हाला आणखी काही मदतीची आवश्यकता आहे. जर यामध्ये मदत होत नसेल तर लस तयार करण्याचे कामात सतत विलंब होईल. ही लस काही लोकांच्या तावडीत न पडता सर्व देश आणि व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे अशी WHO ची इच्छा आहे.

टेडरॉस यांनी सांगितले की, सध्या आम्ही अशा टीमवर जास्त फोकस करत आहोत जे परिणामाच्या खूप जवळ आहेत आणि जलदगतीने काम करण्यासाठी सक्षम आहेत. मात्र या टीमची नावं जाहीर करण्यात त्यांनी नकार दिला.

जानेवारीपासून आम्ही जगभरातील अनेक संशोधकांसोबत काम करत आहोत. अनेकांनी लसीचा प्रयोग प्राण्यांवर करण्यास सुरुवातही केली आहे. तर काहींनी मानवावर याची चाचणी केली आहे. जवळपास ४०० वैज्ञानिक एकमेकांच्या कार्यावर लक्ष ठेऊन आहेत.

कोरोना व्हायरस महामारी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे कोणत्याही लसीविना याच्याशी लढाई करणे कमकुवत स्थिती निर्माण करणारे आहे. मात्र कोरोनामुळे सर्व देशांना कळालं की, मजबूत आरोग्य यंत्रणा देशासाठी किती महत्त्वपूर्ण आहे असं टेडरॉस यांनी सांगितले.

Read in English