CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 07:58 AM2020-05-19T07:58:07+5:302020-05-19T08:11:04+5:30

coronavirus बांगलादेशात दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाचं थैमान दिवसेंदिवस वाढत असून, या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत.

तसेच बरेच देश या जीवघेण्या व्हायरसवर लस तयार करण्यासाठी मेहनत घेत आहेत. सध्या तरी सोशल डिस्टन्सिंग आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणं हेच उपाय कोरोनाला थोपवण्यासाठी वापरले जात आहेत.

तर काही देशांमध्ये अँटी व्हायरल व अन्य औषधांचा वापर करून कोरोनाबाधितांवर उपचार सुरू केलेले आहेत.

बांगलादेशात दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. बांगलादेशमध्ये डॉक्टरांनी केलेल्या उपचाराला चांगले यश मिळाले आहे.

बांगलादेश मेडिकल कॉलेज रुग्णालयाचे प्रमुख डॉ. तारेख आलम यांना हे यश मिळालेलं आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हे रुग्ण आता ठणठणीत झाले आहेत.

डॉ. आलम यांनी दोन औषधांनी ६० कोरोनाग्रस्तांवर उपचार केले. चार दिवस उपचार घेतल्यानंतर हे कोरोनाबाधित रुग्ण पूर्णतः ठीक झाले आहेत.

डॉ. तारेख आलम यांनी या रुग्णांवरील उपचारात दोन औषधांच्या मिश्रणाचा वापर केला.

डोव्हिसिक्लिन (Doxycycline) या अँटीबायोटिकच्या एका डोसमध्ये इव्हर्मेक्टिन (Ivermectin ) नावाचे अँटीप्रोटोझोल औषधाचे मिश्रण करत डॉक्टरांनी उपचार केले आणि त्याला यशही मिळालं.

या रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम पाहायला मिळालेले नाहीत. प्रयोग केलेले सर्व रुग्ण निरोगी झाले आहेत.

कोरोनाबाधितांवरील या औषधांच्या वापराबाबत आशादायी चित्र निर्माण झाल्याचं डॉ. आलम यांनी सांगितलं आहे.

तसेच ते लवकरच आंतरराष्ट्रीय नियतकालिकेच्या माध्यमातून या उपचारासंबंधीची माहिती देणार असल्याचेही सांगितले जात आहे.

चीन आणि हॉंगकॉंगनं औषधांचे मिश्रण वापरून कोरोनाबाधितांना ठीक करण्याचा प्रयत्न केला होता.

आता बांगलादेशमध्येही डॉक्टरांनी असा प्रयोग केला असून, त्याला चांगलं यश मिळालं आहे. बांगलादेशी डॉक्टरांनी काही औषधांचे मिश्रण वापरून चार दिवसात कोरोना रुग्ण निरोगी केला.

बांगलादेशमध्ये २१ हजार जण कोरोना संक्रमित असून, ३१४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.