Corona Virus : कोरोना रिटर्न्स! चीनमधील रुग्णसंख्येत मोठी वाढ; बीजिंगमध्ये सेमी लॉकडाऊन, परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 11:34 AM2022-11-20T11:34:35+5:302022-11-20T11:50:35+5:30

Corona Virus : चीनमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. राजधानी बीजिंगमध्ये दिवसभरात पाचशेहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 64 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 642,882,084 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे 6,625,526 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात 622,095,270 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशात शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. चीनने आता पुन्हा एकदा संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे. चीनमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे.

राजधानी बीजिंगमध्ये दिवसभरात पाचशेहून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर देशभरात 25 हजारांहून अधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लाखो रहिवाशांना या आठवड्याच्या अखेरपर्यंत घरामध्येच राहण्याचा आणि दररोज कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे.

बीजिंगमधील जिल्हा कर्मचाऱ्यांना शनिवारी व्यवहार कमी करण्यास आणि शनिवार व रविवारदरम्यान अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चाओयांग जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याने आठवड्याच्या शेवटी लोकांना घरात राहण्यास सांगितले आहे.

चाओयांग हा बीजिंगमधील सर्वात प्रभावित जिल्हा आहे. सर्व उच्च सरकारी कार्यालये, व्यावसायिक केंद्रे आणि हजारो रेसीडेंशियल कम्युनिटी आहे. बीजिंग महानगर क्षेत्र 18 जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहे. हे 18 जिल्हे चार प्रशासकीय क्षेत्रांमध्ये विभागले गेले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, चाओयांग जिल्हा प्रशासनाने रहिवाशांना अत्यंत आवश्यकतेशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तरीही त्यांनी असे केल्यास, त्यांना 48 तासांच्या आत कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट द्यावा लागेल. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चाओयांगच्या पाठोपाठ, डोंगचेंग, झिचेंग, टोंगझो, यानकिंग, चांगपिंग, शुनी आणि हैदियान या इतर जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांनीही त्यांच्या अधिकृत मीडिया खात्यांवर सूचना जारी केल्या. यामध्ये जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या हालचाली कमी करून अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शहरातील काही प्रमुख शॉपिंग मॉल्सने साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जेवणाची सेवाही स्थगित केली आहे. बीजिंगमध्ये शुक्रवारी कोरोनाचे 515 नवे रुग्ण आढळले, तर देशभरात 25 हजारांहून अधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली. गेल्या दोन वर्षांत कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे चीनमधील जवळपास सर्व शहरे नियमित लॉकडाऊनमध्ये आहेत.

कोरोनामुळे लोकांचे जीवन, सप्लाय चेन आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोरोनामुळे अनेक प्रगत देश हतबल झाले आहेत. काही देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.