Coronavirus: खबरदार कोणाला सांगाल तर...; चीनमध्ये छुप्यापद्धतीने लोकांना कोरोना लस दिली जातेय?

By प्रविण मरगळे | Published: October 31, 2020 11:55 AM2020-10-31T11:55:58+5:302020-10-31T11:59:39+5:30

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग या संकटाच्या विळख्यात अडकलं, अमेरिकासारख्या प्रगत देशालाही कोरोनाचा जबर फटका बसला. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत लाखो लोकांचे जीव गेले आहेत.

एकीकडे कोरोनाचं संकट जगावर वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी वैज्ञानिकांचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत, जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनावरील लस शोधण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत, काही संस्थांकडून कोरोनावरील लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे.

अशातच चीनने आतापर्यंत आपल्या लाखो लोकांना कोरोना लस दिल्याची माहिती समोर आली आहे. परंतु चीनमध्ये ज्या लोकांना ही लस दिली आहे, त्यांना लसीबाबत गुप्त माहिती ठेवण्याचा दबाव आणला जात आहे.

अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना असा इशारा देण्यात आला आहे की त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाबद्दल कोणाला सांगितले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या भीतीमुळे कोणीही काही बोलण्यास तयार नाही

Latimes.com च्या वृत्तानुसार, काही कंपन्यांमध्ये काम करणार्‍या लोकांना हे जाणून आश्चर्य वाटले की लसीकरणाबाबतची माहिती गुप्त ठेवावी लागेल. एखादी गोष्ट चुकली तर काय होईल अशी भीती एका चिनी नागरिकाने व्यक्त केली. उद्या काही झालं तर अशा परिस्थितीत जबाबदारी कोण घेईल? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे.

तथापि, चायना राष्ट्रीय बायोटेक समूहाकडून चीनच्या लोकांना या लसीचा डोस दिला जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा ग्रुप चिनी सरकारी कंपनी सिनोफार्मचा एक भाग आहे. सिनोफार्म युएई, पेरू, मोरोक्को आणि इतर अनेक देशांमध्ये आपल्या कोरोना लसीची चाचणी घेत आहे. आतापर्यंत या कंपनीच्या लशीची फेज ३ चाचणी पूर्ण झाली नाही.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका चिनी व्यक्तीने सांगितले की, क्लिनिकल ट्रायल्समध्ये सहभागी असलेल्या लोकांवर लक्ष ठेवले जात आहे, परंतु लसीकरण केलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांवर नजर ठेवली जात नाही.

सप्टेंबरमध्ये चायना नॅशनल बायोटेक ग्रुपनं म्हटलं आहे की क्लिनिकल चाचणीच्या व्यतिरिक्त जवळपास साडेतीन लाख लोकांना कोरोनाची लसीचा डोस देण्यात आला आहे. चीनी सैन्याने देखील जूनपासून कोरोना लस वापरण्यास सुरुवात केली.

दरम्यान, भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१५ टक्क्यांवर पोहोचले आहे तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६ लाखांहून कमी झाली आहे. शुक्रवारी ४८,६४८ नवे कोरोना रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या ८० लाख ८८ हजार झाली आहे. या संसर्गातून ७३ लाख ७३ हजारांहून अधिक जण बरे झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५० टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. कोरोनावरील प्रतिबंधक लस प्रत्येक नागरिकाला दिली जाईल, अशी ग्वाही पंतप्रधान मोदी यांनी दिली असतानाच या लसीच्या वितरणासाठी नियोजनाची तयारी सुरू झाली आहे. लसीच्या वितरणासाठी राज्यांनी समन्वय समित्यांची स्थापना करावी, अशी सूचना केंद्राने सर्व राज्यांना केली आहे.